साभार : लोकायन, बिकानेर |
कबीर.
मूळ अरेबिक शब्द. ज्याचा अर्थ होतो श्रेष्ठ, महान.
कबिरा तू ही कबिरु नाम तू तोरे नाम कबीर ।
रामरतन तब पाइये जद पहिले तज शरीर ।।
असं स्वतः कबिरने स्वतःच्या नावाबद्दल एका दोह्यात म्हटलेलं आहे. एक आख्यायिका अशी सांगितली जाते की, कबीराचे वडील एका काजीकडे घेऊन जातात आणि विचारतात या मुलाचे नाव काय ठेवू ?
काजी कुराणची पोथी उघडतो आणि त्यात नाव शोधू लागतो. तो नाव शोधताना अचानक बाल कबीर उच्चारला 'मी आत्मस्वरूप आणि आत्मप्रकाशी आहे.'
काजी विस्मयचकित होऊन म्हणाला, या बालकाचे नाव कबीर !
कबीराच्या जन्माबद्दलही अशा कैक आख्यायिका सांगितल्या जातात. एका आख्यायिकेनुसार तो निमा-निरू दाम्पत्याचा पुत्र होता. लोकांच्या भयाला शरण जाऊन एका ब्राह्मण विधवेनं आपलं नवजात अर्भक एका तलावात सोडून दिलं. निमा- निरू दाम्पत्याला ते सापडलं आणि ते नवजात बालक घरी आणून त्याला वाढवलं. तर एक आख्यायिका तो प्रकाशकिरणांतून साकारला असं सांगते तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार एका तलावातील कमलपुष्पात कबीराचा जन्म झाला. निर्णायक पुरावे नसल्याने या आख्यायिकांना फारसा अर्थ उरत नाही. पण यातील दोन संभाव्य आख्यायिकांनुसार कबीर हा ब्राह्मण विधवेच्या पोटी जन्माला आला. तीने त्याचा त्याग केल्यावर तो निमा-निरू या मुस्लिम विणकर दाम्पत्याला एका तलावात सापडला. आणि दुसरी अशी कि तो मुस्लिम विणकर दाम्पत्याचाच पुत्र होता. या संबंधाने कबीर 'तू ब्राम्हण मैं काशिका जुलाहा.' असं आपल्या काव्यात म्हणतो. जुलाहा म्हणजे विणकर. तत्कालीन समाजात काही ठिकाणी जुलाहा ऐवजी 'कोरी' म्हणून उल्लेख केला जायचा जी एक विणकर जात होती. बनारसमध्ये बहुतांश विणकर हे मुस्लिम समुदायाशी संबंधित आहेत. डॉ. हजारीप्रसाद व्दिवेदींच्या मते कबीर 'जुगी' किंवा 'जोगी' जातीचा होता. 'जुगी' किंवा 'जोगी' हे इस्लाम धर्माचा स्वीकार केलेले विणकर होते. वर्णसंकरामुळे ज्या पोटजाती निर्माण झाल्या त्यापैकी एक 'जुलाहा ' हि एक जात होती. इस्लामच्या छळाला बळी पडून वा तो चुकवण्यासाठी ज्या अनेक जातींनी सामूहिक धर्मांतर केले त्यापैकी ही एक जात होती. असं डॉ. व्दिवेदीचं संशोधन सांगतं. असं असलं तरीही स्वतः कबीर या बंधनात अडकलेला दिसत नाही. जाती-धर्माला त्याने महत्त्व दिलेलं दिसत नाही.
कबीर. रेखाटन : मिलिंद कडणे |
असं कबीराने एका पद्यात म्हटलेलं आहे.
ज्याच्या जन्माबद्दल, जन्मस्थळाबद्दल आणि निर्वाणाबद्दल अनिश्चितता आणि कैक मतमतांतरे आहेत असा हा कवी आणि तत्वचिंतक हिंदी साहित्याचं फार मोठं दालन व्यापून आहे. तुकोबांची गाथा जशी लोकांच्या मुखोद्गत होती, तिने काळाच्या सीमेची बंधनं नाकारली आणि हवेच्या प्रपातासारखी सर्वदूर पसरली अगदी त्याचप्रमाणे कबीराची रचना सर्वदूर पसरलेली दिसते.
मसि कागद छुयो नहीं, कलम गही नहीं हाथ ।
चारिउ जुग को महातम मुखहि जनाई बात ।।
हातात लेखणी न घेताही केवळ वाणीने धार्मिक कटुतेचं, स्व आणि शरीर यांच्या संबंधांचं, धर्म आणि अंधश्रद्धामूलक आचारांचं, मुक्ती आणि बंधन यांचं आणि मानवी स्वभावगुणांचं माहात्म्य सांगणारा हा कवी नावाप्रमाणेच महान आणि श्रेष्ठ होता. त्याचं हे श्रेष्ठत्व जपणाऱ्या, त्याच्या रचनांचा प्रसार आणि संवर्धन करणाऱ्या एका लोकसंगीत यात्रेत मी यात्री म्हणून ऑक्टोबर २०२२ मध्ये सहभागी झालो होतो. कबिरच्या रचनांचं आकर्षण हे एक कारण होतंच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं कारण होतं ते देशभर विविध प्रांतात जात-धर्म-वर्ण यांच्या सीमा ओलांडून लोकसंगीताद्वारे कबिर गाणारे लोकगायक. आणि ती यात्रा होती 'राजस्थान कबीर यात्रा' .
राजस्थान कबीर यात्रेतली एक संध्याकाळ . फोटो : लोकायन |
पद्मश्री प्रहलाद सिंग टिपानिया भारत जोडो यात्रेत कबीर गाताना. फोटो : गुगल |
खबर करो अपने तन की
कोई सदगुरु मिले तो भेद बतावे
खुल जावे अंतर खिड़की
प्रहलाद
सिंग टिपानिया हे कबीर गाणारे भारतातील लोकप्रिय लोकगायक आहेत. मालवी शैलीतील लोकपरंपरेतील
गाण्यांद्वारे त्यांनी ४ दशकांहून अधिक काळ ग्रामीण, शहरी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर
कबीराचा संदेश आणि कार्य पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मध्य प्रदेशातील
लुनियाखेडी हे त्यांचं जन्मगाव. आई-वडील अशिक्षित. त्यामुळं त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक
शिक्षण आजीकडे इंदोरला झालं. तिथेच त्यांनी इतिहास विषयात एम. ए केलं आणि लुनियाखेडी
या त्यांच्या गावी ते शिक्षक म्हणून सरकारी शाळेत रुजू झाले.
१९७८ साली वयाच्या २४ व्या वर्षी देवास येथील एका कार्यक्रमात त्यांनी लोकवाद्य तंबुराची धून ऐकली. देवासमधील भजनी मंडळीत ते तंबुरा शिकू लागले आणि शिकता शिकता गाऊही लागले.
बलद्यान दुःख ना दिजे
अवसर खेत बीज मत बोजे
उंची संगत नाहर भुगतावे घरे बैठू रीजे
मन तू ऐसी खेती कीजे
तंबुरा
शिकतानाची एक आठवण सांगताना ते म्हणतात -
''ये भजन गाकर मैं जब तंबूर सिख रहा था, तब मैने ये घटना प्रत्यक्ष रूप में देखी और मेरे अंदर का कचरा दूर हुआ. कि ये केवल गाना नहीं हैं, ये प्रकृती मे घटित होने वाली घटना हैं. और हमारे सबके जीवन का एक प्रत्यक्ष दर्शन हैं. तब मुझे इस सन्तोके वाणी के साथ रुजान, लगाव और श्रद्धा हुई. मैं कोई गायक नहीं हू, परंतु संतो कि वाणी को मैने जिस लोगोंसे सिखा उसे मैं अपने तोरतरीकेसे गाता हूँ. ''
घरंदाज गायकीची कुठलीही पार्श्र्वभूमी, परंपरा नाही. मालवी शैलीतील लोकगीतं, मौखिक परंपरेची सशक्त परंपरा आणि तंबुराची विलक्षण गहिरी धून सोबत घेऊन अध्यात्मिक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कबीराला सोबत घेऊन ते गावोगाव गाऊ लागले. माळवा प्रांतातील लोकगीतांच्या मौखिक परंपरेला चालना आणि श्रेय हे टिपानिया यांच्या गाण्यामुळे मिळालं असं नम्रपणे लुनियाखेडीतली माणसं सांगतात. असं असलं तरी प्रहलाद सिंग टिपानिया यांना स्वतःच्याच गावात सामाजिक भेदभावाला सामोरं जावं लागलं होतं. कथाभागवतच्या एका कार्यक्रमात त्यांना जेवणाचं निमंत्रण होतं. पण निमंत्रण असूनही अन्न आणि पाणी त्यांना दुरून वाढण्यात आलं. त्यांची भांडीही वेगळी ठेवण्यात आली होती. असा उल्लेख शबनम वीरमणी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'चलो हमारे देस' या माहितीपटात आढळतो. त्या प्रसंगापासून ते गावातील कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. त्यांनी स्वतःला गाण्याभोवती बांधून घेतलंय. असं त्यांची पत्नी शांती टिपानीया म्हणतात.
पद्मश्री प्रहलाद सिंग टिपानिया. फोटो : लोकायन. |
असं म्हणत प्रहलाद टिपानिया पुन्हा भजन गायला दुसऱ्या गावी निघून जातात.
प्रहलाद टिपानिया यांनी माळव्यातील ग्राम सत्संग परंपरेसोबत मिसळून कबीराच्या काव्यातील अध्यात्मिकता आणि सामाजिकविचारांचं तत्वज्ञान अत्यंत सहज आणि रसाळ भाषेत लोकांपर्यंत पोचवलं. कर्मकांड, मूर्तिपूजा, पंडितांचा ढोंगीपणा, जातीय शोषणआणि धार्मिक ध्रुवीयकारणावर कबीर ज्या तीक्ष्णपणे खिल्ली उडवून त्यातलं मागासलेपण दाखवून निषेध करतो त्याच आवेशातटिपणीया गावोगाव फिरून भजनांमार्फत जागृती करून कबीरांच्या विचारातली सत्यता गेली 30 वर्षे पोचवत आहेत.
कबीराचा काळ हा धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्याही अराजकाचा, उन्मादाचा काळ होता. इस्लामचं आक्रमण सुरु झालेलं होतं. धार्मिक आणि राजकीय सत्ता हस्तगत करण्याची आकांक्षा बाळगून जोरजबरदस्तीने धर्मप्रसार होत होता. कबीराने या आक्रमक आणि उन्मादी काळाचं बारकाईने निरीक्षण केलं होतं. त्यामुळंच हिंदू-मुसलमान धर्मांपैकी त्याने एकालाही जवळ केलेलं दिसत नाही. दोन्ही धर्माच्या रूढ संकल्पनांना आणि आचार-विचारांना त्यांनी छेद देऊन प्रखर टीका केलेली दिसते. संन्यासी, फकीर, जोगी, जंगम, नाथपंथी, मुल्ला, मौलवी, सुफी असे कैक पंथ, त्यांचे आचारविचार, उपासनामार्ग असताना कबीराने यापैकी कुठल्याच पंथात स्वतःला बहाल केलं नाही. त्यामुळं त्यांच्या आचारविचारांवर, रूढ धार्मिक कर्मकांडावर, त्यांच्यातील अहंकार आणि दंभावर मोकळी टीकाकरण्याचे स्वातंत्र्य त्याला घेता आले. कुणात सामावलं न गेल्यामुळं त्याची टीका प्रखर, अत्यंत तीक्ष्ण आणि भेदक ठरली. 'जाति न पूछोसाधू की' हे कबिरने दिलेलं मार्मिक उत्तर तत्कालीन 'पाखंडी'यांची मुळं उद्ध्वस्त करणारं ठरलं. यापुढे जाऊन कबिरने त्यांना विचारलेला प्रश्नही भेदक आणि मार्मिक आहे –
खुदा और राम दोनों बसते हैं
पर जहाँ न मस्जिद हैं न देवता
वहाँ कोन समाया हुआ हैं ?
कबीर केवळ कवी नाही तर तत्वचिंतक आहे. त्यामुळं तो ईश्वराला एका संकुचित कक्षेत बसवत नाही; तर त्याला अमूर्त रूप देतो. कबीर इस्लामच्या एकेश्वरवादाच्या आणि हिंदूंच्या अनेकदेवतावादाच्या कक्षा ओलांडून मोकळा होतो. तो अल्लाचा उरत नाही, नाही रामाचा. तो फक्त 'सत्य' या तत्वात सामावतो.
आपल्याच वर्तुळात राहणार तो गूढवादी कवी नव्हता. म्हणूनच कबीर जनसामान्यांपासून दूर जात नाही. धर्माच्या नावावर होणाऱ्या अनिष्ट रूढी आणि त्यातल्या खोटेपणाला तो वारंवार धक्के देत राहिला. अशा काळात जिथे बिद्धीप्रामाण्यवाद दुर्मिळ होता. प्रस्थापित धर्माला विरोध हे मोठं पातक समजलं जायचं. कबिरने हे नेटानं आणि निकडीनं सुरु ठेवलं.
प्रहलाद टिपानियांनी लुणियाखेडीत आपल्या घरासमोर सद्गुरू कबीर स्मारक' उभारलं आहे. गावातील अधिकाधिक लोक कबीराच्या विचारांशी जोडले जावेत, त्याच्या रचनांच्या गायनाचे कार्यक्रम व्हावेत हा यामागचा उद्देश. या स्मारकात कोणतीही मूर्ती नाही. कबिरची ना अन्य कुणाची. टिपानिया म्हणतात, "ये स्मारक कबिरकी याद हैं. मूर्ती नहीं हैं क्यू कि कबीर खुद मूर्तिपूजा मानते नहीं थे. ईश्वर तो आकार से परे हैं. मूर्ती होती तो लोग टीका लगाने आ जाते. पैसा देते. और मैं इस स्मारक का पुजारी हो जाता!"
1997
साली कबीरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी प्रहलाद टिपानिया यांनी 'कबीर स्मारक
शोध संस्थान' ची स्थापना केली. त्याअंतर्गत वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
कबीरांच्या रचनांचा अर्थ आणि प्रासंगिकता सांगणाऱ्या निवासी कार्यशाळा होतात. गरीब
मुलांना निःशुल्क शिक्षण देणारी एक शाळा या संस्थेतर्फे चालवली जाते. माळवा आणि आजूबाजूच्या
प्रांतात वसलेल्या कंजर समाजात जनजागृतीसाठी कबीर भजनांचे कार्यक्रम प्रहलाद टिपानिया
करतात. त्या समूहाच्या विचारात परिवर्तन व्हावं म्हणून ते जाणीवपूर्वक त्यांना वाईट
वाटेल अशी भजनं गातात. आज त्या समूहात शिक्षणाचा प्रसार आणि त्यांचे बदलते विचार पाहून
या संस्थेचं कार्य योग्य मार्गावर आणि कबीरांच्या विचारांच्या दिशेने सुरु असल्याचं
समाधान ते व्यक्त करतात.
दरवर्षी
फेब्रुवारी मध्ये पाच दिवसांची लोकसंगीत यात्रा या संस्थानाच्या माध्यमातून आयोजित
करण्यात येते. जी 'माळवा कबीर यात्रा' म्हणून लोकप्रिय आहे. देश-विदेशातून लोक या यात्रेकरिता
माळव्यात जमतात. मौखिक परंपरेतून आलेली लोकगीतांचा ,कबीर आणि इतर अनेक संतांच्या काव्याचा
उत्सव म्हणजे माळवा कबीर यात्रा असते. लोकसंगीत आणि कबीराच्या तत्वज्ञानाचा खोलवर प्रभाव
असणारी असंख्य माणसं या यात्रेत जोडली जातात.
मध्य प्रदेशातील माळवा प्रांतातील मौखिक परंपरेच्या पुनरुत्थानासाठी आणि कबिरची वाणी व तत्वज्ञान देश-विदेशात जनसामान्यांपर्यंत पोचवण्याच्या महत्त्वपूर्ण आणि मौलिक योगदानाबद्दल प्रहलाद टिपानिया यांना 2011 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या संपूर्ण परिवारासह ते आजही अविश्रांत तळमळीने गावोगाव कबिरचं तत्वज्ञान, जात -पात आणि आजच्या धार्मिक ध्रुवीयकारणाच्या उन्मादी काळात अस्मिता विरहित माणूसपणाचा शोध घेत गाताना दिसतात. 'भारत जोडो यात्रे'त हातात तंबुरा घेऊन कबीर गाण्याचं ते धारिष्ट्य दाखवतात त्यामागे कबिरची त्यांच्यात झीरपलेली अंतर्दृष्टी आहे. प्रहलाद सिंग टिपानियायांनी कबीरांच्या काव्यातलं निर्गुण निराकाराचं, समतेचं सूत्र ओळखून त्याला आपल्या गाण्यातून जनसामान्यांपर्यंत पोचवलं. कबीराचे बोल कानात रुंजी घालतील अशा संस्मरणीय चाली त्यांनी कबीरांच्या भजनांना लावल्या.
तीरथ में तो सब पानी है, होवे नहीं कछु अन्हाय देखा ।
पुरान कुरान सबै बात है, या घट का परदा खोल देखा ।
अनुभव की बात कबीर कहैं, यह सब है झूठी पोल देखा ॥
प्रहलाद सिंग टिपानिया हा कबिराचं तत्व अंगीकारून शून्यतेच्या शिखरावर पोचलेला लोकगायक आहे. ज्याचा शोध 'सत्य' या सूत्राभोवती फिरतो. जे कबीराच्या समतेचं सूत्र होतं.
हमारे मिट्टी कि सुगंध सुनो भाई !
उदयपूरच्या दिशेने ट्रेननं बांद्रा स्टेशन सोडलं तेव्हा मी असं सगळं कायकाय डोक्यात घेऊन निघालो होतो. सरोवरांच्या शहरात फतेसागर लेकच्या शेजारी कबीर यात्रेचं उदघाटन होतं. कबीर मूर्तिपूजन किंवा दीपप्रज्वलन वगैरे असलं काही नाही. फक्त संगीत. पहिला दिवस गाजवला तो कच्छ च्या मुरालाला मारवाडा यांनी. मीराबाईचं भजन गाऊन त्यांनी सगळ्यांना अगदी चार्ज केलं.
नहीं जाऊं नहीं जाऊं सासरिये मोरी मां, हो रामईया!
पहाडी आवाजात सगळ्यांना थिरकायला लावणारा मुरालाला मारवाडा आणि त्याचे सोबती. फोटो : शोधण्यातली खाडाखोड |
मुरालालाला साथ देणाऱ्यांमध्ये एक वाद्य घडा-घमेला हे आहे. मी मुरालालाचं भजन संपल्यावर स्टेजमागे जाऊन त्यांना भेटायला गेलो तर अक्षरशः शेण भरण्यासाठी जे घमेलं वापरतो ते वाद्य म्हणून त्यांनी वापरलं होतं. त्यासोबत घडा. म्हणजे मडक्याच्या तोंडाला चामड्याचं आवर्तन बांधलेलं होतं. बोटात अंगठी घालून त्याची थाप घमेल्यावर आणि दुसऱ्या हाताने घड्यावर थाप मारली कि जो काही आवाज घुमतो तो अक्षरशः अवाक करणारा असतो.
हिए काया में वर्तन माटी रो, हिए देही में
साहिब हमको डर लागे एक दिन रो
एक ही रे दिन को, घड़ी पलक रो
नहीं रे भरोसो एक ही पल रो
हे
कबीराचे शब्द मुरालाला एरवी चढत जाणाऱ्या पहाडी आवाजाला बाजूला सारून संथ मधाळ आवाजात
निव्वळ घडा-घमेला आणि टाळ ( मंजिरा ) यांच्या साथीनं गातो तेव्हा अक्षरशः तंद्री लागते.
फतेसागरच्या
कठड्यावर गार वारा झेलत मुरालालाला बोलतं केलं तेव्हा कळलं, कि एका शिक्षकाने त्यांच्या
पुतण्याला मारहाण करतानाचं दृश्य बघितल्यावर त्यांनी पुन्हा शाळेत पाऊल ठेवलं नाही.
आठ वर्षांचे असताना त्यांनी त्यांच्या गावातील सत्संगाच्या
कार्यक्रमात पहिल्यांदा तंबूराचा आवाज ऐकला. तेव्हापासून शाळेत न जाता त्यांनी वडिलांकडून
आणि गावातील लोकगायकांकडून गाणे शिकले. त्यांना कोणतंही गाणं लिहावं लागलं नाही. अनेक वर्षांच्या सत्संगातून
आणि मौखिक परंपरेने जतन केलेल्या लोकगीतांमधून त्यांनी कबिरपासून मीराबाई ते बाबा बुल्लेशाह
यांचे कलाम त्यांनी आत्मसात केले. मुरालाला हे राजस्थानातील मेघवाल गायकांच्या वंशातील
आहेत ज्यांनी 350 वर्षांपूर्वी कच्छ येथे स्थलांतर केलं होतं. त्या वंशाचे मुरालाला
हे 11 व्या पिढीचे गायक आहेत.
त्यांचा देखणा तंबूर हातात घेऊन त्यांना म्हणालो, ये आपने कब बनवाया? तर मोट्ठ्यानं हसत ते म्हणाले, "भाई यें मैने नहीं बनवाया. मेरे परदादा के जमानेका हैं ये. अब डेढसो साल का हो गया हैं. बहुत यादें जुडी हैं हमारी इस तंबूर से."
मुरालालाचा तो देखणा तंबूर तब्बल दीडशे वर्ष जुना होता. अनेक पिढ्यांपासून त्याच्यापर्यंत वाहत आलेला हा संतांच्या विचारांचा प्रवाह होता. स्वतः अक्षर गिरवलेलं नाही पण पारंपरिक लोकगीतांपासून आजच्या बदललेल्या सांस्कृतिक परिवेशातही त्यांनी कबीर, मीरा, रविदास, ब्रह्मानंद, धर्मदास, बुल्लेशाह यांचे शब्द मुखोद्गत करून ठेवले आहेत. मातीबानी सारख्या उपक्रमाद्वारे त्यांनी परदेशातही आपला आवाज पोचवला आहे. कोक स्टुडिओ आणि काही चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत. ते आता स्वतःच्या मुलीला गाणं शिकवत आहेत. मेघवाल समूहाच्या परिवर्तनाचा दीडशे वर्षांच्या पिढ्यांचा साक्षीदार असलेला तंबूर त्यांनी आता तिच्या हातात सोपवला आहे.
अग्नि कहे मने टाट पड़त है, पानी कहे मैं प्यासा
थारी काया में...
कच्छच्या रणरणत्या उन्हात मुरालाला मारवाडा स्वतःला शोधण्याचा मार्ग शोधत आहेत. ज्याची वाट त्यांना कदाचित मुखोद्गत असलेल्या मौखिक परंपरेत सापडण्याची शक्यता आहे. हे मला वाटतंय. शोध वेगळा असू शकतो. तिथपर्यंत पोचणं वेगळं असू शकतं. 'पोचणं' काय अर्थाने आपण घेतो हेही व्यक्तिगणिक बदलत असावं. पण शेवटी शेवटी शोध उरतोच. काहीतरी सापडणं, गवसणं आपल्याला समूळ बदलू शकतं. पण हीही एक शक्यताच. मी थोडा अधिकाधिक गुंतत जातो नि गाडी पुढच्या गावाला निघते.
क्या खोजती फिरो म्हारी हेली ?
मेरे राम गाड़ी वाले
गाड़ी मेरी रंग रंगीली,
पईया है लाल गुलाल
हांकन वाली छैल छबीली,
बैठन वाला राम, ओ भईया
ज़रा हलके गाड़ी हांको
म्हणत
गाडी दुसऱ्या गावाच्या दिशेने रवाना झाली. यात्रेसाठी गावं अशी निश्चित केलेली असतात
जिथे धार्मिक सलोखा निर्माण करण्याची गरज आहे. राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने यात्रेच्या
स्थळांची निश्चिती होते. दरवर्षी राजस्थानच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात हि यात्रा फिरत
असते. यात्रेचा दुसरा मुक्काम होता सेई, साबरमती, पामरी, वाकल, दिवाव आणि कोसंबी या
नद्यांनी वेढलेलं कोटडा हे गाव. आमची बस नागमोडी वळणं घेत कोटडाचा घाट चढत होती. बसमध्ये
अनेक कविता, कथा, किस्से, एकमेकांची ओळख, भजनं यांचा मिश्र आवाज गर्दी करून होता. तीनशे
यात्रींना सोबत घेऊन फिरणाऱ्या दहा बस कोटडा सीमेत पोचल्या तेव्हा उतरल्या उतरल्या
गावकऱ्यांनी आमच्या गळ्यात हार आणि फुलांचा वर्षाव केला. मुस्लिम बांधव फळवाटप आणि
सरबत एकेकाच्या हातात देते होते. मी हे पाहून चक्रावलो. किती आपुलकीनं त्यांनी आमचं
स्वागत केलं. मग सगळ्यात पुढं लोकगायक मग सगळे यात्री अशी एकदिड तासाची वाजतगाजत मिरवणूक
पार पडली. फुलांचा वर्षाव आणि सगळ्यांचं मिळूनमिसळून नाचणं.
आम्ही पुन्हा येऊन बसमधल्या आमच्या बॅगा घेऊन निवासाच्या ठिकाणी आलो. ती व्यवस्थाही गावकऱ्यांनी केलेली असते. गावाच्या मोकळ्या सभागृहात किंवा शाळेच्या खोल्यात. गाद्या टाकलेल्या असतात. आपण जाऊन आपली बॅग त्यावर ठेवायची. म्हणजे आपली झोपायची जागा फिक्स झाली. दुसऱ्या गावाला निघताना अंघोळीला पाणी मिळेल का याचीही आपल्याला शाश्वती नसते. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था ज्या गावात यात्रा जाईल त्या गावातल्या गावकऱ्यांनी केलेली असते.
कोटडा गावात स्वागत करणारे गावकरी. फोटो : शोधण्यातली खाडाखोड |
रात्री साधारणतः दोनेक वाजता मंचावर आला मीर बसू खान. जैसलमेरच्या पुगल या गावातून येणारा मीर बसू हा सुफी आणि सराईकि गायक आहे. जन्मजात संगीताची कुठलीही पार्श्र्वभूमी नाही. त्याच्या सासऱ्याकडून त्याला संगीत मिळालं. मीर बसू हा जैसलमेरमध्ये ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतो. कबीर याच्यासोबत अमीर खुसरो, बुल्लेशः यांचे कलाम तो गातो. त्या रात्री त्यांनी अमीर खुसरो यांची लोकप्रिय कविता 'छाप तिलक'आपल्या सराईकि अंदाजात सादर केली. त्याला साथ दिली अब्दुल जब्बार यांनी.
वे सानु लई चल
संग बनीआए किस्मत नाल जा टिकटा दो लेले
ओह प्यार दि ये रीत निभायें
एक दुजे विच फर्क न पाए
बण दुख सुख दा
भाईवाल ते टिकटा दो लेले
म्हणत
मीर बसू यांनी ती रात्र गाजवली. मीर बसू जैसलमेरच्या अनेक गावात आज सुफी संगीत आणि
सराईकि गायकीतुन कबीर आणि इतर संतांच्या कविता आणि कलाम सादर करत आहेत. त्याबद्दल प्रशिक्षण
देत आहेत. मुंबईतील सहेज फाउंडेशनच्या माध्यमातून ते मुंबईसह भारतातील अनेक राज्यांमध्ये
गायनाचे कार्यक्रम करतात. जैसरलमेरमध्ये आज अनेक लोकगायक तयार झाले आहेत जे जात-धर्म-संप्रदाय
यांच्या पल्याड पाहून मौखिक परंपरेची लय जतन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मीर बसू खान. याच्या डोळ्यात पाहणं म्हणजे थरार असतो. फोटो : लोकायन |
सरायकी भाषेचे मूळ मुलतान
पाकिस्तानात आहे. आजही सिंध प्रांत, दक्षिण पंजाब, बलुचिस्तान मध्ये ही भाषा बोलली
जाते. मीर बसू खान, मुख्तियार अली, मीर रझाक या भाषेत गातात. पुगल हे त्याचं गाव पाकिस्तान
बॉर्डरपासून काही किलोमीटरवर आहे. पुगल पासून 150 किमी च्या क्षेत्रात सरायकी बोलली
जात असल्याचं ते सांगतात. ही भाषा त्याच्यापर्यंत पोचली ती ख्वाजा गुलाम फरीद यांच्या
'काफ़ी' तुन. काफ़ी म्हणजे चार-पाच ओळींची पदं. सरायकी गायकी ही ख्वाजा गुलाम फरीद यांच्या
काफ़ीची देण असल्याचं ते सांगतात. कारण या काफ़ी म्हणजेच संगीताचं एक स्वतंत्र रूप आहे.
उर्दू, पंजाबी, फारसी आणि मारवाडी या भाषांचं मंथन म्हणजे सरायकी गायन. कबीर यात्रेत
त्यांनी गायलेलं 'दो टिकटा' हे गाणं सरायकी-पंजाबी भाषेतलं लोकगीत आहे. या भाषेचा ध्वनी
हा सिंधी भाषेशी मिळताजुळता आहे. अताउल्लाह खान एसा ख़िलवी, पठानय खान, आबिदा परवीन
,उस्ताद मुहम्मद जुमान, मंसूर मलंगी, तालिब हुसैन दर्द, कमाल महसूद इत्यादी गायकांनी
सरायकी लोकगीतांचं गायन केलेलं आहे. सरायकी भाषेला पंजाबीची बोली म्हणून काहीजण मानतात.
परंतु ही एक स्वतंत्र भाषा आहे जिला स्वतःचा वेगळा रंग असल्याचं मीर बसू सांगतात.
शाकिर शुजाबादी हे प्रसिद्ध आधुनिक कवी आहेत ज्यांची कलाम-ए-शाकिर, खुदा जाने, शाकिर दियान गजलान, पीले पत्र, मुनाफ्क़ान तू खुदा बचावे आणि शाकिर दे दोहरा ही पुस्तकं सरायकी भाषेत प्रसिद्ध झाली आहेत.
मीर मुखतियार अली हे आणखी एक पुगल येथील प्रसिद्ध नाव. बुल्ले शाह, सुलतान बहू, शाह हुसेन यांसारख्या सूफींच्या कविता त्यांनी जिवंत ठेवल्या आहेत. मुख्तियार स्थानिक सत्संग आणि जागरणांमध्ये धार्मिक, सूफी आणि भक्ती परंपरेतून स्वतःपलीकडे पाहून संपूर्ण मानव हिताच्या दृष्टिकोनातून जनजागृती आणि चर्चा घडवून आणण्यात पुढाकार घेत आहेत.
देखा अपने आप को, मेरा दिल दीवाना हो गया
असं
म्हणत मुख्तियार अली लोकगायकांच्या प्रसारासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि
इतर सामाजिक उपक्रमांसोबत काम करत आहेत. त्यांच्यासोबत रशीद खान, लतीफ खान, बागे खान,
सकूर खान, मीर रझाक अली अशी एकाहून एक सरस अशी सुफी-भक्ती लोकगायकांची फळी मौखिक परंपरेचं
संवर्धन आणि प्रसार करत आहे. आपल्या गावातील आणि आजूबाजूच्या भागातील अनेक लहान मुलांना
मिराशी गायनाचे प्रशिक्षण देत आहेत.
मुख्तियार अली. फोटो : अजब शहर |
सकाळी ११ वाजता निघालेल्या गाड्या कुम्भलगढला संध्याकाळी ५ वाजता पोचल्या. पुन्हा निवासस्थानी जाऊन जागा पकडण्यासाठी धावाधाव. यावेळी राहायला मंगल कार्यालय होतं. बऱ्यापैकी मोठं म्हणजे दुमजली मंगल कार्यालय होतं. नेहमीप्रमाणे स्थानिक गावकऱ्यांनीच जेवणाची व्यवस्था केली होती. आदल्या दिवशीचं जागरण होतं पण आठ दिवस असंच असणार होतं त्यामुळं लोकांनी मानसिक तयारी ठेवली होती. काहींनी या आधीच्या यात्राही केलेल्या असतात. त्यामुळं त्यांना एकंदरीत सोयीसुविधांचा अंदाज असतो. आधीच्या गावासारखीच नव्या ठिकाणी अंघोळीसाठी किंवा शौचासाठी धावाधाव असते.
निवासस्थानापासून
किल्ला दोन किलोमीटरवर होता. किल्ल्यामध्येच आजची मैफल रंगणार होती. रात्रीचा कुम्भलगढ
प्रचंड देखणा दिसत होता.
यात्रेच्या पहिल्या दिवशी मुरालाला मारवाडा यांनी लोकांना घडा-घमेल्याच्या तालावर नाचायला लावलं होतं त्याच आवेशात लोकं कुम्भलगडावर नाचत होती. भजन होतं कवी ब्रम्हानंद यांचं,
सब चला चली का खेला
सब चला चली का खेला
कोई चला गया, कोई जावे
कोई गठड़ी बांध सिधावे
कोई खड़ा तैयार अकेला
सब चला चली का खेला
या
भजनावर प्रत्येकजण स्वतःच्या तंद्रीत नाचत होता. कुणी एकेकटं किल्याच्या पायऱ्यांवर
बसून गुणगुणत होतं. देहभान हरपून लोकं भजनाच्या लयीत मिसळून गेली होती. नेहमीप्रमाणे
आजही मैफल संपायला चार वाजले. पुन्हा तीन-चार तासांची झोप.
सकासकाळी यात्रेचे स्वयंसेवक 'महेशाराम जी सत्संग ले रहे हैं सभी यात्रींओसे निवेदन हैं कृपया जल्दी उठिये.' असं ज्याच्यात्याच्या गादीजवळ जाऊन सांगू लागली. मी हे झोपेत चुकल्यासारखं ऐकलं आणि ताड्कन उठलो. मी ज्याची वाट बघत होतो तो सत्संग होणार होता. आणि ते घेणार होते साक्षात महेशाराम.
मैं वारी जाऊं रे, बलिहारी जाऊं रे
कुम्भलगढला
मंगल कार्यालयात सकाळी ८ वाजता सत्संग सुरु झाला. ओ रे गजानन प्यारे गजानन हे गणेश
वंदन गाऊन त्यांनी सत्संगाला सुरुवात केली. मैं 'वारी जाऊं रे, बलिहारी जाऊं रे' हे
कवी नारायणदास यांचं महेशा राम यांनी गायलेलं भजन लोकप्रिय आहे. महेशरामांचा शांत,
संयमी आणि मंत्रमुग्ध करणारा आवाज ऐकून मी त्यांचा फॅन झालो होतो. ध्यान आणि मंत्रमुग्धता
हा त्याच्या गाण्याचा विशेषगुण आहे. त्यांनी कबीर, गोरखनाथ, बाबुलाल, धरमदास, मीराबाई
आणि नारायणदास यांच्या गायलेल्या रचना याची साक्ष देतात.
महेशाराम हे जैसलमेर येथील मेघवाल समुदायातील लोक गायक आहेत. कबीरासह अनेक भक्ती कवींच्या
पारंपरिक मौखिक कवितेचे वाहक आहेत. आपल्या गायनाद्वारे त्यांनी ती जिवंत ठेवली आहे.
कबीर, मीरा, गोरख आणि इतर भक्ती कवींची गाणी ऐकत त्यांनी मौखिक परंपरेचा आत्मा त्यांनी
आत्मसात केला आहे. मेघवाल समूहाच्या लोकशैलीचे प्रतिनिधित्व ते आपल्या गायनातून करतात.
कुम्भलगढ येथील सत्संगात रंगून गेलेले महेशा राम. फोटो : शोधण्यातली खाडाखोड |
कौन बतावे धाम जी?
मन भेदूं को व्हाला भूलो फिरे
पाँव कोस पर गाम जी
हे
कबिरांचं भजन त्यांनी सत्संगात गायलं. ईश्वराचं अस्तित्व हे तुमच्या-माझ्या शरीरात
आहे. इतरत्र त्याचा शोध घेण्याची गरज नाही. असं ते म्हणाले.
मी मात्र त्यांचं हळू बोलण्याकडे आकर्षित झालो होतो. याआधीही त्यांच्या गाण्याने निव्वळ सुख दिलं होतं. गाण्यातही त्यांचा शांत सूर आहे. कुणाला आकर्षून घेण्याची लालसा त्यांच्या गायनात नाही. तरीही आपण त्यांच्या गायनाकडे आकर्षित होतो. कबिरांचं तत्वज्ञान आणि भक्तिकाव्यातील सहजता महेशा राम तितक्याच तन्मयतेनं आणि हळुवार समजावून सांगतात. माझ्यासाठी महेशा राम यांचा सत्संग यासाठी महत्त्वाचा होता. काहीतरी गोष्ट शोधण्यासाठी असते. त्याचा प्रवास शांततेत व्हायला हवा. नंतर जे काही चांगलं-वाईट सापडेल ते आपलं असेल. शांततेचा शोध बहुतेक संगीतात आहे असं कबीर यात्रेत गायलं जाणारं जे लोकसंगीत आहे ते ऐकताना सतत वाटत राहील. एखाद्या गोष्टीत रमून जाणं क्वचित घडतं. महेशा राम ऐकताना मी रमून जातो.
मुझे प्रेम की कटारी डारी
मधुर सुर बोल रे कागा
मीरा रो मन राम से लागा
सत्संग
संपवताना महेशा राम यांनी मीराबाईचं हे भजन गायलं. मी पुन्हा नेमकं आपण कशाच्या शोधात
आहोत विचार करत बसलो. आणि हा शोध नेमका कसा घेतात असा पेच माझ्यासमोर उभा राहिला. प्रश्नातच
उत्तर आणि उत्तरातच प्रश्न असा घोळ निर्माण झाला.
परतीच्या प्रवासात प्रकाश खातू भजन गातोय. फोटो : शोधण्यातली खाडाखोड |
प्रकाश खातू या बाडनेर
मधल्या मुलाने फलासिया आणि सलूंबर येथे अक्षरशः धमाल आणली. काय एनर्जेटिक आवाज. सलूंबर
मध्ये पावसामुळे मूड गेलेला. पण या पोरांनी अक्षरशः सगळ्यांना जागेवरून उठवून नाचायला
लावलं. यात्रेच्या शेवटच्या दिवशी भीम या गावातून जयपूरकडे निघताना बसमध्ये याला मी
गायला लावलं. बाडनेर मधल्या अनेक तरुण मुलांसह त्याने मौखिक परंपरेतील लोकगीतं तोंडपाठ
केली आहेत. गावात सार्वजनिक कार्यक्रम किंवा सत्संगामध्ये ते आपलं गायन सादर करतात.
कबीर यात्रेत मीराबाईच्या 'बाई मीरा ने गिरीधर मिलिया' या अप्रतिम भजनाच्या गायनाने
त्याने सगळ्यांना जिंकून घेतलं. राजस्थान कबीर यात्रेच्या लोकगायकांपैकी प्रकाश खातू
हा सर्वात तरुण गायक आहे. मौखिक परंपरेतून मिळालेलं उत्कट ज्ञान हा प्रकाश आणि त्याच्या
सहकारी गायकांच्या गाण्याचा मूळ स्रोत आहे. या परंपरेच्या प्रसारासाठी त्यांनी स्वतःला
झोकून दिलं आहे.
गाडी पुन्हा पुढच्या मुक्कामाला निघाली. पुन्हा वेगळं गाव. उदयपूर-कोटडा-फलासिया- कुम्भलगड राजसमंद-सलूंबर-भीम करत अखेर बस जयपूर इथं पोचली.
आठ
दिवस धावपळीचं संगीत मागोमाग. तीन-चार तासांची झोप. सकाळी पाणी मिळालं तर अंघोळ नाहीतर
सगळा बोजा घेऊन सरळ गाडीत बसायचं. गाडीत पुन्हा संगीत. नव्या ओळखी. किस्से. आठवणी आणि
बरंच कायकाय मागचं पुढं घेऊन जाणारा प्रवास. यात्रेच्या एका स्थळावरून दुसऱ्या स्थळाचं
अंतर साधारणतः शंभर-दीडशे किलोमीटर. दोन गावांदरम्यानचा प्रवास आणि आदल्या रात्रीच्या
जागरणाचा थकवा. पण थकवा असं काही आपल्या म्हणता येत नाही. जाणवत नाही असंही आपण म्हणू
शकत नाही. फक्त तसं लक्षात येणारं वातावरण नसतं आसपास. आठ दिवस कानात असंख्य गोष्टी
शिरतात. नव्या-जुण्या. कायकाय घ्यावं किती ऐकावं आणि काय नको ते अजिबात ठरवण्याची सोय
नसते. तरी किंचित वेळ मिळते आपल्याला काहीतरी यातलं मनापासून लागलंय याची जाणीव होणारी.
त्यांच कनेक्शन कधीतरी जुळलं जातं. नाहीतर नुसता गोफ होतो सगळ्या ऐकण्यापाहणाऱ्या दृश्याचा.
जयपूरहून मुंबईकडे येताना मी यात्रेतल्या रेकॉर्डी ऐकत होतो. प्रहलाद टिपाणीया, महेशा राम, बागे खान, मीर बसू, काळुराम बामनीया, मुरालाला मारवाडा, गवरा देवी, रायजिंग मलंग, प्रकाश खातू, आठवत राहिले. पण एक वेळ अशी आली कि फक्त शांत बसून राहिलो. मग
सब ही ठौर पर मेला
हम सब माय सब है हम माय
हम है बहुरी अकेला
हे कबीराचे शब्द आठवत राहिले. गाडीनं वेग पकडला नि आठवणी एकेकट्या होत गेल्या.
पूर्वप्रसिद्धी
: ‘वसा’ दिवाळी, २०२३.
***