Saturday, January 6, 2024

तीन कविता : अधली-मधली खाडाखोड

खाली दिलेल्या तीन कविता अशाच अधेमध्ये कधीतरी लिहून झाल्या. बहुतेक कोविड दरम्यान. निरोपाचं गाणं वगळून. ती अशीच कुठल्यातरी काळात लिहून झाली. चांगलं-वाईट घडतं त्याला प्रतिसाद म्हणून अशी बिलकुल समजूत करून घेऊ नये. मीही तशी करून घेतलेली नाही. निदान कविता लिहिल्यामुळे मी शाबूत तरी राहिलो. नाहीतर भलत्याच गोष्टी घडण्याला वाव असतोच. मागचं-पुढचं कुणाला काय माहित असतं ! 
मंगेश नारायणराव काळे या कवी-चित्रकार माणसानं कधीतरी ते चालवत असलेल्या 'खेळ' या अनियतकालिकासाठी या कविता छापण्यासाठी मागवल्या. त्या अंकात आणखी एक कविता होती, ती मात्र इथं या पोस्टमध्ये जोडलेली नाही. पुढेमागे कधीतरी तीही पोस्टेनच.
एवढं पुरे. ठीकाय. 

***




1. स्वप्नात लोळतात सप्तरंगी गालिचे 

पूर्वार्ध : 

स्वप्नात लोळतात सप्तरंगी गालिचे 
नवेनवे हवेहवेसे उबदार बिनखर्चाचे 
कठोर डोळ्यात खुपसतो ऐषोआरामी हळहळ 
विसरतात रडणं फुटले डोळे पंचविशीचे 
टपकतात खत्रूड उडाणटप्पू कळप 
आलिंगनी आभाळ छाताडी धडधड गरजते
केसाळकातडं लुसलुशीत लसूणफोडणी 
बत्तीशी तोंडात जुलूस उजागर खमंगतो
मध्यांतर : 
वाडवडला महापुरुषा आज्यापणज्या ठिकाणदारा 
मालका गणपतीबावा गजानना उभा ऱ्हा ज्याची करणी 
त्याच्या मस्तकी आपट आणि सुखात ठेव बावा म्हणत 
बाप ओवाळतो अगरबत्ती रोज आंघोळ करून 
उत्तरार्ध : 
नस्तो कोणकुणाचा आपले आपण अस्तो एकटे 
एकट्याच्या अवतीभोवती एकट्याचा फापटपसारा 
रांत्रदिन मृत्यू मुकाबला भयभीत डोळ्यात उजाडते सकाळ 
कुरतडतात आवाज क्षणाक्षणाचे क्षण बेमालूम 
टरकवतात घटका झोप आणि पान गळतं दिशाहीन 
नित्यनियमाने घोरतात नाकपुड्या विलक्षण डेंजर 
वळवळतो हव्यासभर च्यायचा घोडा निमूटपणे 
स्टिलच्या कपात कोऱ्या चाईत बुडबुडतो पुडा पार्लेजीचा  
बुचकळतो बादलीभर पाण्यात मरतुकडं शरीर खात 
गटांगळ्या इचकत चावतो दात पेलतो शिव्या अफलातून 
भरपगारी खळखळतो चिल्लर कंगाल महिना
फाटका खिसा फाटकं नशीब खिदळतं निष्ठावंत तोऱ्यात 
स्वप्नात लोळतात सप्तरंगी गालिचे 
नवेनवे हवेहवेसे उबदार बिनखर्चाचे 

***

2. मुसळधार पावसाळी आकृतीत अर्थात विस्कळीत आत्मचरित्रात्मक नोंद 

१. 
मुसळधार पावसाळी आकृतीत 
वाजतात तीनतेरा 
निरामय डोळे विरघळतात कपाळी जीभ बोबडी पडते 
२. 
भाडोत्री खूणगाठ विस्फारते 
चकणाचुर भिंतींना 
मोरीत तुंबतात खरकटी शीतं 
३. 
तुडुंब पाण्यात 
बुचकळतो शरीर डोईवर 
तांब्याभर पाणी मांडी घालून 
४. 
रैवारच्या जिभेला सुटते खाज 
दाल्दीनीला पाचपन्नास शिव्या घालून 
उर्मट दात चाटतात जिभल्या 
५. 
तिनसांच्याला कपाळाला लागतो हात 
पिढीजात वंशावळ 
उगवते दुष्काळ डोळ्यात 
६. 
बसल्या तटावर भोवळ आणते 
डेरेदार मिजास 
एन्टायमाला ठसका लागतो 
डोळे ओतायला लागतात 
ही यातनांची लंबीचौडी पिलावळ 
७. 
उजाडताना ह्या भुरटभुरट 
सकाळी गिरवतात 
उभ्या दिवसाला गच्च माथ्यात 
८. 
कुठल्याही दवाउपचाराने शांत होत नाही 
ही शरीर पोखरत चाल्लेली कीड अथवा 
नष्ट होत नाही तीचं दर्शनी कवडीइतकं नामोनिशाण 
९. 
कुठल्याच प्रहरी मान वर करवत नाही 
घरच्यांच्या तोंडात दर्वळतात 
सरकारी नोकऱ्यांचे फॉर्म 
उपसतो ही अनाठायी शैक्षणिक उलाढाल 
१०. 
हे भव्य आभाळ डोईवर 
मिऱ्या वाटायला लागतं 
दिशाहीन गलबत हेलपाटतं समतोल कक्षेत 
११. 
अंथरुणात कुबट वास शिरतो 
नाकाला सवयीचा होतो 
पाय कुजतात हळद लावून सकाळी 
शरीर उभं पायांवर मर्जीत 
१२. 
रात्री पाय एकमेकांवर चढतात 
नखं टोचतात डोक्याला डोकं लागतं 
आणि डोळे झिरमतात किन्न काळोखात निमूट कंटाळून 
रेशनचे गहूतांदूळ पाखडून चारघास खातात पाचसा तोंडं 

***

3. निरोपाचं गाणं 

आपण एकमेकांपुरते एकमेकांसाठी होतोनव्हतो 
तारांबळ क्षणिक घटकेपुरती 

धांदल जवळीक उताणी अर्धचंद्र 

शिफारशी नामंजूर बेदखल सहेतुक 
डोळे वितळत डोंगराळ गालफडांवरून 

गर्जत आक्रोश कानठळ्या बेशुद्ध वाचा गेली 

स्पर्श कोलमडले गोठीव स्तनांवर
हातापायातडोक्यात मुंग्या वळवळल्या तात्पुरत्या 
दिगंतर चावत नखांवरनखं 

मधल्यामध्ये जीभ साकंडली रक्ताची थुंकी पोटात गेली

येजाकरत राहिलीस डेरेदार नखऱ्यात 
हुलकावणी फाजील क्षणिक सोहळ्यात 

खुपत संपत उरत गेलीस थंडअखंड डोळ्यात 

कस्मेवादे धुपूत गेले 
नावाच्या शपथा चुलीत गेल्या 
भेटण्याच्या जागी गवताळ प्रदेश वाढले 

झाड झाड राहिलं नाही 
पाणी पाणी राहिलं नाही 
नाही मातीचा सुगंध सुगंध राहिला 
तरी शरीराचे गुणधर्म बदलले नाहीत 

नाही होकार - नकारातलं मौनव्रत सुटलं शेवटच्या क्षणी 

ओठांवरओठ थर्थरले 
अवाक्षर डोळे निथळत हातातले हात सुटले 

***



No comments:

Post a Comment