Wednesday, May 8, 2024

दास्तान -ए- रामजी : जन्म-मृत्यूच्या गडद अंधारातलं कथननाट्य



भारतात कथा-कथनाची प्रदीर्घ अशी सशक्त परंपरा आहे. दोन व्यक्तींच्या किंवा समूहाच्या मौखिक संवादप्रक्रियेतून ती अधिकाधिक काळ इथल्या मातीत इथल्याच स्वभाववैशिष्ट्यांसह रुळलेली आणि बहरलेली दिसते. एका संवादातून निर्माण झालेली उत्सुकता पुढील संवादात कायम ठेवून अनेक बारकाव्यांसहित कथनाचे अनेक कोन आपल्यासमोर उलगडले जातात. या कथनाचा रूपबंध अतिशय मोकळा आणि सर्वसमावेशक असा असतो. एककेंद्री किंवा कुठल्याही पद्धतीची चौकट, साचेबद्धता या कथनात आढळून येत नाही. सांगण्याच्या विविध अस्सल भारतीय तऱ्हा आपसूकच त्यात मिसळल्या जातात आणि त्या कथनातून स्वतःची अशी निराळी अंगभूत लय आविष्कृत झालेली दिसते. रोजच्या बोलण्यातली सुलभता त्या लयीला असते. थोडक्यात कथन म्हणजे सांगणं आणि या कथनातून जे लिखित किंवा मौखिक संहितेद्वारे आकाराला येतं ते कथनरूप.

'दास्तांगोई' हे असेच एक कथनरूप आहे. या शब्दाची फोड करायची झाल्यास दास्तां म्हणजे गोष्ट, कथा, कहाणी किंवा किस्सा. आणि गोई म्हणजे गोष्ट कथन करणं, सांगणं किंवा सादर करणं. मौखिक ते लिखित अशी कथनपरंपरा विकसित झालेली आढळते. 'लीळाचरित्र' हा आद्य मराठी ग्रंथ यादृष्टीने उदा. म्हणून आपल्याला पाहता येईल. मराठीत 'कथा' हा वाङ्मयप्रकार कथन आणि कथनरूप या दोन्ही अर्थांनी वापरलेला दिसतो. कारण कोणत्याही कथनरूपामध्ये कथा असते. त्या कथेच्या रचनेला वेगवेगळे आयाम असतात. कथेत कथनकर्ता असतो. ज्याला नायक किंवा निवेदक म्हटलं जातं. दास्तांगोई कथन करणाऱ्याला, सादर करणाऱ्याला 'दास्तांगो' असं म्हटलं जातं. दास्तांगोईत दीर्घ पल्ल्याची गोष्ट कथन केली जाते. कहाणी, कथागीत, लीळा, दृष्टांत कथा, आख्यान काव्य, बखर, ललित गद्य अशी कथनरूप आपल्या ओळखीची आहेत. या कथनरूपांचा आसरा दास्तांगोई सादर करताना घेतला जातो.

'दास्तांगोई' हा दरबारी कलाप्रकार पर्शियातून भारतात आला. मुघल राजवटीत हा कलाप्रकार रुजला आणि वाढलाही. अकबराच्या काळात ही कला भरभराटीला आली. प्रामुख्याने सम्राट, नवाबांच्या मनोरंजनाचं साधन म्हणून तो खेळला जाई. इराणमध्ये आठव्या-नवव्या शतकांत या कलाप्रकाराची सुरुवात झाली असं अभ्यासक मानतात. पुरुषी वर्चस्वामुळे महिलांना हा कलाप्रकार सादर करायला बंदी होती, त्यामुळं पुरुषच दास्तान सादर करायचे. १९ व्या शतकात लखनऊमध्ये दास्तांगोईला नवे आयाम प्राप्त झाले. दास्तांगोईच्या रचनेत नवनवे प्रयोग तिथं होऊ लागले. इराणमधून जी दास्तान भारतात आली त्यात ‘रज़्म’ म्हणजे युद्धवर्णने आणि ‘बज़्म’ म्हणजे मैफिल हे दोन घटक होते. त्यात ‘अय्यारी’ म्हणजे चलाखी, चतुरपणा आणि ‘तिलिस्म’ म्हणजे जादू हे दोन नवे घटक जोडले गेले. 

'दास्तान ए बडी बांका' ही मुंबई शहरावरची अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या दस्तांगोंनी बांधलेली मराठीतील पहिली दास्तांगोई आहे. मुंबईच्या बहुविध अस्तित्वाच्या अनेकपदरी रूपांचा अपूर्व वेध कथा, किस्से, गाणी, कविता, लावणी यांच्या साहाय्याने सामाजिक-सांस्कृतिक घटितांच्या बदलत्या अन्वयार्थाकडे तिरकसपणे निर्देश करणारं कथन या दास्तांगोईत बांधलेलं होतं. आता अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांनी 'दास्तान -ए- रामजी'  ही नवी दास्तान बांधलेली आहे.

‘दास्तान -ए- रामजी’ दि. बा मोकाशींच्या 'आता आमोद सुनासि आले' या लोकप्रिय कथेवर आधारलेली आहे. मोकाशींच्या मूळ कथेची सुरुवात अशी आहे :
''थडथडा पावसाचे थेंब पडत आहेत नि शिवा नेमाणेची गाय अगदी व्यायला झाली आहे. पावसाचं पाणी पिऊन नदी मस्तीला येऊन वाहत आहे नि रामजी लोहाराच्या एकुलत्या एका मुलाला तिनं आपल्या खळबळत्या धारांत वाहून नेलं आहे. हवा ओल्या फडक्यासारखी सर्द झाली आहे नि गण्या शिनारेचा दमा वाढला आहे. निसर्गाच थैमान सुरू झालं की अशाच गोष्टी का घडतात ? माणसं अशी निपचित का पडतात ?''

गोष्ट रंगवून सांगणं आणि त्यातून कथननाट्य उभं करणं हे दास्तां बयां करण्याच्या मुळाशी असतं. गोष्टीला सुरुवात करताना तिच्या सांगण्यातच ऐकणाऱ्याला किंवा पाहणाऱ्याला स्वतःत ओढून घेणं आणि गोष्टीची एकेक साखळी हार ओवताना जसं आपण एकेक फुल त्यात ओवीत जातो नि त्याला जोडणारा धागा मात्र एकसमान सगळ्या फुलांना आपल्यात सामावून घेतो तसं कथन ‘दास्तान -ए- रामजी’ या दास्तांगोईत विणलेलं आहे. पण त्याची दास्तां सांगताना अक्षय आणि नेहा यांनी यात नाट्याचं जे गंभीर आवर्तन साधलेलं आहे ते याची देही याची डोळा अनुभवण्यासारखं आहे.

दास्तांगो अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी 
नदीच्या खळबळत्या धारांत रामजीच्या एकुलत्या एक मुलाचं वाहून जाणं आणि शिवा नेमानेच्या गाईला मोकळं करण्यात रामजीचं वाहून जाणं या जन्म आणि मृत्यूच्या गडद अंधारातलं हे कथननाट्य आहे. स्वतः रामजीचं या सगळ्यातून तुटत जाणं, आणि ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, तुकारामाच्या अभंग-ओव्यांच्या संगीतात त्याला ओढून आणण्याचा, धीर देण्याच्या तीव्र प्रयत्नात असणाऱ्या पात्रांचं अस्तिव दास्तांगोईत बसल्या जागेवर उभं करणं हे अतिशय कठीण काम अक्षय आणि नेहा ताकदीनं उभं करतात. या सगळ्याचा काहीही परिणाम न होणारा, एकटक स्तब्ध पाहणारा रामजी आणि शिवाच्या बायकोचं गाईला मोकळं करण्यासाठी रामजीच्या घराच्या दरवाज्यावर धापा टाकत येणं यातलं नाट्य हा या दस्तांगोईतला धीरगंभीर क्षण आहे.

"रामजीदा, धाव! माजी गाय अडली रे! धाव रामजीदा!"

नेमाण्याच्या बायकोच्या या आरोळीत रामजीला अडलेल्या गाईच्या हाकेत मुलाचीच हाक ऐकू येते.
धाव...!

कुठलंही नेपथ्य, संगीत टाळून हा प्रसंग वज्रासनात आपल्यासमोर सादर होतो. टाळ वाजतो आणि आधीच्या प्रसंगाला थांबवून त्याला जोडणारा नव्या वळणाचा प्रसंग नव्याने कथन होतो. टाळ वाजवून प्रसंगांच्या कथनातला जो विराम अधोरेखित केला जातो त्याची संगती रामजीच्या आणि गाईच्या मोकळं होण्यातल्या धडपडीची न संपणारी सांगता आहे. टाळ निनादात राहतो. रामजीच्या डोळ्यातले दृश्य त्या निनादात ओसंडून वाहू लागते.
'म्हातारपणी मी रडावं हे प्राक्तन ?' हा त्याचा उच्चार या कथनाला अर्थपूर्णता प्राप्त करतो.

मूळ कथेत जी जलददृश्याची विलक्षण सूक्ष्म बांधणी दिबांनी उभी केलीय तिला अशा पद्धतीच्या कथननाट्यात उभं करणं अतिशय कठीण गोष्ट आहे. पण गोष्ट सांगता सांगता त्यातलं नाट्य उभं करून कथनाला प्राधान्य देणं हा दास्तांगोईचा मुख्य उद्देश असल्यानं या दास्तांगोईची बांधणी आणि पाहणाऱ्याला त्यात खेचून घेऊन समांतरपणे ऐकणाऱ्याला बांधून ठेवण्यातली गतिशीलता टिकवणं हे या दास्तांगोईत अतिशय जाणतेपणानं जुळवून आणलेलं आहे.

या दास्तांगोईत नाट्य उभं करण्याच्या अनेक जागा आहेत. दर प्रयोगागणिक त्या बदलतही जातील. मूळ कथेत वाचकांसाठी ज्या जागा दिबांनी मोकळ्या ठेवल्या होता त्या या दास्तांगोईच्या बांधणीत अवास्तव स्वातंत्र्य न घेता मूळ धाग्यालाच पुढे वाढवत आपल्यासमोर सादर होतात. त्यामुळं मूळ कथनाची लयही बिघडत नाही किंवा तिला धक्का लावू दिला जात नाही. हे या दस्तांगोईचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.

गाईची सुटका करून रामजी वाड्याबाहेर पडल्यानंतर पाऊसाच्या सरी अंगावर पडल्यावर तो पुन्हा वाहून गेलेल्या मुलाच्या आठवणीत ढकलला जातो. पण तो चालत राहतो. कठोर बनून ओसरीवर वाट बघत बसलेल्या माळकऱ्यांसोबत माळ्यावर जाऊन बसतो. संतू वाणी अमृतानुभव उघडून सुरु करतो -

आतां आमोद सुनांस जाले । श्रुतीसि श्रवण रिघाले ।
आरिसे उठिले । लोचनेंसी ।।
आपलेंनि समीरपणे । वेल्हावती विंजणे । 
कीं माथेंचि चांफेपणें । बहकताती ।।

एक ओळ, त्या ओळीला बांधलेल्या कैक ओळी एकातएक बांधून कथन सुरूच राहतं. गोष्टी अव्याहतपणे पुढं सरकत जातात, कैक गोष्टी त्यात मिसळल्या जातात. गोष्ट बदलली तरी सांगणं सुरूच राहतं.

जिव्हा लोधली रासे । कमळ सूर्यपणे विकासे ।
चकोरचि जैसे । चंद्रमा जालें ।।
फुलेंचि जालीं भ्रमर । तरुणीची जाली नर ।
जाले आपुलें शेजार । निद्राळुची ।।
चूतांकुर जाले कोकीळ । आंगचि जाले मलयनिळ ।
रस जाले सकळ । रसनावंत ।।
तैसे भोग्य आणि भोक्ता । दिसे आणि देखता । 
हे सारले अद्वैता । अफुटामाजी ।।

रामजीसह माळ्यावर बसलेल्यांपैकी कुणालाही अर्थ उमगत नसला तरी शब्दांचा नाद सगळ्यांना बांधून आहे हे उमगतं. ओव्या गुणगुणणाऱ्या ओठांची सवयीची हालचाल या दृश्याला बांधून आहे. रामजीच्या नजरेसमोरील 'दिसणं' मात्र या सर्वांहून वेगळं आहे. त्याचा नाद आणि लय वाहून गेलेल्या मुलाच्या हाकेत गोठलेली आहे.

पुन्हा टाळ निनादतो. कथनाची लय निनादत राहते. अशी निराळी गंमत आहे या दास्तांगोईची.

अक्षय शिंपी यांनी दास्तांगोईचं मराठी रोपटं इथल्या मातीत इथल्याच पूरक सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्ट्यांसह लावलंय. ते रुजवण्यासाठी त्यांची धडपड सुरूय. त्या धडपडीत आपणही हातभार लावणं जरुरीचं वाटतं. मराठी मातीत मराठी दास्तांगोई बहरले इतके मुबलक प्रयत्न आपल्यातर्फे व्हायला हवेत. गोष्टी सांगण्याला, ती बऱ्या-वाईट वळणांसह प्रवाहित ठेवण्याला आणि तिच्या संवर्धनाला अशी पार्श्वभूमी लागते. संकुचित मराठी सांस्कृतिक पर्यावरणात ती तयार झालीय ही सांस्कृतिक हस्तक्षेपाच्या दृष्टीने महत्त्वाची घटना समजायला हवी.

*** 

( हा लेख दै. नव शक्ती, रविवार ५ मे २०२४ च्या 'अक्षररंग' पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे.)

No comments:

Post a Comment