![]() |
होस्टेलच्या खिडकीतून पहिल्यांदा बर्फ पडताना पाहिला ती जागा ! |
माझ्या इन्स्टा हॅण्डलवर ( @Khada_Khod ) आणि इनबॉक्स, वॉट्सऍपवर माझ्या सोलो प्रवासाविषयी काही मित्र मैत्रिणींचे प्रश्न असतात. त्या सगळ्यांना एकत्रित उत्तर देण्यासाठीची ही नोंद :
मिळेल तेथे पाणी प्यालो;
जुळेल तेथे खूण जुळविली
तरि होतो हा तसाच उरलो !
![]() |
ट्रेनमधील आवडती सीट. साईड लोअर ! |
ज्या प्रदेशात मी प्रवास करतो त्याविषयी आधी मॅपिंग करतो. हवामान, प्रवासाची लोकल साधनं, खानपान, भाषा, ऑफबीट स्थळं, टाळायचं काय आणि मुख्य म्हणजे गेल्यानंतर काय काय करायचं ते नोट्समध्ये नोंदवून ठेवतो. Vlog पाहून मी फिरायला जात नाही. हे जेवढं टाळाल तेवढा तिथं गेल्यानंतर भ्रमनिरास होत नाही. स्वतःला कोसत बसता येणार नाही. मग मला याची माहिती कशी मिळते ? तर प्रत्येक राज्याच्या टुरिझम खात्याकडून आणि काही अतरंगी भटक्या लोकांकडून जे फक्त फोटो आणि रिल्ससाठी फिरायला जात नाहीत. काही रेफरन्स पुस्तकं असतात, पॉडकास्ट आणि ब्लॉगही असतात. त्यावरून आपल्याला जे उपयोगी आहे आणि जे करायला आपल्याला झेपणार आहे तेवढंच मी माझ्यापुरतं स्वीकारतो.
राहतोस कुठे ?
झोस्टलची ( Zostel ) साखळी अक्ख्या भारतात प्रत्येक शहरात विखुरलेली आहे. कमाल क्राउड, वाईब आणि खाणंपिणं सगळं टापटीप. त्याचबरोबर होस्टेलर ( The hostellers ) मूसटॅच ( Moustache ) आणि गोस्टॉप ( goStops) यांच्या शाखाही बहुतांश शहरात आहेत. मी या सगळ्या साखळ्यांचा वापर केलेला आहे. काही जागांवर पुनःपुन्हा राहिलोय नव्या ट्रीपमध्ये. कोची बिएनालेला गेलेलो तेव्हा मध्येच वाट चुकवून अलेप्पीला गेलेलो तिथं goStops मध्ये राहिलेलो. काय कमाल जागा. माझ्या बालपणीच्या शाळेतल्या वर्गात घेऊन गेलेली ही जागा. या जागा प्रामुख्याने सोलो ट्रॅव्हलर्स साठी तयार झालेल्या आहेत. या व्यतिरिक्तही काही जागा मार्केटमध्ये आहेत जे यांच्यासारखी सेवा देतात. मी जयपूर लिट फेस्टला जातो तेव्हा 'No horn OK please' नावाच्या हॉस्टेलमध्ये राहतो. मला तिथली शांतता खुणावते. वाचणं, नुसतं पडून राहणं, नव्यानं ओळख झालेल्या भटक्यांशी बोलणं, कॉफी पिणं, गाणी ऐकणं. बस्स बाकी काही नाही.
गोस्टॉपच्या जागेबद्दल त्यावेळी एक नोंद केलेली. ती इथं देतोय :
![]() |
शाळेतल्या वर्गासारखी जागा. goStops,केरळ. |
''अल्लेप्पी / आलपूळा / आलपुझाला जायचं एक कारण म्हणजे ते फोर्ट कोचीपासून एकदिड तासावर होतं. फोर्ट कोचीवरून एर्नाकुलम पर्यंत सहा रुपयात फेरी. नी तिथून पन्नास रुपयात अल्लेप्पी. तिथं राहण्याचा काही प्लॅन नव्हता. दुपारपर्यंत छोट्या कॅनलच्या कडेनं थोडं चालायचं नि लाईटहाऊस, थोडं समुद्रावर रेंगाळून पुन्हा संध्याकाळी कोचीला जायचं असं ठरलेलं. स्टेशनपासून समुद्रावर चालत जात थोडं पुढं गेलो तर कलन रोडला एक जुनी दुमजली इमारत दिसली. शाळेसारखी. ते गोस्टॉपचं झोस्टेल होतं. थोडं आत जाऊन पाहिलं तर आठवणी फार मागे शाळकरी वयात गेल्या. गावात फक्त चौथीपर्यंत शिक्षण झालेलं. गोस्टॉपचं झोस्टेल पाहिल्यावर पांढऱ्या निळ्या रंगातळी गावची शाळाच डोळ्यात उभी राह्यली. आठवणींना मागे टाकून पुढं सरकता येईना. लगेच एअरबीएनबी बुकिंग चेक केलं तर फक्त तीनशे रुपये रात्र दर होता. बुक करून टाकलं. माझा बेड वरच्या मजल्यावर होता. खूप मोकळी जागा असलेला. दार-खिडक्या निळ्या रंगातल्या. पांढऱ्या दगडी भिंतींवर उठून दिसणाऱ्या. सॅक टाकून पूर्ण खोल्या फिरलो. बाहेर व्हरांड्यातून समोर पाहिलं तर शाळेतल्या वर्गांच्या रचनेसारखी रचना. मधल्या सुट्टीतला टोल वाजल्यावर तुडुंब पोरं वर्गाबाहेर पडतानाची भराभ्भर हालचाल एकाएकी डोळ्यात तराळली. अशा वेळी फक्त उभं राहून जागेचं म्हणणं ऐकून घ्यावं. अनोळखी जागा खूप आपुलकीनं बोलतात. परिचित नसल्या नि स्वतःच्या अवकाशाबाहेर कुठंही त्या असल्या तरी स्वतःचा मूळ स्थायीभाव त्या विसरत नाहीत. त्यांचं नेचर कमालीचा जिव्हाळा रुजवतो आपल्यात.
एका दिवसात परत कोचीला निघून जायचं असं ठरवून आलेलो मी. दोन दिवस या जागेत राहिलो. पहाटे लवकर उठून चाललो समुद्रावर जाऊन काप्पा खाल्ला. त्यासोबत सेल फिश. काप्पा आधी रताळ्यासारखा वाटला. पण नंतर जाणवलं यात रताळ्यासारखा गोडसरपणा नाहीय. याची चव कम्प्लिट वेगळीय. बटाटा आणि रताळं याहून निराळी. हाऊसबोट वगैरे प्रकार करायचा नव्हता. एकतर प्रचंड महाग आणि ती भरपूर पाणी पोल्यूट करते. छोट्या होड्या घेऊन खूप आत आत जायचा विचार केलेला पण नंतर पायीच फिरलो. मग या वास्तूच्या व्हरांड्यात भरपूर चाललो. शांत बसून राहिलो. दोनतीन पुस्तकं आणलीयत सोबत. कुठलंही पानं वाचलं जाईल तिथपर्यंत वाचत राहिलो. मुकुल ऐकला. सायंकाळी नऊला सगळं शांत पडतं. कुत्रे रस्त्यांमधोमध अंग टाकून झोपतात. तरी डेरिंग करून अकरा पर्यंत फिरत राहिलो.
मुन्नारला निघताना उलट्या पावलांनी इमारतीकडं बघत स्टेशनपर्यंत आलो. जागा सुटली. आठवणी तेवढ्या बिलगल्या.
आपण कधीही काही विसरायला नको च्यायला.''
***
अशीच एक आठवण फोर्ट कोचीत राहिलेल्या जागेची आहे. त्यावेळी नोंदवून ठेवली होती. ती अशी :
'' या इतक्या गोड हसतायत ना त्या नितु आहेत. फोर्ट कोचीला त्यांचा नाद नावाचा कॅफे आहे एक्स हॉस्टेलमध्ये. दिल्लीत वाढल्या,शिकल्या. एमबीए केलंय. त्यानंतर रॉयल एन्फिल्डमध्ये काही महिने काम. डोकं बिझनेसचं असल्यानं फार टिकल्या नाहीत. म्हणतात, ‘मी इंटरव्ह्यू मध्ये खरं बोलायचे. कदाचित खरी उत्तरं मार्केटिंगमध्ये चालत नसावी. माणसांना फसवणं मला जमलं नाही.’
![]() |
नितुचा कॅफे. हंस नाद. फोर्ट कोची. |
नितुला एक मुलगी आहे. यंदा दहावीत आहे. तबला शिकते. नितु कबीराचे दोहे कंपोज करते. दर रविवारी मायलेकी गुरुद्वार किंवा मोकळ्या जागेत कबीर गातात.
मी फोर्ट कोचीला उतरून पहिल्या दिवशी संध्याकाळी थोडं झोपून संध्याकाळी बाहेर आलो तर कॅफेत नितु गाणी गात होती. थोडावेळ बसून राहिलो. गाण्यातले शब्द उच्चारत तिची किचनमध्ये धावपळ सुरु होती. कॉफी घेतघेत भरपूर बोललो.
आता मुन्नारहून परत आलोय फोर्ट कोचीला. दुपारी तिच्याकडे कॉफी टाकली. म्हणाली, शाम को आना, खाना बनाके रखूंगी. पुढ्यात तिने डाळभात वाढलाय.
बड़ी मुश्क़िल से मगर
दुनिया में दोस्त मिलते हैं
दीये जलते हैं
मागे सुरूय नि तीही त्यात रमून गेलीय. किचनमधील तिची पळापळ अजूनही सुरूय.''
***
किती खर्च असतो या जागांचा ?
![]() |
होस्टेलरच्या खिडकीतून. मनाली. |
फक्त पाचशे- सहाशे. कोचीत तर मी चारशेच्या दराने राहिलोय. अर्थात विकेंडला किंमती वरखाली होतात. पण त्याचा फार लोड नसतो. एक टीप देतो. आयफोनवरून बुकिंग न केल्यास किंमत आणखी खाली जाते.
ही डॉर्म्स नोंदणी मी कुठे करतो किंवा जागा शोधतो कशा ?
Booking.com किंवा Airbnb हे दोन पर्याय मी वापरतो. आत्ता केवळ Booking.com वापरतो. कारण गेल्या चार वर्षांपासून सतत एकाच साईटवरून बुकिंग केल्यानं त्यांच्याकडून मला जिनिअस डिस्काउंट मिळतो. ( 15%) कधीकधी हॉस्टेलमध्ये त्या किंमतीत नाश्ताही समाविष्ट असतो. फक्त होमस्टे हवा असल्यास Airbnb वापरतो. या साईट्सवर आपण जिथं राहणार आहोत तिथल्या जागांचे फोटो असतात, तिथं राहिलेल्या लोकांचे रिव्ह्यू असतात. बुकिंग करण्याआधी ते थोडं पाहून-वाचून घ्यावं.
प्रवासाची साधनं काय ?
ज्या भागात आपण जातो शक्यतो तिथले लोकल पर्याय वापरावेत. रिक्षा, उबर, रॅपीडो. कोचीत मी MYBYK वरून सायकल वापरलेली. आठवड्यासाठी नोंद करून घेतली. फक्त 35/- दिवस या दराने. सगळं ऑनलाईन. सायकल लॉकअनलॉकही QR कोडद्वारे व्हायची. जिथे हे पर्याय नाहीत आणि कार वगैरे रेंट करायचीय अशा वेळी मी हॉस्टेलमधील पोरं शोधतो जी माझ्यासारखीच टूरिस्टीक स्पॉट टाळून वेगळं भटकतात. मग त्यांचा एक वॉट्सअप ग्रुप करायचा आणि प्रत्येकाने त्यात होईल तो खर्च नोंदवत राहायचा. संध्याकाळी कॅफेत लगेच खर्च समान भागामध्ये स्प्लिट करायचा. Splitwise नावाचं ऍपही आहे यासाठी. ( मला हे जयपूरमध्ये ओळख झालेल्या आणि माझ्याच तालुक्यातील असलेल्या मैत्रिणीमुळे समजलं )
प्रवासात असताना एक डायरी बाळगा. त्यात महत्त्वाच्या आणि जवळच्या लोकांचे नंबर असावेत. आपला पत्ता असावा. काही सूचना वगैरेही चालतील. माझ्या डायरीच्या पहिल्या पानावर अशी नोंद आहे :
आतला मजकूर वाचावा वाटला तर वाचावा. डायरी स्वतःशी ठेवावी वाटली तर ठेवायलाही हरकत नाही.
माझ्या आठवणी कुणाकडेही कुठेही सुरक्षित राहिलेल्या मला चालतील."
बॅगपॅक कोणती वापरतोस ?
केशुआ ( Quechua ) या कंपनीची 60 लिटरची बॅगपॅक वापरतो. कारण ती लाइटवेट आहे. किंचित पावसातही ( रेन कव्हर न वापरता ) फॅब्रिक कोटेड असल्यानं भिजत नाही. आणि मुख्य म्हणजे माझ्या 7 ते 15 दिवसांच्या प्रवासातलं सामान त्यात व्यवस्थित मावतं. आणि तिच्यावर 10 वर्षांची वॉरंटी आहे. किंमत मी घेतली तेव्हा साधारण 15 हजार होती.
किती रुप्ये साधारण उडवतोस ?
माझा खर्च तसा फार नाहीय. दारू सिगरेट आणि गर्लफ्रेंडच व्यसन नसल्यानं मला तसा फार खर्च नाही. काळी कॉफी काळी टीशर्ट महिन्यात दोनचार पुस्तकं बस्स. तरी प्रत्येक ट्रिप 12-15 हजार बजेट असतं. आत्ताची दिल्ली-आग्रा-मनाली-कसोल ट्रिप याच बजेटमध्ये बसली.
का फिरतोस ?
मी मूळचा भटका आहे. आमचं बिऱ्हाड असंच कुठूनतरी निघून कुठंतरी उभं राहिलं कोकणात. पाण्याच्या आसऱ्याला त्यांनी आपला ठावठिकाणा थांबवला. नि मला नव्या जागांचा मोह आहे. शहरात सलग राहणं मला जमत नाही. दर तीनेक महिन्यांनी मी घराबाहेर पडतो. कधीकधी जिथं जायचंय ते ठिकाणही निश्चित नसतं. मला माणसांमध्ये सुरुवात करून देण्याएवढं बोलायला आवडतं. नंतर प्रदीर्घ ऐकायला आवडतं त्यांचं बोलणं कसंही आडवंतिडवं. माझ्या फिक्शनमध्ये यातलं काहीतरी येतं. मला ते जाणीवपूर्वक आणायला आवडतं त्यांच्याच भाषेत. मला ते सगळं माझं वाटतं. त्यांचे दुःखद हसरे चेहरे स्वप्नात येतात माझ्या. मी यासाठी तळमळत असतो. माझी माया आहे त्या सगळ्यावर.तर मी असा भणंग उंडारतो. घरचे मला भैकू ( उनाड, घरादाराची काळजी नसलेला ) म्हणतात.
मला ते अगदीच मान्य आहे.
***