Thursday, February 5, 2026

अधल्यामधल्या भटक्यानोंदी : मुक्काम बगरु


बगरु गावात शिरताना 

जयपूरपासून साधारणतः चाळीसेक किमी अंतरावर असलेल्या बगरु गावात होस्टेलमधल्या एका मुलाला घेऊन गेलो. तो बाईक घेऊन राजस्थान फिरतोय मागच्या पंधरा दिवसांपास्नं. कॉन्टेन्ट वगैरे तयार करतो. रुबल त्याचं नाव. म्हटलं असं असं गाव आहे येतोस का ? तर हो म्हणाला. जयपूर लिट फेस्टमध्ये मराठी भाषा विभागाच्या स्टॉलवर माझी मुलाखत होती. म्हटलं ती उरकून येतो तोपर्यंत तू गाडी वगैरे आवर. मुलाखत आटपून गाडीवरनं सुस्साट निघालो. नॅशनल हायवेला लागून गाव होतं तरी गुगल मॅपने गंडवलं. वीसेक मिनिटं मागे-पुढे करण्यात गेली. दुकानदारांना विचारत पोचलो गावात. सिमेंटचे ढिगारे असतात तशी घरं. गाव असंही धड म्हणता येईल अशी चिन्ह नाहीत. गाव म्हटल्यानंतर आपली आपली डोक्यात रचना किंवा एक सर्वसाधारण चित्र असतं त्याहून हे गाव अगदीच निराळं. बहुतांश राजस्थानात हेच चित्र. कबीर यात्रेच्या दरम्यान एक मुक्काम पुगल या गावी होता. अर्थात तिथं पोहोचेपर्यंत मावळलं होतं. पण गाव ज्याला म्हणून अशा काहीच खाणाखुणा नाहीत. गवताच्या झुलपांनी झाकलेली छतं आणि लाल-राखड्या मातीची घर हे फक्त महागड्या रिसॉर्ट्समध्ये परावर्तित झालेलं आढळलं काही ठिकाणी. त्यामुळं बगरु गाव हे असं नव्या आधुनिक आक्रमणात उभं राहिलेलं दिसलं. माणसं तीच पण जगण्यात एकप्रकारचा निमशहरीपणा आलेली. अर्थात हे काही वाईट नाही. माणसं जगण्याचे पर्याय आपापल्या परीनं निवडत असली, तरीही काळ स्वतःच्याच गतीनं पुढं सरकतो. अपरिहार्यपणे माणसंही त्यापाठोपाठ चालू लागतात. त्यामुळं इथं दोष देणं किंवा हळहळणं उपयोगाचं नाही. 

दृष्टान्तपाठ मध्ये 'रोवंतलेया पशूचा दृष्टांत' आहे. तो असा : 


पशु असे : ते आडीदरडी चरे : पोट भरे : मग एकी ठाइं बैसोनि रोवंती ।

तेणे तयाचीया सप्तधातु निवती : तुष्टि होए पुष्टि होए बळ होए ।।


गावाचा एक फोटो 

बगरुत उतरल्यावर हा दृष्टांत आठवला. गावखेड्यात अगदी आत्ताआत्तापर्यंत रानातून चरून आलेली गुरंवासरं कुणाच्याही अंगणात किंवा झाडांच्या सावलीत रवंथ करताना मी पाहिलेली आहेत. वरील दृष्टांतातील अर्थ सांगण्यात पॉईंट नाही. त्यातली भाषा आणि तिची लय इतकी मोहवून टाकणारी आहे कि कुणालाही तिच्या ठायी असलेला अर्थ उमगेल. प्रत्येक गावात हे अस्सचं चित्र असेल हे काही मनात साठवून मी बगरुकडे निघालो नव्हतो. पण कायापालट किती झपाट्यानं होतो आणि तो आपल्याला किती टोचतो हे मात्र आवर्जून उमगलं. बगरु गावात ते उमगणं जास्त अंगावर आलं.


बगरु गाव हे ब्लॉक प्रिंटसाठी ओळखलं जातं. पारंपरिक पद्धतीने नैसर्गिक रंग वापरून बगरु छपाई करणारे हजारेक कारखाने इथं आहेत. त्यामुळं गावाचंही नाव बगरु असं आहे. 

एकदोन दुकानदारांना कारखाने कुठं बघता येतील व्यवस्थित विचारलं तर, इथे खूप कारखाने आहेत. कुठेही जा असं उत्तर मिळालं. थोडं शोधल्यावर बगरु छपाईसाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री मिळालेल्या राम किशोर डेरेवाला यांचा कारखाना सापडला. पण फोटो आणि छपाई कौशल्य समजून घेण्यासाठी तुम्ही वर्कशॉपला या असं त्यांचा मुलगा म्हणाला. मुंबई वरनं आलोय आणि मी लिहितो वगैरे रुबलने सांगितल्यावर थोडीबहुत माहिती दिली. पण हे काही पुरेसं नव्हतं. पुन्हा कधीतरी वर्कशॉपला येऊ म्हणत आम्ही बाहेर पडलो. आता कुठे जायचं म्हणत गाडी सुरु झाली आणि गावाच्या गल्लीबोळात वळणं घेऊ लागली. इतक्यात गच्चीवरनं नुकतीच छपाई पूर्ण होऊन उन्हात सुकण्यासाठी खाली सोडलेल्या साड्या दिसल्या. थांब बोलल्यावर रुबलने कचकन ब्रेक मारला. नईवाल भवन नावाचं घर दिसलं. काहीतरी सापडेल म्हणून थेट दारात गाडी उभी केली. उन्हात सुकलेल्या साड्या गोळा करणाऱ्यांना बोललो, मुंबईवरनं आलोय. थोडी या छपाईच्या कामाविषयी माहिती हवीय. तुमची परवानगी असेल तर आम्ही वर जाऊन पाहू शकतो का ? तर हातातल्या साड्यांचा गोळा खाली ठेवत त्यांनी मुलाला हाक मारली. म्हणाले यांना घेऊन वर जा. मुलाचं नाव सागर. 


सागर. मोकळेपणानं हसतोय. 

तो अगदी आनंदानं वरच्या मजल्यावर घेऊन गेला. खाली घर आणि वर कारखाना. बिन्धास्त विचारा फोटो काढा म्हणाला. वरच्या मजल्यावर काही बायका, मुली अगदी बारीक नजरेनं कपड्यावर ब्लॉक उमटवत होत्या. आम्ही आलोय वगैरे त्यात त्यांना काही रुची नव्हती. नजर एकाग्र. विवीध रंगांचे डबे, त्यात बुडालेले ब्लॉक आणि त्यांच्या हातांची लक्षणीय लय. ब्लॉक कपड्यावर उमटताना एक विशिष्ट आवाज आणि रंग भरल्यावर कपड्याचा येणारा किंचित कुबट वास. तो बहुतेक नैसर्गिकपणे रंग तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्यामुळे येत असावा. सागरने कपड्यापासून रंग कसे तयार होतात, त्यात कोणकोणते घटक असतात, रंग तयार होण्याचा कालावधी, ब्लॉकच्या निरनिराळ्या डिझाइन्स, छपाईची प्रक्रिया, धुलाई, त्यात समाविष्ट करायची इमलीची फुलं, आल नावाचा दगडाचा प्रकार अशा बऱ्याच गोष्टी सविस्तर सांगितल्या. मला त्याच्याकडे कामाला असणाऱ्या बायकांच्या बाबतीतला एक प्रश्न होता. यांना प्रशिक्षण दिलं जातं का आणि ब्लॉकच्या डिजाइन्सनुसार कोणकोणते रंग वापरायचे हे त्यांना कोण सांगत ? कि त्या स्वतःच निर्णय घेतात? कारण मी दोनेकतास जे पाहत होतो त्यात त्या स्वतःच ब्लॉक निवडायच्या त्यात स्वतःच रंग भरायच्या आऊटलाईन द्यायच्या. सागर म्हणाला, आम्ही एक महिना त्यांना प्रशिक्षण देतो. त्यानंतर दिवसभराचं जे काम असेल त्याप्रमाणं साडी, ओढणी किंवा कटपीस वगैरेचं ब्लॉक डिजाईन आणि त्यामध्ये भरायचे रंग याचा नकाशा त्यांना दिला जातो. त्याप्रमाणे त्या त्या-त्या ब्लॉकमध्ये रंग भरतात. सागर साड्यांचं डिजाईन स्वतः किंवा ग्राहकांच्या मागणीनुसार तयार करतो. 


सागरकडे काम करणाऱ्या महिला कारागीर 

आता थोडं संपूर्ण प्रक्रिया कशीकाय असते हे जाणून घेऊया.

बगरु प्रिंटसाठी वापरण्यात येणाऱ्या पांढऱ्या कपड्यावर हरड डाय केली जाते. त्यामुळं पांढऱ्या कपड्याचा रंग हलकासा पिवळसर होतो. हे करण्याचं एक कारण म्हणजे बगरु प्रिंट ही केवळ पिवळ्या रंगाच्या कापडावरच केली जाते. कारण नैसर्गिक प्रक्रियेद्वारे तयार केलेले रंग पिवळसर कपड्यावरच उठून दिसतात असं सागरचं म्हणणं. या कपड्यावर वेगवेगळ्या ब्लॉकद्वारे मागणीनुसार डिजाईन छापली जाते. दिवसभर सुकवून दुसऱ्या दिवशी एका मोट्ठ्या तांब्याच्या भगून्यात आदल्या दिवशी प्रिंट केलेली सगळी डिझाइन्स उकळण्यासाठी ठेवली जाते. या पाण्यात 'आल' ( पिवळसर रंगाचा धातू, जो बगरु गावात चायनाकडून आयात केला जातो.) रंग आणि इमलीची फुलं मिसळली जातात. आणि मग हे मिश्रण गरम पाण्यात साधारणतः दोन तास उकळलं जात. मग पुन्हा प्रिंट सुकवून त्यावर हरड डाय केली जाते. ही सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यावर एक हात इस्त्रीचा मारला कि माल मार्केटमध्ये जाण्यासाठी तयार! 


प्रिंट उकळण्याचं तांब्याचं भांडं 

सागर कॉटन व्यतिरिक्त महेश्वरी, चंदेरी, मोडाल असे फॅब्रिकचे वेगवेगळे पर्याय प्रिंटसाठी वापरतो. सिल्क पर्याय तो वापरत नाही. पारदर्शक कपड्यात रंग डिजाइन्सच्या बाहेर पडतात आणि ते काम फार किचकट होतं किंवा रंग जरी सिल्क कापडात भरले तर धुवताना ते रंग पुसले जातात असं तो म्हणाला. सागरकडे तयार होणारी बगरु प्रिंट कॉटन साडी ८००-१००० रुपयांना विकली जाते. बाजारात त्याच साडीची किंमत साधारणतः १५०० रुपयांपर्यंत जाते. सागर स्वतः त्याच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम ( bagru Fab Printers ) पेजद्वारे विक्री करतो. शिवाय जयपूरमधील अनेक विक्रेते त्याचा माल उचलतात. 




आल रंग, रंग कुजवत ठेवण्याचं भांडं आणि इमलीची फुलं. 


गध आणि रेख 

ब्लॉक डिझाईनचा जो साचा असतो त्याचे दोन प्रकार असतात. एक गध आणि दुसरा रेख. गध म्हणजे बाह्यरेखा. सोप्प्या शब्दात सांगायचं तर आऊटलाईन ! आणि रेख म्हणजे ज्यात रंग भरायचे आहेत ती पोकळी. रिकामी जागा.

घराच्या मागच्या आवारात रंग तयार करण्यासाठी ठेवले होते. एका भांड्यात गूळ आणि लोखंड कुजत ठेवलेलं. पंधराएक दिवसांनी त्याचा काळा रंग तयार होणार होता. दुसऱ्या भांड्यात इमलीच्या फुलांपासून तयार केलेलं पीठ होतं. ते रंगात मिसळलं कि रंग घट्ट होतो. अशी चारपाच मोट्ठी भांडी आणि त्यात कुजत ठेवलेले रंग. सागरने हे मोकळेपणानं सगळं दाखवलंच पण इत्यंभूत माहितीही दिली. 


रंग आणि कपड्यावर उमटलेली आकृती 

सागरचे आजोबा, वडील आणि सागर अशी तिसरी पिढी हा व्यवसाय करतेय. मी शेती वगैरे आहे का विचारलं वडिलांना. तर नाही म्हणाले. याच कामात सगळा परिवार गुंतलाय. सागर हे काम मनापासून करतोय. कामावर येणाऱ्या बायकांना सन्मानानं वागवतो. साडेपाच झालेले. बायका आवरून निघत होत्या. कोपऱ्यात एका मुलीचं काम सुरूच होतं. सागर म्हणाला, क्या गुडिया घर नहीं जाना क्या ? 


सागरचं कुटुंब

खाली उतरल्यावर सागरने कुटुंबातील सगळ्यांशी ओळख करून दिली. निघताना सागरचे आजोबा म्हणाले, येत राहा. आम्ही पायाच पडलो दोघंही. किंचित गारठा वाढताना हॉस्टेल गाठलं. कमाल दिवस. सगळं सांगायचं म्हटलं तर खूप सारं लपलेलं उरतं सांगायचं. बस थांब्यावर गालाला हात लावून वाट पाहणारी माणसं, घरी वडील आजारी आहेत म्हणून शिक्षण सुटलेला एक छोटूही सापडतो कचोरीच्या ठेल्यावर. त्याचं हसणं विसरता येत नाही. शाळेत का जात नाहीस असं मला अजिबातच विचारता आलं नाही. 


घरातला एक कोपरा.


इथे जोडलेले सर्व फोटो सागर यांच्या परवानगीने काढलेले आहेत. राजस्थानात गेलात आणि ही सगळी प्रक्रिया समजावून घ्यावी वाटली किंवा सागर यांना भेटावं किंवा त्यांच्याकडून घरबसल्या ब्लॉक प्रिंटमधल्या वस्तू मागवायच्या झालं तर खाली सागर चिपा यांचा नंबर जोडतो. वर जिथं त्यांच्या इंस्टाग्राम पेजचा उल्लेख आलाय तिथं क्लिक केल्यास थेट त्यांच्या पेजवर जाऊन, त्यांचे प्रोडक्ट्स पाहून खरेदीही करण्याचा पर्याय आहे.

सागर चिपा : +91 95710 64659.



***



अधल्यामधल्या भटक्यानोंदी : मुक्काम बगरु

बगरु गावात शिरताना  जयपूरपासून साधारणतः चाळीसेक किमी अंतरावर असलेल्या बगरु गावात होस्टेलमधल्या एका मुलाला घेऊन गेलो. तो बाईक घेऊन राजस्थान फ...