Monday, October 14, 2024

भटक्या दिवसांच्या दरम्यानच्या नोंदी

29 सप्टेंबरला जोधपूरला उतरलो तेव्हा घंटाघरची देखभाल करणाऱ्या मुहम्मद इकबाल चाचाला फुरसतीत भेटायचं निश्चित केलं होतं. पुढचे तीन दिवस इथं होतो पण भेट झाली नाही. सकाळ संध्याकाळ नुसत्या फेऱ्या मारायचो. निराश होऊन 2 ऑक्टोबरला जोधपूर सोडून बिकानेरला गेलो. पहिले दोन दिवस वगळता कबीर यात्रेत फार काही हाती लागलं नाही. मग कंटाळून यात्रेचा शेवटचा दिवस न करता मी अन्वर हुसेन सर आणि चित्रकार मित्र अनुपने पुन्हा जोधपूरला यायचं ठरवलं. उन्हाच्या लकाकत्या ओळींच्या हालचाली मागेमागे सांडत टप्प्याटप्प्याने बसमधून उतरणाऱ्या-चढणाऱ्या रंगबेरंगी माणसांच्या आकृत्या बघत जोधपूरला उतरलो. दुपारचं ऊन इतकं कडाक्याचं कि झोस्टेलमधून बाहेर पडवेना. संध्याकाळी सरदार मार्केट मधल्या गल्ल्या धुंडाळत पुन्हा इकबाल चाचाला भेटायला घंटाघर गाठलं तर हा गडी तेव्हाही नव्हता तिथं. दिव्यांची मंद रोषणाई आणि कोपऱ्यात रावणहाथावर राजस्थानी लोकगीतं न वाजवता भलतीच बॉलिवूड हिट गाणी वाजत होती. खाली पायऱ्या उतरताना लक्षात आलं हा चक्क रावणहाथावर सलमानच्या बॉडीगार्डमधलं तेरी मेरी प्रेम कहाणी वाजवत होता. लोकसंगीतातल्या वाद्याचा च्यामारी केवढा इन्सर्ट ! 

घंटाघर । जोधपूर । फोटो : शोधण्यातली खाडाखोड 

काल सकासकाळी पुन्हा घंटाघर गाठलं. दोन्ही ढोपरांना  पोटाशी धरून इकबाल चाचा खुर्चीत तंद्रीत बसला होता. सरदार मार्केटचा भरगच्च कोलाहल आणि कबुतरांची अफरातफरी वारंवार. ही एक वेगळीच मजा. आवाजाच्या गुंतागुंतीची. अचूक हेरता येईल अशी प्रत्येकाची सुसूत्रता. 

1910 मध्ये राजा सरदार सिंह यांच्या शासनकाळात सरदार मार्केटच्या परिसरात घंटाघर बांधलं गेलं. साधारणतः 100 फूट उंच असलेल्या या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर लंडनमधील लुंड अँड ब्लोकली कंपनीने तयार केलेलं तीन लाखांचं घड्याळ बसवलं. घड्याळ फक्त लाखाचंच होतं. उर्वरित दोन लाख घड्याळ बसवण्यासाठी आणि या घड्याळाची दुसरी प्रतिकृती न बनवण्याच्या करारासाठी मोजले गेले. 

चावीवर चालणारं हे भारतातील एकमेव घड्याळ आहे बहुतेक. दर गुरुवारी घड्याळाला चावी दिली जाते. 1911 साली बनवलेल्या चावीचं वजन 10 किलो आहे. इकबाल चाचांचा चावी धरलेला फोटो काढलाय. ही बडबड यासाठी केली कारण या वास्तूच्या स्थापनेपासून इकबाल चाचांचा परिवार या घड्याळाची देखभाल करतो. अक्ख्या जोधपूरमध्ये हे घड्याळ दुरुस्त करणारे मुहंमद इकबाल एकमेव व्यक्ती आहेत. वडिलांच्या निधनानंतर 2009 पासून ते आणि त्यांचा मुलगा शकील हे काम पाहतो. 

लंडनमधील लुंड अँड ब्लोकली कंपनीने तयार केलेलं तीन लाखांचं घड्याळ । फोटो : शोधण्यातली खाडाखोड 

त्यांना शोधत पुन्हा आलो म्हणून त्यांनी विनातिकीट घंटाघर कसं चालतं हे समजावून सांगितलं. गुंतागुंतीचे पार्ट्स दाखवले. मी जे काम करतो याचं कौतुक तुम्हा बाहेरून आलेल्यांनाच जास्त वाटतं. इथं कुणाला त्याची फारशी कदर नाही. कामाचं महत्त्व आणि त्याला दिला जाणारा सन्मान इथं नाही. इथला नगर निगमचा चपराशी महिना पन्नास हजार घेतो आणि माझा पगार ऑगस्टपासून आलेला नाही. सरकार चेंज हो गयी हैं देखते है क्या होताय! 

दहा किलो वजनाची घड्याळाची चावी आणि
इक्बाल चाचा । फोटो : शोधण्यातली खाडाखोड

पायऱ्या उतरताना इकबाल चाचा सांगत सुटला. वय झालंय. धाप लागते. तरी बोलणं सुरु होतं. तक्रार वगैरे कसं म्हणावं या बोलण्याला. वेगळं काम करणाऱ्या आणि वेगळं काही करू पाहणाऱ्या लोकांची कुठल्याही काळात साधारणतः अशीच अवस्था असते बहुतेक. मग विदेशी लोकांबरोबरच किस्से, त्यांचं प्रत्येक गोष्ट बारकाईने जाणून घेण्याचं कुतूहल वगैरे सांगत सुटले. 

आठवणी काही विस्मरणात जात नाहीत तरी फोटो काढला त्यांच्यासोबत. 

च्याय प्यायची त्यांच्यासोबत हे एक राहिलंच!

***





कबीर यात्रेचा एक मुक्काम बिकानेर जिल्ह्यातल्या कक्कू या गावात होता. कक्कू हे गाव सूत कातणाऱ्या 'कटवारी' समुदायाच्या रहिवासासाठी ओळखलं जातं. मारवाडी भाषेत सूत कातणे याला कताई म्हणतात. साधारणतः पाचशेहून अधिक कटवारी विणकर महिलांचा समुदाय कक्कू गावात राहतो. असं तिथला फॅक्टरी इन्चार्ज म्हणाला. एन.के.चौधरी यांनी 1978 साली स्थापन केलेली 'जयपूर रग्ज' ही गालिचा तयार करणारी कंपनी बिकानेर जिल्ह्यातील जवळपास तीनहजारहून अधिक महिलांना रोजगार देते. कापसाच्या प्राथमिक अवस्थेपासून त्याला लोखंडी ब्रशने घासून धागायोग्य सूत बनवण्यात आणि पुढे त्याचे गालिचे तयार होण्यात या महिलांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. 

बिकानेर जिल्ल्यातल्या कक्कू गावातील 'कतवारी' महिला । फोटो : शोधण्यातली खाडाखोड

जयपूर रग्जद्वारे या महिलांना सर्व सामग्री पुरवली जातेच शिवाय त्यांना सूत काताईचं प्रशिक्षणही दिलं जातं. शेतीचा कालखंड वगळता या महिला घरात किंवा अंगणात धागा तयार करतात. एक किलो धाग्याच्या वजनावर त्यांना प्रतिदिन शंभर रुपये आणि कंपनीतर्फे अधिकचे तीस रुपये असे एकूण 130 रु. मिळतात. अंगमेहनतीच्या तुलनेत हे पैसे फारच कमी आहेत असं इन्चार्जला विचारलं तर तो म्हणाला, घरच्या कामातून वेळ काढून, शेती करून या महिला हे काम करतात. आपापल्या क्षमतेनुसार त्या धागा विणतात. त्यामुळं साधारणतः प्रतिदिन दोनअडीच किलो प्रत्येक महिला धागा तयार करते. घरी मुलगी असेल तर तीही त्यांना मदत करते. पुरुष हे काम करत नाहीत का ? असं विचारल्यावर तो म्हणाला हे काम खास महिलांसाठीच आहे. पुरुष मंडळींना शेजमजुरी, ट्रक ड्राइविंग, किंवा फॅक्टरीत धाग्याला रंग देण्याची कामं आहेत. ज्यात मोबदला अधिक आहे. त्यामुळं पुरुष कताईच्या कामात नाहीत. 

फोटो : शोधण्यातली खाडाखोड











हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या गालिचांचे आकर्षक डिझाइन्स आणि त्यांच्या लाखोंच्या घरातल्या किंमती पाहता यांना या कामाचे अधिक पैसे मिळायला हवेत असं वाटलं. कडाक्याच्या उन्हात झरझर या बायांचे हात चालतात. हातांची हालचाल पाहून असं वाटतं एका मध्यम लयीतला राग सुरूय नि त्यांचे डोळे एकाग्र आहेत चरख्यावर. त्यांच्या हातांची पळापळ पाहिली तेव्हा लक्षात आलं सूत काततानाही यांच्या चेहऱ्यावर घुंगट आहे. मला त्यांचे डोळे पाहायचे होते. त्यांची लवलव पाहायची होती. 

फोटो : शोधण्यातली खाडाखोड

त्यांना हसताना पाहिलं तेव्हा उन्हाचे प्रहर मंदावले होते. एकाएकी केवढा गारवा पसरला हवेत. 

किती किती भरगच्चं आठवणी सोबत घेऊन निघालो या फोटोंसोबत.

***





वेगवेगळ्या प्रहरांत शहरांच्या हालचालीत कमालीची विविधता दिसते. व्याकुळ क्षणांच्या पाठमोऱ्या सावल्या अस्पष्टशा धूसर होतात आणि तांबूस रंग ओतणाऱ्या संध्याकाळी दगडी कोरीव महिरपी खिडक्यांच्या चिंचोळ्या फटींतून डोकावतात. किती हालचाली किती रंगांचे आविष्कार क्षणात दिशाभूल करणारे, किती आवाज आणि आवाजांच्या खाणाखुणा तपासणारे नाकभरून वाहणारे विविध गंध. 

फोटो : शोधण्यातली खाडाखोड










एका कमानीतून बाहेर पडताना कोपऱ्यातल्या चाव्यांच्या अत्यंत मळकट दुकानापाशी रेंगाळलो. त्या काळ्या कुळकुळीत लगडलेल्या चाव्यांच्या दुकानात पांढऱ्या सदऱ्यात बसलेला म्हातारा उठून दिसला. दुकानाच्याच वयाचा असेल. फोटोसाठी पुढं सरसावलो तर इलेक्ट्रिक शॉक लागल्यासारखं हलला नि पेपराची घडी मोडून म्हणाला, काढू नकोस. त्याच्या चेहऱ्याचा रंग आणि चाव्यांचा जुडगा असाच एकस्थायी झाला. चिंचोळ्या गल्लीतून मान वर करत कोरीव कामाचं कुतूहल डोळ्यात साठवत पार पुढं नवचौकिया परिसरात आलो. कित्येक पिढ्यांच्या हालचाली साठवलेल्या या घरांच्या देखण्या खिडक्यांवर सांजवत आलेल्या उन्हाची एक रेखीव छाप पडलेली दिसते आणि लक्षात येतं या प्रहराचं ऊन वेगळं आहे. शांतता आणि भेदकता पूरक आहे एकमेकांत.

फोटो : शोधण्यातली खाडाखोड

निळ्या रंगाची कैक आवर्तनं उजळून निघतात त्यात. संध्याकाळ हळूहळू विरळ होत जाताना एका तंबाखूच्या दुकानात थांबलो. तंबाखूच्या पानांच्या जुड्या टांगलेल्या होत्या पण माजी नजर खिळली ती तराजूच्या सभोवती मांडलेल्या पितळेच्या जुनाट डब्यांवर. काय वय असेल डब्याचं विचारलं तर मालक उच्चारला शंभर! तंबाखूचा डब्बा शंभर वर्षांचा म्हणजे किती संध्याकाळींचं ऊन घेतलं असेल याने अंगावर. किती उघडझाप आणि किती पिढ्यांच्या हातांचा स्पर्श. इथला उजेड वेगळा आणि गंधही. अत्तर पारखताना कॉफीचा गंध ओढतो तसं इथं करून पाहायला हवं होतं. वेगळाच सुगंध आला असता. वासही असतोच चांगला. रंगगंध किती प्रहरांना हुलकावणी देतो नाही ! संध्याकाळ किती वेगळेपण कोरते. 

***


फोटो : शोधण्यातली खाडाखोड


















पुन्हा नवं शहर, माणसं, हालचाली, देवघेव, नुसतं पाहणं आणि संध्याकाळींचा पाठलाग होईस्तोवर हे इतकंच. किंवा याहून वेगळं असेल गवसलेलं !

***

Wednesday, May 8, 2024

दास्तान -ए- रामजी : जन्म-मृत्यूच्या गडद अंधारातलं कथननाट्य



भारतात कथा-कथनाची प्रदीर्घ अशी सशक्त परंपरा आहे. दोन व्यक्तींच्या किंवा समूहाच्या मौखिक संवादप्रक्रियेतून ती अधिकाधिक काळ इथल्या मातीत इथल्याच स्वभाववैशिष्ट्यांसह रुळलेली आणि बहरलेली दिसते. एका संवादातून निर्माण झालेली उत्सुकता पुढील संवादात कायम ठेवून अनेक बारकाव्यांसहित कथनाचे अनेक कोन आपल्यासमोर उलगडले जातात. या कथनाचा रूपबंध अतिशय मोकळा आणि सर्वसमावेशक असा असतो. एककेंद्री किंवा कुठल्याही पद्धतीची चौकट, साचेबद्धता या कथनात आढळून येत नाही. सांगण्याच्या विविध अस्सल भारतीय तऱ्हा आपसूकच त्यात मिसळल्या जातात आणि त्या कथनातून स्वतःची अशी निराळी अंगभूत लय आविष्कृत झालेली दिसते. रोजच्या बोलण्यातली सुलभता त्या लयीला असते. थोडक्यात कथन म्हणजे सांगणं आणि या कथनातून जे लिखित किंवा मौखिक संहितेद्वारे आकाराला येतं ते कथनरूप.

'दास्तांगोई' हे असेच एक कथनरूप आहे. या शब्दाची फोड करायची झाल्यास दास्तां म्हणजे गोष्ट, कथा, कहाणी किंवा किस्सा. आणि गोई म्हणजे गोष्ट कथन करणं, सांगणं किंवा सादर करणं. मौखिक ते लिखित अशी कथनपरंपरा विकसित झालेली आढळते. 'लीळाचरित्र' हा आद्य मराठी ग्रंथ यादृष्टीने उदा. म्हणून आपल्याला पाहता येईल. मराठीत 'कथा' हा वाङ्मयप्रकार कथन आणि कथनरूप या दोन्ही अर्थांनी वापरलेला दिसतो. कारण कोणत्याही कथनरूपामध्ये कथा असते. त्या कथेच्या रचनेला वेगवेगळे आयाम असतात. कथेत कथनकर्ता असतो. ज्याला नायक किंवा निवेदक म्हटलं जातं. दास्तांगोई कथन करणाऱ्याला, सादर करणाऱ्याला 'दास्तांगो' असं म्हटलं जातं. दास्तांगोईत दीर्घ पल्ल्याची गोष्ट कथन केली जाते. कहाणी, कथागीत, लीळा, दृष्टांत कथा, आख्यान काव्य, बखर, ललित गद्य अशी कथनरूप आपल्या ओळखीची आहेत. या कथनरूपांचा आसरा दास्तांगोई सादर करताना घेतला जातो.

'दास्तांगोई' हा दरबारी कलाप्रकार पर्शियातून भारतात आला. मुघल राजवटीत हा कलाप्रकार रुजला आणि वाढलाही. अकबराच्या काळात ही कला भरभराटीला आली. प्रामुख्याने सम्राट, नवाबांच्या मनोरंजनाचं साधन म्हणून तो खेळला जाई. इराणमध्ये आठव्या-नवव्या शतकांत या कलाप्रकाराची सुरुवात झाली असं अभ्यासक मानतात. पुरुषी वर्चस्वामुळे महिलांना हा कलाप्रकार सादर करायला बंदी होती, त्यामुळं पुरुषच दास्तान सादर करायचे. १९ व्या शतकात लखनऊमध्ये दास्तांगोईला नवे आयाम प्राप्त झाले. दास्तांगोईच्या रचनेत नवनवे प्रयोग तिथं होऊ लागले. इराणमधून जी दास्तान भारतात आली त्यात ‘रज़्म’ म्हणजे युद्धवर्णने आणि ‘बज़्म’ म्हणजे मैफिल हे दोन घटक होते. त्यात ‘अय्यारी’ म्हणजे चलाखी, चतुरपणा आणि ‘तिलिस्म’ म्हणजे जादू हे दोन नवे घटक जोडले गेले. 

'दास्तान ए बडी बांका' ही मुंबई शहरावरची अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर या दस्तांगोंनी बांधलेली मराठीतील पहिली दास्तांगोई आहे. मुंबईच्या बहुविध अस्तित्वाच्या अनेकपदरी रूपांचा अपूर्व वेध कथा, किस्से, गाणी, कविता, लावणी यांच्या साहाय्याने सामाजिक-सांस्कृतिक घटितांच्या बदलत्या अन्वयार्थाकडे तिरकसपणे निर्देश करणारं कथन या दास्तांगोईत बांधलेलं होतं. आता अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांनी 'दास्तान -ए- रामजी'  ही नवी दास्तान बांधलेली आहे.

‘दास्तान -ए- रामजी’ दि. बा मोकाशींच्या 'आता आमोद सुनासि आले' या लोकप्रिय कथेवर आधारलेली आहे. मोकाशींच्या मूळ कथेची सुरुवात अशी आहे :
''थडथडा पावसाचे थेंब पडत आहेत नि शिवा नेमाणेची गाय अगदी व्यायला झाली आहे. पावसाचं पाणी पिऊन नदी मस्तीला येऊन वाहत आहे नि रामजी लोहाराच्या एकुलत्या एका मुलाला तिनं आपल्या खळबळत्या धारांत वाहून नेलं आहे. हवा ओल्या फडक्यासारखी सर्द झाली आहे नि गण्या शिनारेचा दमा वाढला आहे. निसर्गाच थैमान सुरू झालं की अशाच गोष्टी का घडतात ? माणसं अशी निपचित का पडतात ?''

गोष्ट रंगवून सांगणं आणि त्यातून कथननाट्य उभं करणं हे दास्तां बयां करण्याच्या मुळाशी असतं. गोष्टीला सुरुवात करताना तिच्या सांगण्यातच ऐकणाऱ्याला किंवा पाहणाऱ्याला स्वतःत ओढून घेणं आणि गोष्टीची एकेक साखळी हार ओवताना जसं आपण एकेक फुल त्यात ओवीत जातो नि त्याला जोडणारा धागा मात्र एकसमान सगळ्या फुलांना आपल्यात सामावून घेतो तसं कथन ‘दास्तान -ए- रामजी’ या दास्तांगोईत विणलेलं आहे. पण त्याची दास्तां सांगताना अक्षय आणि नेहा यांनी यात नाट्याचं जे गंभीर आवर्तन साधलेलं आहे ते याची देही याची डोळा अनुभवण्यासारखं आहे.

दास्तांगो अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी 
नदीच्या खळबळत्या धारांत रामजीच्या एकुलत्या एक मुलाचं वाहून जाणं आणि शिवा नेमानेच्या गाईला मोकळं करण्यात रामजीचं वाहून जाणं या जन्म आणि मृत्यूच्या गडद अंधारातलं हे कथननाट्य आहे. स्वतः रामजीचं या सगळ्यातून तुटत जाणं, आणि ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, तुकारामाच्या अभंग-ओव्यांच्या संगीतात त्याला ओढून आणण्याचा, धीर देण्याच्या तीव्र प्रयत्नात असणाऱ्या पात्रांचं अस्तिव दास्तांगोईत बसल्या जागेवर उभं करणं हे अतिशय कठीण काम अक्षय आणि नेहा ताकदीनं उभं करतात. या सगळ्याचा काहीही परिणाम न होणारा, एकटक स्तब्ध पाहणारा रामजी आणि शिवाच्या बायकोचं गाईला मोकळं करण्यासाठी रामजीच्या घराच्या दरवाज्यावर धापा टाकत येणं यातलं नाट्य हा या दस्तांगोईतला धीरगंभीर क्षण आहे.

"रामजीदा, धाव! माजी गाय अडली रे! धाव रामजीदा!"

नेमाण्याच्या बायकोच्या या आरोळीत रामजीला अडलेल्या गाईच्या हाकेत मुलाचीच हाक ऐकू येते.
धाव...!

कुठलंही नेपथ्य, संगीत टाळून हा प्रसंग वज्रासनात आपल्यासमोर सादर होतो. टाळ वाजतो आणि आधीच्या प्रसंगाला थांबवून त्याला जोडणारा नव्या वळणाचा प्रसंग नव्याने कथन होतो. टाळ वाजवून प्रसंगांच्या कथनातला जो विराम अधोरेखित केला जातो त्याची संगती रामजीच्या आणि गाईच्या मोकळं होण्यातल्या धडपडीची न संपणारी सांगता आहे. टाळ निनादात राहतो. रामजीच्या डोळ्यातले दृश्य त्या निनादात ओसंडून वाहू लागते.
'म्हातारपणी मी रडावं हे प्राक्तन ?' हा त्याचा उच्चार या कथनाला अर्थपूर्णता प्राप्त करतो.

मूळ कथेत जी जलददृश्याची विलक्षण सूक्ष्म बांधणी दिबांनी उभी केलीय तिला अशा पद्धतीच्या कथननाट्यात उभं करणं अतिशय कठीण गोष्ट आहे. पण गोष्ट सांगता सांगता त्यातलं नाट्य उभं करून कथनाला प्राधान्य देणं हा दास्तांगोईचा मुख्य उद्देश असल्यानं या दास्तांगोईची बांधणी आणि पाहणाऱ्याला त्यात खेचून घेऊन समांतरपणे ऐकणाऱ्याला बांधून ठेवण्यातली गतिशीलता टिकवणं हे या दास्तांगोईत अतिशय जाणतेपणानं जुळवून आणलेलं आहे.

या दास्तांगोईत नाट्य उभं करण्याच्या अनेक जागा आहेत. दर प्रयोगागणिक त्या बदलतही जातील. मूळ कथेत वाचकांसाठी ज्या जागा दिबांनी मोकळ्या ठेवल्या होता त्या या दास्तांगोईच्या बांधणीत अवास्तव स्वातंत्र्य न घेता मूळ धाग्यालाच पुढे वाढवत आपल्यासमोर सादर होतात. त्यामुळं मूळ कथनाची लयही बिघडत नाही किंवा तिला धक्का लावू दिला जात नाही. हे या दस्तांगोईचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.

गाईची सुटका करून रामजी वाड्याबाहेर पडल्यानंतर पाऊसाच्या सरी अंगावर पडल्यावर तो पुन्हा वाहून गेलेल्या मुलाच्या आठवणीत ढकलला जातो. पण तो चालत राहतो. कठोर बनून ओसरीवर वाट बघत बसलेल्या माळकऱ्यांसोबत माळ्यावर जाऊन बसतो. संतू वाणी अमृतानुभव उघडून सुरु करतो -

आतां आमोद सुनांस जाले । श्रुतीसि श्रवण रिघाले ।
आरिसे उठिले । लोचनेंसी ।।
आपलेंनि समीरपणे । वेल्हावती विंजणे । 
कीं माथेंचि चांफेपणें । बहकताती ।।

एक ओळ, त्या ओळीला बांधलेल्या कैक ओळी एकातएक बांधून कथन सुरूच राहतं. गोष्टी अव्याहतपणे पुढं सरकत जातात, कैक गोष्टी त्यात मिसळल्या जातात. गोष्ट बदलली तरी सांगणं सुरूच राहतं.

जिव्हा लोधली रासे । कमळ सूर्यपणे विकासे ।
चकोरचि जैसे । चंद्रमा जालें ।।
फुलेंचि जालीं भ्रमर । तरुणीची जाली नर ।
जाले आपुलें शेजार । निद्राळुची ।।
चूतांकुर जाले कोकीळ । आंगचि जाले मलयनिळ ।
रस जाले सकळ । रसनावंत ।।
तैसे भोग्य आणि भोक्ता । दिसे आणि देखता । 
हे सारले अद्वैता । अफुटामाजी ।।

रामजीसह माळ्यावर बसलेल्यांपैकी कुणालाही अर्थ उमगत नसला तरी शब्दांचा नाद सगळ्यांना बांधून आहे हे उमगतं. ओव्या गुणगुणणाऱ्या ओठांची सवयीची हालचाल या दृश्याला बांधून आहे. रामजीच्या नजरेसमोरील 'दिसणं' मात्र या सर्वांहून वेगळं आहे. त्याचा नाद आणि लय वाहून गेलेल्या मुलाच्या हाकेत गोठलेली आहे.

पुन्हा टाळ निनादतो. कथनाची लय निनादत राहते. अशी निराळी गंमत आहे या दास्तांगोईची.

अक्षय शिंपी यांनी दास्तांगोईचं मराठी रोपटं इथल्या मातीत इथल्याच पूरक सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्ट्यांसह लावलंय. ते रुजवण्यासाठी त्यांची धडपड सुरूय. त्या धडपडीत आपणही हातभार लावणं जरुरीचं वाटतं. मराठी मातीत मराठी दास्तांगोई बहरले इतके मुबलक प्रयत्न आपल्यातर्फे व्हायला हवेत. गोष्टी सांगण्याला, ती बऱ्या-वाईट वळणांसह प्रवाहित ठेवण्याला आणि तिच्या संवर्धनाला अशी पार्श्वभूमी लागते. संकुचित मराठी सांस्कृतिक पर्यावरणात ती तयार झालीय ही सांस्कृतिक हस्तक्षेपाच्या दृष्टीने महत्त्वाची घटना समजायला हवी.

*** 

( हा लेख दै. नव शक्ती, रविवार ५ मे २०२४ च्या 'अक्षररंग' पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे.)

Wednesday, January 31, 2024

चार कविता : अधली-मधली खाडाखोड

या चार कविता बहुतेक कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लिहून झाल्या. मनोज पाठक यांच्या 'वर्णमुद्रा' या  मासिकात यातील पहिल्या तीन कविता प्रकाशित झाल्या होत्या. नंतर नंतर कविता किंवा काहीएक सुचणं वगैरे आपण म्हणतो ते साधारणतः या कवितांच्या लयीत सुचू लागलं. लिहिताना शब्द आपोआप त्यांची त्यांची लय घेऊन उतरतात असलं काही त्यावेळी जाणवलेलं. अलीकडे सहाएक महिन्यात कविता लिहून झालेली नाही. त्यामुळं आता त्याबद्दल अधिक बोलता यायचं नाही. पण त्यावेळच्या आपल्या मनस्थितीबाबत हे नोंदवावं वाटलं. कदाचित हीच लय डोक्यात आताही बसली असेलही. किंवा डोक्यातून गेलीही असेल. शब्दाला नवी वळणं लागायला हवीत च्यायला. माहित नाही. पण बघू नवी कविता लिहीपर्यंत काय होतं या अवस्थेचं ते.
तोपर्यंत या चार कविता.  

***




१. धाबायधा

धाबायधाच्या चौकोनी अडगळीत 
संचारतं शरीर काटकोनत्रिकोण लंबगोलाकार

अग्रीमेंटच्या पेप्रावर गॅस त्यावर  
जर्मन टोपात रटरटतो भात सुस्वर 
कमवणारी दोन खाणारी धा 
जिभेवर चव खरपूस व्यर्थ घरंदाज 

संडासच्या लायनीत चिम्पाट वेळखात 
टमरेलभर पाणी डोईवर 
सार्वजनिक पाणी चुळभर नरड्यात 
फोद्रीत मसाला भरण्याची प्राचीन भाषा 
जिभेवर अंगाखांद्यांवर खेळतीजन्मजात 

लंगोटअंडरपँटब्राकुबटवासटॉवेल दृष्टिसातत्यात 
देवासमोर सुवासिक अगरबत्ती स्वस्तात
चप्पल शिवायला मोची कंटाळलेला वारंवार 
तोंडात गोष्ठी मोठेपणाच्या रस्त्यात 

धाबायधाच्या चौकोनी अडगळीत 
अंगावर मुताने परमळलेली गोधडी घेत 
जन्म नांदतो दिगंतर अदृश्य वाऱ्यासारखा 

***

२. आरभाट शाखेत हसतात चिरमुरी ओठ 

आरभाट शाखेत हसतात चिरमुरी ओठ 
चिंचोळ्या गल्लीत स्पर्श 

भिनभिनतो कातडीसदृश्य अंगात 
पापणी लवेपर्यंत घमघमतो सुवासिक दर्प 

दर्प ओला उडवतो थरकाप 
थिबकतो नादलयसदृश्य घमघमाट 

गर्भार डोळ्यात साचते गगनचुंबी इंद्रधनुष्य धूळ 
चिवचिवाट कर्कशतो 
निष्पर्ण फांदीवर 

दोलायमंतो घालमेल उपासपोटी 
येणाऱ्याजाणाऱ्या ठायी कुजबुजतो आडोशी चपट्याभिंती 

निस्तेज चेहरा मुसमुसतो नयनकंपी 
वाऱ्यासरशी केसाळ चेहरा झाकतो
डोळा अश्रूंच्या पदरी हळहळतो हात
 
पुसतो डोळा लाल ओठीओठ 
चिटकवतो बंद डोळा 
रक्ताभिसरण पुर्ववत गल्ली शरमते तुंबवत गटार
 
येजा पुर्ववत कपाळ थंड 
तसे पुर्ववत मार्गाने आम्ही आपापल्या 
तसे अनोळखी नेहमीचेच 

आरभाट शाखेत हसतात चिरमुरी ओठ 
लाजवतात मरणकळा 

***


३. बेरोजगार लाळेच्या मजबूर येडझव्या दृश्यात 

१.
 
आहे पण दिसत नाहीय अशा संभ्रमावस्थेत 
लादीवर उताणी डावंउजवं शरीर 
एका कावळ्याची तीक्ष्ण चोच बोचत चाल्लीय नजरदृष्याला आणि डोळ्यासमोर काळोख पसरलाय भरदिवसा 
२. 
मिजासखोर गुणवैशिष्ट्यात जीभ झालीय
पापडलोंची चवीपुरती मर्यादित
शरीर कशालाच डिमांड देत नाहीय कि 
कसलाच रिस्पॉन्स देत नाहीय सजीवसदृश्य 
३.
झाड आहे पान आहे हवा आहे ढीगभर अमर्याद 
तरी शरीरातून वजा होतोय घाम होऊन 
प्राण थेम्बथेम्ब कि 
झाडालापानालाहवेला दोष देता येत नाहीय 
स्वतःच्या मर्जीत असतात निसर्गाचे व्यवहार सगळे 
४. 
एकटेपणाची आयाळं खाजवतात 
बढाईखोर गांडमस्ती पापणी भुयारं 
निजतात खडकाळ माथ्यावर चिंताग्रस्त सदासर्वदा 
शरीराचं वारूळ होऊन लागलीय रांग मुंगीसदृश्य 
५.  
बोल्तालिवताबिवता येत नसते भुकेची व्याख्या किंवा 
खोटंखोटं नाटकही करता येत नाही भुकेसमोर 
किंवा भुकेची समजही घालता येत नाही 
हातापायापडून डोळेओले करून 
६. 
बेरोजगार लाळेच्या मजबूर येडझव्या दृश्यात 
चढत नाही दातावर मांस 
भातावर डाळीचं पाणी कालवून 
पिता येतं पोटभर पाणी 

पाण्याची पाणीपट्टी भरावी लागते दर महिन्याला ही पुन्हा नवी तऱ्हा नवा व्याप 

***

४. एकाखालीएक मुद्देसूद हळहळ 

टोलेजंग 
इमारतींच्या 
पायथ्याशी 
घुटमळतो 
धाबायधाचा 
नखाएवढा 
जीव 
उष्णसमशीतोष्ण 
पट्ट्यात 
भोवळतात 
माथी 
एकावरएक 
दोनावरदोन 
आकडे 
या
सुशिक्षित 
बेजरोजगार
कंगाल
डोळ्यात 
एकटक 
कटकट 
सतावते 
उदाहरणार्थ 
साक्षात 
किंचित 
संचित  
डोकावतं 
फाटक्या  
बनियनबर्मोड्यात 
कॅलेंडर 
तारखा 
मोजतात 
दरमहा 
रुपयांची 
जमापुंजी  
अखेर 
सरता 
महिना 
हाती 
शून्यगोळाबेरीज 
एकाखालीएक 
मुद्देसूद 
हळहळ 
कालवाकालव 
माजवते 
या 
जड
जड 
डोक्यात 
बेमालूमपणे 

***

Saturday, January 6, 2024

तीन कविता : अधली-मधली खाडाखोड

खाली दिलेल्या तीन कविता अशाच अधेमध्ये कधीतरी लिहून झाल्या. बहुतेक कोविड दरम्यान. निरोपाचं गाणं वगळून. ती अशीच कुठल्यातरी काळात लिहून झाली. चांगलं-वाईट घडतं त्याला प्रतिसाद म्हणून अशी बिलकुल समजूत करून घेऊ नये. मीही तशी करून घेतलेली नाही. निदान कविता लिहिल्यामुळे मी शाबूत तरी राहिलो. नाहीतर भलत्याच गोष्टी घडण्याला वाव असतोच. मागचं-पुढचं कुणाला काय माहित असतं ! 
मंगेश नारायणराव काळे या कवी-चित्रकार माणसानं कधीतरी ते चालवत असलेल्या 'खेळ' या अनियतकालिकासाठी या कविता छापण्यासाठी मागवल्या. त्या अंकात आणखी एक कविता होती, ती मात्र इथं या पोस्टमध्ये जोडलेली नाही. पुढेमागे कधीतरी तीही पोस्टेनच.
एवढं पुरे. ठीकाय. 

***




1. स्वप्नात लोळतात सप्तरंगी गालिचे 

पूर्वार्ध : 

स्वप्नात लोळतात सप्तरंगी गालिचे 
नवेनवे हवेहवेसे उबदार बिनखर्चाचे 
कठोर डोळ्यात खुपसतो ऐषोआरामी हळहळ 
विसरतात रडणं फुटले डोळे पंचविशीचे 
टपकतात खत्रूड उडाणटप्पू कळप 
आलिंगनी आभाळ छाताडी धडधड गरजते
केसाळकातडं लुसलुशीत लसूणफोडणी 
बत्तीशी तोंडात जुलूस उजागर खमंगतो
मध्यांतर : 
वाडवडला महापुरुषा आज्यापणज्या ठिकाणदारा 
मालका गणपतीबावा गजानना उभा ऱ्हा ज्याची करणी 
त्याच्या मस्तकी आपट आणि सुखात ठेव बावा म्हणत 
बाप ओवाळतो अगरबत्ती रोज आंघोळ करून 
उत्तरार्ध : 
नस्तो कोणकुणाचा आपले आपण अस्तो एकटे 
एकट्याच्या अवतीभोवती एकट्याचा फापटपसारा 
रांत्रदिन मृत्यू मुकाबला भयभीत डोळ्यात उजाडते सकाळ 
कुरतडतात आवाज क्षणाक्षणाचे क्षण बेमालूम 
टरकवतात घटका झोप आणि पान गळतं दिशाहीन 
नित्यनियमाने घोरतात नाकपुड्या विलक्षण डेंजर 
वळवळतो हव्यासभर च्यायचा घोडा निमूटपणे 
स्टिलच्या कपात कोऱ्या चाईत बुडबुडतो पुडा पार्लेजीचा  
बुचकळतो बादलीभर पाण्यात मरतुकडं शरीर खात 
गटांगळ्या इचकत चावतो दात पेलतो शिव्या अफलातून 
भरपगारी खळखळतो चिल्लर कंगाल महिना
फाटका खिसा फाटकं नशीब खिदळतं निष्ठावंत तोऱ्यात 
स्वप्नात लोळतात सप्तरंगी गालिचे 
नवेनवे हवेहवेसे उबदार बिनखर्चाचे 

***

2. मुसळधार पावसाळी आकृतीत अर्थात विस्कळीत आत्मचरित्रात्मक नोंद 

१. 
मुसळधार पावसाळी आकृतीत 
वाजतात तीनतेरा 
निरामय डोळे विरघळतात कपाळी जीभ बोबडी पडते 
२. 
भाडोत्री खूणगाठ विस्फारते 
चकणाचुर भिंतींना 
मोरीत तुंबतात खरकटी शीतं 
३. 
तुडुंब पाण्यात 
बुचकळतो शरीर डोईवर 
तांब्याभर पाणी मांडी घालून 
४. 
रैवारच्या जिभेला सुटते खाज 
दाल्दीनीला पाचपन्नास शिव्या घालून 
उर्मट दात चाटतात जिभल्या 
५. 
तिनसांच्याला कपाळाला लागतो हात 
पिढीजात वंशावळ 
उगवते दुष्काळ डोळ्यात 
६. 
बसल्या तटावर भोवळ आणते 
डेरेदार मिजास 
एन्टायमाला ठसका लागतो 
डोळे ओतायला लागतात 
ही यातनांची लंबीचौडी पिलावळ 
७. 
उजाडताना ह्या भुरटभुरट 
सकाळी गिरवतात 
उभ्या दिवसाला गच्च माथ्यात 
८. 
कुठल्याही दवाउपचाराने शांत होत नाही 
ही शरीर पोखरत चाल्लेली कीड अथवा 
नष्ट होत नाही तीचं दर्शनी कवडीइतकं नामोनिशाण 
९. 
कुठल्याच प्रहरी मान वर करवत नाही 
घरच्यांच्या तोंडात दर्वळतात 
सरकारी नोकऱ्यांचे फॉर्म 
उपसतो ही अनाठायी शैक्षणिक उलाढाल 
१०. 
हे भव्य आभाळ डोईवर 
मिऱ्या वाटायला लागतं 
दिशाहीन गलबत हेलपाटतं समतोल कक्षेत 
११. 
अंथरुणात कुबट वास शिरतो 
नाकाला सवयीचा होतो 
पाय कुजतात हळद लावून सकाळी 
शरीर उभं पायांवर मर्जीत 
१२. 
रात्री पाय एकमेकांवर चढतात 
नखं टोचतात डोक्याला डोकं लागतं 
आणि डोळे झिरमतात किन्न काळोखात निमूट कंटाळून 
रेशनचे गहूतांदूळ पाखडून चारघास खातात पाचसा तोंडं 

***

3. निरोपाचं गाणं 

आपण एकमेकांपुरते एकमेकांसाठी होतोनव्हतो 
तारांबळ क्षणिक घटकेपुरती 

धांदल जवळीक उताणी अर्धचंद्र 

शिफारशी नामंजूर बेदखल सहेतुक 
डोळे वितळत डोंगराळ गालफडांवरून 

गर्जत आक्रोश कानठळ्या बेशुद्ध वाचा गेली 

स्पर्श कोलमडले गोठीव स्तनांवर
हातापायातडोक्यात मुंग्या वळवळल्या तात्पुरत्या 
दिगंतर चावत नखांवरनखं 

मधल्यामध्ये जीभ साकंडली रक्ताची थुंकी पोटात गेली

येजाकरत राहिलीस डेरेदार नखऱ्यात 
हुलकावणी फाजील क्षणिक सोहळ्यात 

खुपत संपत उरत गेलीस थंडअखंड डोळ्यात 

कस्मेवादे धुपूत गेले 
नावाच्या शपथा चुलीत गेल्या 
भेटण्याच्या जागी गवताळ प्रदेश वाढले 

झाड झाड राहिलं नाही 
पाणी पाणी राहिलं नाही 
नाही मातीचा सुगंध सुगंध राहिला 
तरी शरीराचे गुणधर्म बदलले नाहीत 

नाही होकार - नकारातलं मौनव्रत सुटलं शेवटच्या क्षणी 

ओठांवरओठ थर्थरले 
अवाक्षर डोळे निथळत हातातले हात सुटले 

***