Tuesday, December 19, 2023

अमुकच्या व्याकूळतेचा तळशोध

‘अमुकचे स्वातंत्र्य’ ही फक्त एकाकी आणि तुटलेपणाच्या अवस्थेचं चित्रण करणारी कादंबरी नाही. तर माणूसपण या मूल्याला सर्वाधिक महत्त्व देऊन त्याच्या स्वातंत्र्याविषयी मूलभूत चिंतन व्यक्त करणारी कादंबरी आहे. स्वतंत्र असणं म्हणजे हवं असलेलं मिळणं नव्हे, तर काय हवंय ते ठरवता येणं. आपल्या आयुष्याचं काय करायचं ते ठरवता येणं. स्वातंत्र्य म्हणजे नसलेलं मिळवणं नव्हे, तर असलेलं नाकारणं. नकार जगणं हेच माझं स्वातंत्र्य असे म्हणणारा आणीबाणी काळातील नायक यात आहे. 

***

‘‘माझ्यावरचा मुख्य आरोप हा की मला अँम्बिशन नाही. याचा अर्थ इतकाच की माझ्या आई-वडिलांना मी सी. ए. करून चांगला मोठा एक्झिक्युटिव्ह बनावं असं अँम्बिशन आहे, आणि मी सी. ए.च्या परीक्षेला बसलो नाही. तेव्हा मला अँम्बीशन नाही. हे तसं आपल्याला मान्यच आहे. आयुष्य ही काही मला पैसे मिळवण्याची संधी वाटत नाही. आणि आपलं सबंध आयुष्यच्या आयुष्य दुसऱ्याला आयते पैसे मिळवण्यासाठी देऊन टाकणं तर आपल्याला साफ नाकबूल आहे. तेव्हा मला अँम्बिशन नाहीच. मी तळ नसलेला माणूस आहे. मला जमिनीत रोवायला मुळंच नाहीत.’’
शशांक ओक यांच्या १९८७ साली पॉप्युलर प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या कादंबरीतील सुरुवातीच्या पानांतील या काही ओळी आहेत.

मुखपृष्ठ : राजू देशपांडे, पॉप्युलर प्रकाशन 
१९६० सालापासून प्रकाशित झालेल्या ‘धग’, ‘कोसला’, ‘बॅरिस्टर’, ‘अनिरुद्ध धोपेश्वरकर’, ‘चांगदेव चतुष्टय़’, ‘माणूस’, ‘पुत्र’ आणि अशा कैक कादंबऱ्या अस्तित्ववादी कादंबऱ्या म्हणून ओळखल्या जातात. नवे अनुभवविश्व हा या सगळय़ा कादंबऱ्यांचा विशेष. पारंपरिक कादंबरीच्या रूपाला छेद देत वास्तवाचा अन्वयार्थ लावणं आणि कादंबरी या घटकाकडे सामाजिक दस्तऐवज म्हणून या नवकादंबऱ्यांसंदर्भात आपल्याला पाहता येतं. ‘अमुकचे स्वातंत्र्य’ ही कादंबरी त्याच वाटेवरची असली तरी तिचं वळण मात्र या सर्वांहून भिन्न आहे. वेगळं आहे.
आदलं-आत्ताच्या मधल्या घुसमटीत अडकलेल्या, माणूस आणि स्वातंत्र्य या मूल्यांचा आस्थेनं शोध घेऊ पाहणाऱ्या तरुणाची आणीबाणीच्या काळात घडणारी व्याकूळ गोष्ट ‘अमुकचे स्वातंत्र्य’ मध्ये आहे. निवेदकाचं निम्मं बालपण पाळणाघर आणि उरलेलं एकटय़ानं वेळ घालवण्यात नाहीतर वाट बघण्यात गेलेलं आहे. मध्यमवर्गीय नोकरदार आईवडील. वडिलांचं नोकरीनिमित्त गावोगाव फिरणं आणि आईची ८ ते ६ नोकरी. अशा बालपणावर काय उभं राहणार असा वैफल्यग्रस्त प्रश्न निवेदकाला पडलेला आहे.

आपले स्वातंत्र्य जपताना निवेदक ‘माणूस’ म्हणून जगण्याची पराकाष्ठा करताना दिसतो. पण हेही तात्पुरतं आहे, यालाही काही काळाने धक्का लागणार आणि आपल्या धडपडीला काहीच अर्थ उरणार नाही, अशी भावना त्याला प्रत्येक वेळी जाणवते. आपल्या भोवताली जे चाललेलं आहे त्याचा जराही संबंध आपल्या जगण्याशी नाहीय, जे जे सुरूय त्यातलं काहीच आपल्याशी ‘रिलेट’ होऊ शकणारं नाहीय अशा अवघडलेल्या मन:स्थितीत निवेदक अडकलेला आहे. आज निघून जातो आणि उद्या सारखा येतंच राहतो अशी भयंकर तगमग त्याला बिलगून आहे. जीवन भावनाशून्य आणि यांत्रिक आहे, माणूस स्वार्थी आहे आणि म्हणूनच आपण एकेकटे पडत चाललो आहोत असा अगदी पाळणाघरातल्या दिवसांपासून ते ‘सीए’चं सर्टिफिकेट फाडून टाकण्यापर्यंतच्या दिवसांच्या क्षुल्लकपणात त्याला जगण्यातल्या विरोधाभासाची अर्थहीनता पदोपदी जाणवत राहते. म्हणूनच पाळणाघर आणि अनाथालय यात त्याला काहीच भेद करता येत नाही. लहान वयात निवेदकाच्या अबोल आणि अंतर्वक्र एकटेपणाला बिलगलेली ही व्याकूळता शशांक ओक या कादंबरीत तिरकस विनोदाने आणि भेदक उपहासाने पानापानांत पेरतात. यातून मानवी मूल्यांच्या फोलपणाचं लक्षण ते दाखवतातच शिवाय विस्कटत चाललेल्या सामाजिक घडीचं आणि मानसिक स्वास्थ्याच्या दुभंगलेपणाचं चित्रणही ते मोठय़ा खुबीने रंगवतात. पात्रापात्रांत होत असणाऱ्या संवादात, घटनाप्रसंगात, रिकामपणात या दुभंगलेपणाची, तुटलेपणाची आणि व्याकूळतेची दाट अस घुसमट कादंबरीभर सलत राहते. या कादंबरीतील मानसिक संतुलन बिघडलेलं शिरीष साठे नावाचं पात्र एके ठिकाणी म्हणतं, ‘‘डोक्यातलं हे वजन... त्याचीच काळजी वाटतीय.’’ त्याच्या वेडसरपणाला निवेदक आणि त्याचा मित्र अन्या स्वत: जबाबदार असल्याचं ठरवतात. रूढार्थाने आखून दिलेल्या सामाजिक चौकटी ओलांडून स्वत:ला हव्या असलेल्या जगण्याचा शोध घेण्यासाठी पुढं सरसावणं आणि त्याला मानसिक धैर्य गमावून बसलेली पिढी म्हणून उल्लेखणं आणि या ओढवलेल्या परिस्थितीलाही त्याचं कारण ठरवणं यातल्या छुप्या सामाजिक हेवेदाव्यांचं चित्रणही ओक अत्यंत बारकाईने करतात. त्यातून आलेली व्यक्ती आणि समाज यांच्या मोकळीकतेची आणि स्वतंत्रतेची एककंही अधोरेखित करतात.

यातूनच बेडकिहाळकर नावाचं पात्र तीन मुलींच्या नंतर जन्मलेला मुलगा म्हणून घरी श्रेष्ठ ठरतो आणि त्याच्या बहिणी याच्या आज्ञेचं पालन करणाऱ्या ठरतात. पण शाळेत तो अत्यंत गरीब घरातला कुरूप, ढ, बुटका आणि सामान्य ठरतो. त्यामुळं घराबाहेर पडल्यावर त्याला प्रचंड न्यूनगंड येतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ही दोन विषम टोकं सांधण्यात तो कधीच यशस्वी होत नाही. दुसरं विजय नावाचं गुंतागुंतीचं पात्रही असंच. आजोबांनी लंपास केलेली इस्टेट त्याच्या बापानं काकाला भानगडी करून हाकलून देऊन स्वत:च्या नावावर केली. त्यामुळं शाळेत त्याला मुलं या भानगडीवरून सतत चिडवायची. त्यामुळं लोक आपल्याकडे एका भानगडबाज बापाचा मुलगा म्हणून पाहतात, ओळखतात अशी ठाम समजूत विजयची झालेली आहे. यातून त्याच्या एका मनाचा कोपरा कायम बंद झालेला आहे. त्याचा बाप हुकूमशाह प्रवृत्तीचा आहे आणि या प्रवृत्तीतून तो विजयला आणि त्याच्या आईला मारहाण करतो. त्याची आई निमूटपणे सहन करते आणि नवरा म्हणून देव वगैरे समजून पाडव्याला त्याची पूजा करते. व्यक्ती म्हणून वावरताना या दोन विषम टोकांचा न्यूनगंड घेऊन जगणारी आणि सतत दडपणाखाली वावरणारी ही पात्रं या कादंबरीत ओकांनी रंगवलेली आहेत. त्यांच्याकडे एक व्यक्ती म्हणून पाहताना एक समाज म्हणूनही पाहावं लागतं. त्यांच्या जगण्यातले अंतर्विरोध हे ते ज्या काळात जगतायत त्या जगण्याशी जोडलेले आहेतच शिवाय समूहाचं चित्रण म्हणून ते कादंबरीत एकटंही येत नाही. आजच्या जगण्याशी अनेक अर्थानी ते बांधता येईल इतकं ते कालसुसंगत आहे.

या कादंबरीतील निवेदकाचा इथल्या सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक आणि आर्थिक व्यवस्थेला नकार आहे. माणूसपणाच्या जवळ जाणारं एकही स्ट्रक्चर या भोवतालात नाहीय. जी संरचना निर्माण झालेली आहे ती यांत्रिक आहे. तिला माणसाचं स्वातंत्र्य मान्य नाही अशी व्याकूळता या नकारात आहे. त्यामुळं या परिसंस्थेत वावरताना निवेदकाला त्याच्या बागेत घोसाळय़ाच्या वेलाला एक मोठं घोसाळं जागच्या जागीच वाळून गेलेलं दिसतं. निवेदकाला आतून तसं वाटायचं. या एकाकीपणातही तो म्हणतो, ‘मी स्वतंत्र होईन. एक ना एक दिवस स्वतंत्र होईन. मला हवं ते करीन. मला हवं तसं करीन.’ पण या भावना व्यक्त करतानाच त्याला त्याच्या मित्रांच्यातल्या एकाच्या भावाच्या लग्नाला बोलावण्यासाठी केलेली यादी दिसते. त्यात त्याला त्याचं नाव दिसत नाही. आणि तेव्हा तो म्हणतो, ‘मी यांच्यातला एक का बनू शकत नाही?’ एकीकडे या सगळय़ा परिस्थितीला बळी न पडता नाकारायचं आणि त्याच परिस्थितीत स्वत:चा अवकाश शोधायचा अशी असह्य गुंतागुंत त्याच्या वाटय़ाला येते. तो म्हणतो, ‘‘... आपण स्वत:लाच धरून बसतो. कशातही पडायची आपल्याला भीती वाटते. कशातही अडकायची भीती वाटते. स्वत:च्याच भिंती बांधून स्वत:ला तोडून घेतो आपण आणि त्यातच स्वतंत्र आहोत असं भासवतो. आपल्याला स्वत:ला सोडता येत नाही. आपलं स्वातंत्र्य खरं नाही. आपल्याला काडीइतकी किंमत नाही. आपलं सगळं खोटंच असतं. काहीही केलं तरी ते खोटं, अर्थहीन, विफल. आपलं स्वातंत्र्य खरं नाही. आपलं काहीही खरं नाही...’’

या व्याकूळतेच्या तळाशी कादंबरीतील सर्व पात्रांना मानसिक स्थैर्य हवं असल्याचं दिसतं. निवेदकाच्या आईवडिलांना निवेदकाच्या समस्या तुलनेनं छोटय़ा आणि बिनमहत्त्वाच्या वाटतात. निवेदक आपल्याला थकवा आलाय, मला बरं वाटत नाहीय असं म्हणतो तेव्हा त्याचे आईवडील या वयात कसला आलाय थकवा, काही काम करायला नको, तुमच्या वयाचे आम्ही होतो तेव्हा वगैरेवगैरे ऐकवतात. अशा वातावरणात या सगळय़ाला नाकारत सुटत, परीक्षेला न बसण्याची आणि अखेर सीएचं सर्टिफिकेट फाडण्यापर्यंतची मजल निवेदक गाठतो. हे बंड त्याने आपल्यावर विनाकारण लादलेल्या आणि आपल्याला नको असलेल्या बिनमहत्त्वाच्या गोष्टींविरुद्ध पुकारलेला आहे. सामाजिक प्रतिष्ठा म्हणून असलेल्या नावलौकिकातल्या फोलपणाला दिलेलं हे सक्षम उत्तर आहे. त्यावर तो ठाम आहे. दुरून मुलींकडे पाहून पुंगुड स्वप्न पाहण्यात आणि मासिकांवरच्या बायांच्या शरीराला सिग्रेटीचे चटके देण्यातून लैंगिक भावनांचा कोंडलेपणा दिसतो. तरीही कादंबरीतल्या पात्रांची लैंगिकतेविषयीची जाणीव एखाद्या थांबलेल्या क्षणासारखी स्तब्ध आहे. मुली पाहण्यात आणि नजर लपवण्याइतपतच हे आकर्षण आहे. यापलीकडे लैंगिक भावनांना कुणीही वाहू दिलेलं नाही. लैंगिक आकर्षणाबाबतचा एकप्रकारचा अशक्य अवघडलेपणा या कादंबरीतल्या पात्रांच्या मन:स्थितीत दाटलेला आहे. मुक्ततेची मर्यादा न ओलांडता त्याच अवकाशात मुलींबद्दल आणि पुढे लग्न झालेल्या बायांबद्दल निरीक्षणं येतात. त्यातही कोरडेपणा आहे. पण तोही आशयाला जोडलेला आहे.

आणीबाणीच्या आसपासच्या काळाचं रेखाटन, प्रचंड भाववाढ, संप, कॉलेज निवडणूक, मारामाऱ्या, आंदोलनं, टाळेबंदी, दंगली आणि या सगळय़ा पार्श्र्वभूमीवर स्वत:च्या स्वातंत्र्याचा व्याकूळ शोध असं या कादंबरीचं सूत्र आहे. हे इतकं बाहेर घडत असतानाही निवेदकाला स्वत:चा अनुभव, स्वत:च्या भावना व्यक्त करता येत नाहीत, स्वत:च्या जगात इतर कुणाला भागीदार बनवता येत नाही. रिकामं वाटणं आणि काहीच न करावं वाटणं ही अत्यंत उदासीन अवस्था या कादंबरीच्या पानापानाला बिलगून आहे. कादंबरीअंतर्गत काळाचं आणि पात्रांचं ते एक महत्त्वाचं वैशिष्टय़ आहे. आजचंदेखील.

फक्त एकाकी आणि तुटलेपणाच्या अवस्थेचं चित्रण करणारी ही कादंबरी नाही. तर माणूसपण या मूल्याला सर्वाधिक महत्त्व देऊन त्याच्या स्वातंत्र्याविषयी मूलभूत चिंतन व्यक्त करणारी ही कादंबरी आहे. ज्या सामाजिक संरचना निर्माण झाल्या आहेत त्या निभावून नेताना त्यातली पोकळता आणि त्यांच्या असण्यात आपल्या अस्तित्वाचं होणारं स्खलन अशा दुहेरी पातळीवर अधांतरी लोंबकळणं वाटय़ाला येऊन आपल्या स्वातंत्र्याचा शोध घेऊ पाहणारी ही कादंबरी आहे. जन्मायचं की नाही ही निवड आपल्याला नाही. म्हणजे तिथेही आपण स्वतंत्र नाही. मृत्यूतही स्वतंत्र नाहीच. आपण स्वतंत्र नाहीच. अशाप्रकारची भावना निवेदक व्यक्त करतो. प्रत्येकाला असा एक प्रदेश लागतो जिथं त्याचीच पावलं उमटलेली असतील आणि ज्यात फक्त त्याचीच पावलं उमटतील. जिथे तो शांतपणे जगू शकेल. राहू शकेल. तो प्रदेश. जपायला हवा. हा प्रदेश जपण्यासाठी निवेदकाचा झगडा सुरू आहे. आणि बाहेरचं वजन मात्र असह्य आहे. ही त्याच्या स्वातंत्र्याआड येणारी भिंत आहे.
निवेदकाला हवं असलेलं स्वातंत्र्य मग नेमकं कसं आहे?
तो म्हणतो, ‘‘स्वतंत्र असणं म्हणजे हवं असलेलं मिळणं नव्हे, तर काय हवंय ते ठरवता येणं. आपल्या आयुष्याचं काय करायचं ते ठरवता येणं. स्वातंत्र्य म्हणजे नसलेलं मिळवणं नव्हे, तर असलेलं नाकारणं. नकार जगणं हेच माझं स्वातंत्र्य.’’
‘‘मी काहीही करीन पण काहीही करणार नाही. सीए होण्यापेक्षा मला माणूस होणं जास्त परवडेल.’’
हे निवेदकाचं कादंबरीच्या शेवटी येणारं वाक्य स्वातंत्र्याच्या व्याकूळ तळशोधात असलेल्या निवेदकाच्या मानसिक स्वास्थ्याचा शांत ठहराव आहे. यानंतर काहीही आधीसारखं असणार नाही. कितीतरी नवी स्ट्रक्चर उभी राहिली तरी त्याचं दरवेळी नकार जगणं हेच प्राधान्यक्रमानं वरचढ ठरणार आहे, अशी ठाम समजूत ही कादंबरी निर्माण करते. स्वत:चा प्रदेश जपण्याला महत्त्व देते. त्यातला स्वातंत्र्याला महत्त्व देते. म्हणून तिचं वळण महत्त्वाचं.

या कादंबरीच्या दुसऱ्या वाचनानंतर कुतूहल म्हणून मी पुण्यात जाऊन शशांक ओकांना भेटलो. त्या भेटीत त्यांच्याकडून ‘अमुकचे स्वातंत्र्य’च्या पुढच्या भागाची जवळपास अडीचशेहून अधिक पानं लिहून झाल्याचं कळलं आणि पुढच्याच वाक्यात ती सगळीच्या सगळी पानं चोरीला गेल्याचंही.
‘अमुकचे स्वातंत्र्य’च्या मलपृष्ठावर पुढच्या भागाची पूर्वसूचना देताना असा मजकूर येतो :
अमुकचा ‘स्वातंत्र्य लढा’ संपलेला नाही. तो चालूच राहणार..
सुरुवात कोणती आणि शेवट कोणता ?'

त्यानंतर वैयक्तिक आयुष्याच्या बऱ्याच दमवून टाकणाऱ्या उलथापालथी निभावून नेण्यात ओकांनी पुढं काहीच लिहिलं नाही. या कादंबरीची लेखकाकडे एकही प्रत सध्या उपलब्ध नाही. एकदोन ग्रंथालयं वगळता दुसरीकडे कुठे असण्याची शक्यताही तशी कमीच. या कादंबरीच्या प्रकाशन संस्थेचं- पॉप्युलर प्रकाशनाचं शंभरावं वर्ष सध्या सुरू आहे. निदान त्यानिमित्ताने तरी ही कादंबरी उपलब्ध व्हावी असं आपण फारफार मनातलं बोलू शकतो. आपल्यापुरतं एवढंच बोलण्याजोगं उरतं.
***
 

( हा लेख लोकसत्ता, रविवार १० डिसेंबर च्या लोकरंग पुरवणीत 'आदले । आत्ताचे' या सदराअंतर्गत प्रसिद्ध झाला आहे.)  


Tuesday, December 12, 2023

दोन कविता : अधली-मधली खाडाखोड

अधेमधे लिहिलेल्या या दोन कविता. एकामागोमाग ह्याच का ? तर त्याचं काही ठराविक उत्तर नाहीय. इथं नोंदवाव्यात असं वाटलं म्हणून त्या इथं आहेत एवढंच सांगता येईल. आणखीही आहेत त्याही अधेमधे नोंदवून ठेवेनेच. 

***



१.  होप इन सॉलीट्युड 

पापण्यांच्या वचळणीतला 
फॅब इंडिया 
चित्रमय चिंतेतली 
अल्पवयीन चुम्माचाटी 
भोस्कं पडलेल्या अंडरवियरची 
मॉर्डन आर्ट गॅलरी
घराच्या छताचा उनाड 
भाडोत्री पत्रा 
गोधडीच्या अंतर्मनातली 
उबदार लपाछपी 
भिंतींच्या कानातले 
पिढीजात मौन 
चटईच्या क्षेत्रफळाइतकी 
वैश्विक वणवण   
डोळ्यातल्या डोळ्यात 
पाणावलेलं वाऱ्यासारखं 
अदृश्य सुख 
देठाच्या भुईगर्भात स्थिरावलेली 
आदिम दुःखद रेलचेल 
जिभेच्या काठावरची 
वाळवंटी तहान 
पायांच्या ठशांचा 
अज्ञात मालकीहक्क 
घराच्या आड्यातली 
मरणप्रिय शांतता 
अंथरुणाच्या पायाबाहेरच्या स्वप्नांची 
जागतिक एलिजिबलीटी 
चार्पाच अंग पुसलेला दारावर 
सुकलेला ओरिजिनल टॉवेल 
कॉमन संडासातली ब्रह्मांडथाप 
शहरांच्या कपाळावरची 
लॅव्हिश भुरळ 
ग्लोरिअस खेड्यांच्या गालावरचे 
दुष्काळ खडकाळ गालिचे 
रात्रीच्या गर्भातला 
विंटेज लूक 
वाढत्या बेरोजगार वयाचा 
फिफ्टीपरसेंट ब्राईटनेस 
नी 
एकाएकी 
हुंदक्यातला 
होप इन सॉलीट्युड

***

२. 
मालडब्यातली कुण्या हसऱ्या चेहऱ्याची तात्पुरती ओळख 
हीच काय ती आपल्या अस्तित्वाची ठळकरेष 
एलआयसीच्या एजंटनं दाखवावं लाइफटाइम स्वप्न 
इतकी भीती क्वचित कुणाची 

नाईटस्कुलच्या बेन्चवरची तंबाखूची पिचकारी 
नी कर्कटकनं खरवडलेली आईवरची पिव्वर शिवी
एवढं तंदुरुस्त शिक्षण आपलं

मुहंमदअली रोडवरचा चचा म्हंतो 
इतना टेन्शन नहीं लेनेका दुनिया बडी मादरचोद हैं 
सॉरी बोलनेवाले तुम कौन हो भई 
इतकी सिम्पल ओळख दुनियेशी

येष्टीच्या खिडक्यांची दीर्घ थरथर 
नि बाजूला बसलेल्या म्हाताऱ्याची 
खांद्यावर लवंडलेली मान एवढाच काय तो 
आधार आपला कुणाला 

ट्रकड्रायव्हरची लांब पल्ल्याची
अनोळखी डिमलाईट साथसंगत 
नि अंधार कोरून उरणारी एकाएकी स्तब्धता 
इतकंच काय ते रितेपण प्रत्येक थांब्याचं 

नाव तेवढं विचारायचं राहून जातं दरवेळी 
इतकीच उणीव चरित्राची 

लायटीच्या खांबावर कुत्रा करतो वर ढ्यांग
इतकं अबाधित स्वातंत्र्य आपलं 
नी रस्त्यांना चिरत नेणारी अविरत धावपळ 
इतकी प्रामाणिक पायांची दृढ वणवण 

दुःखाची निर्वाणकळ पोटात 
इतका शांत गळफास उर्वरित वर्षांचा  

***

Monday, November 27, 2023

आदले । आत्ताचे : समकालीन कल्लोळाची कथा…

''मुंबईच्या गर्दीचा, रेल्वे व्यवहारांचा आणि शहरातील सर्व महत्त्वाच्या परिसराचा फेरफटका घडवत आजच्या शहरी तरुणांची विरत चाललेली स्वप्ने मांडणारी कादंबरी नुकतीच आली आणि वाचकप्रिय झाली. कादंबरीतील सामाजिक व्यवस्थेला व्यवस्थितपणे सामावून घेणारी भाषा सापडणे बऱ्याचदा लेखकाचा कस पाहणारे असते. इथे साजेशी भाषा घडविण्यामध्ये लेखक यशस्वी झाला आहे.''

*** 

प्रदीप कोकरे या तरुण लेखकाची खोल खोल दुष्काळ डोळे ही कादंबरी वाचत असताना मला भालचंद्र नेमाडेंचं एक विधान आठवत होतं. नेमाडे एकदा म्हणाले होते की, साधारणत: पंधरा-वीस वर्षांनी पिढी बदलते. प्रत्येक नव्या पिढीची मानसिकता आदल्यांहून वेगळी असते. जगाकडे बघण्याचे दृष्टिकोन भिन्न असतात. काळ बदलला की प्रश्नांना समोर जाण्याचे प्रत्येकाचे मार्गही बदलून जातात. त्यामुळे ‘कोसला’ मी माझ्या काळच्या तरुण पिढीला समोर ठेवून लिहिली. आजचा एखादा तरुण ‘कोसला’ला नाकारून आजच्या काळातल्या तरुणांच्या नजरेतून जगाला सामोरं जाईल. प्रत्येक पिढीची आपली आपली एक ‘कोसला’ असते.

हा लेख लोकसत्ता, लोकरंग पुरवणीत आदले । आत्ताचे या सदरात दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी
प्रकाशित झाला होता. फोटो : लोकसत्ता  

अधूनमधून काही कादंबऱ्या वाचत असताना हे आठवतं. या कादंबऱ्या आठवतात, त्या ‘कोसला’शी साम्य असलेल्या असतात किंवा ‘कोसला’च्या प्रभावातून लिहिलेल्या असतात असंही काही म्हणता यायचं नाही; पण त्यातली संवेदनशीलता ‘कोसला’ला समांतर जाणारी असते; आपल्या आपल्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी असते.

प्रदीप कोकरे यांची अलीकडेच लोकवाङ्मय गृह, मुंबई या प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेली कादंबरी ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या अर्थाने आजच्या काळातल्या महानगरीय तरुणांच्या संवेदनविश्वाला जवळ जाणारी प्रातिनिधिक कादंबरी आहे. महानगरीय असं म्हटलं तरी आजच्या काळात एकूणच आधुनिक संवेदनांची ज्या पद्धतीने सरमिसळ होऊ लागली आहे, ती पाहता ही कादंबरी केवळ महानगरीय तरुणांच्या संवेदनविश्वापुरती मर्यादित राहत नाही. ती त्याहूनही अधिक अवकाश व्यापताना दिसते. अर्थात, महानगर हे या कादंबरीच्या नायकाच्या वर्तमान जगण्याच्या संघर्षांच्या केंद्रस्थानी असल्याने यात चित्रित झालेल्या बहुतांश सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक घडामोडींमधून महानगरीय संवेदनाविश्व दृग्गोचर होत राहते. नायक काही दिवसांसाठी गावी गेल्यावर निवेदनात तिथल्या दैनंदिन लोकजीवनाचे तपशील येतात. त्यातही गावातल्या बायकांच्या टीव्हीवरच्या सीरियल्सच्या अनुषंगाने चाललेल्या गप्पा, फोन, क्रिकेट वगैरेमुळे आधुनिकीकरण ग्रामीण संवेदनाविश्व कसे व्यापत आहे आणि नायकही आपले अगदी कालपरवापर्यंतचे तिथे त्याच परिसरात गेलेले आयुष्य नजरेआड करू पाहताना शहरी जगण्याच्या विवंचनातून बाहेर येऊ शकत नाही, हेही समोर येत जाते. गावच्या त्या परिसरात जगत असताना आपण केवळ परंपरेने म्हणून स्वीकारलेल्या काही सांस्कृतिक संरचनांकडे काहीशा संशयास्पदपणे पाहण्याचा नायकाचा प्रयत्नही त्यातून जाणवत राहतो. ही जाणीवही त्याला महानगरीय संवेदनांनी त्याचा वर्तमान व्यापलेला असल्याने झाली असावी, असे वाटते.

कादंबरी हा साहित्य प्रकार वर्तमानाचे बोट पकडून उभा राहत असल्याने भूतकाळ मागे टाकून समकालीन जगण्याच्या शक्यतांचा शोध घेणे हेच कादंबरीकारासमोरील महत्त्वाचे आव्हान असते. या आव्हानाला लेखक कसा सामोरा जातो, काळाने उभे केलेले पेच तो कसे सोडवतो, त्यासाठी स्वत:ची भाषा कशी निर्माण करतो, यातून लेखकाचे सामर्थ्य दिसून येत असते. प्रदीप कोकरे यांनी हे आव्हान या कादंबरीमध्ये बऱ्यापैकी यशस्वीपणे पेलले आहे, असे म्हणावे लागते. मुंबई या महानगराचा अवकाश निवडल्यावर तिथल्या संबंधित परिसराचे, तिथे राहणाऱ्यांच्या दैनंदिन जगण्याचे, जगण्यासाठी आणि आपले वर्चस्व टिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षांचे, सांस्कृतिक व्यवहारांचे, मानसिक स्तरावरील उलाढालींचे जे तपशील लेखकाने दिले आहेत, त्यातून एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील पहिल्या दोन दशकांचे वर्तमान वाचकाच्या नजरेसमोर ठळक होत जाते. प्रथमपुरुषी निवेदनाचा वापर करत नायक स्वत:च्या जगण्याविषयी बोलत असला तरी त्यातून महानगरातील गलिच्छ वस्त्या, तिथलं लोकजीवन, त्यांचे परस्परांशी असलेले संबंध, रोजीरोटीबरोबरच आत्मसन्मानासाठी निर्दयी तसेच आत्मकेंद्री व्यवस्थेशी करावा लागणारा झगडा, विचारी व संवेदनशील माणसाची या व्यवस्थेत होणारी घुसमट, त्यातून येत जाणारा संवेदनांच्या पातळीवरील बधिरपणा, अंतिमत: त्याची परिणती म्हणून परात्म होत जाणे, अशा असंख्य गोष्टींविषयी वाचकाला कळत जाते.

या कादंबरीचा नायक गावातल्या मोकळय़ाढाकळय़ा वातावरणातून पोटापाण्याची काही तरी सोय लावावी म्हणून बाह्यत: गजबजलेल्या, तरीही आतून आक्रसलेल्या शहरात येऊन स्थिरावू पाहतो. या शहराच्या सगळय़ा आत-बाहेरच्या कल्लोळांशी त्याने बऱ्यापैकी जुळवून घेतले आहे. कादंबरीच्या प्रारंभापासूनच पुढे कादंबरीभर पसरून राहिलेले या कल्लोळांचे पडसाद आपल्याला सतत जाणवत राहतात. नायकाच्या भावविश्वाचाच एक भाग बनून गेल्यासारखे त्याच्या एकटेपणातल्या चिंतनातून, दैनंदिनी, कविता वा शिव्यांतून, वेगवेगळय़ा माणसांशी बोलाचाली, व्यवहार करताना घडणाऱ्या कृती अशा सगळय़ामधून ते कमीजास्त तीव्रतेने व्यक्त होतात. तो म्हणतो तसं या कल्लोळांची त्याला हळूहळू सवय होत जाते. त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तो अधिकाधिक त्यात हरवून जातो. वाढ खुंटून स्थितिशील झाल्यासारखा बथ्थडपणे गरगरत राहतो. साधारणत: हे कादंबरीचे एक मध्यवर्ती सूत्र म्हणून सांगता येईल. या मध्यवर्ती सूत्राच्या अनुषंगाने या कादंबरीतील सर्व घटना, प्रसंग, वर्णने, निवेदन, विविध पात्रांचे परस्परसंबंध यांकडे पाहता येऊ शकते.

कादंबरीची सुरुवात नायकाच्या रोजच्या जगण्यातील एका नेहमीच्या सवयीच्या पहाटेपासून होते. शौचाला जातानाचे तपशील, संडाससाठी असलेली रांग, पोटं तुरंबलेल्या तिथल्या माणसांची क्षुद्र अरेरावी, कुरघोडय़ा, शिव्या, गटारातून फिरणाऱ्या घुशी, बेवारशी कुत्री, असं सगळं चाळीतील संस्कृतीच्या संदर्भाने येणारे तेथील उबगवाणे वातावरण महानगरातल्या निम्नस्तरीय जगण्याचा एक अपरिहार्य भाग आजही आहे. दिवसाची ही सुरुवात कुठल्याही अंगाने प्रसन्न आहे, असं म्हणता येणार नाही. या अशा वातावरणात नोकरीची, राहण्याच्या जागेची, लैंगिक भुकेच्या शमनाची, संसाराची, स्थिर जगण्याची, कसलीही शाश्वती नसलेल्या आणि पुस्तकं नि कवितांसह तुकोबा, कबीर, नामदेव ढसाळ, कुमार गंधर्व, मुकुल शिवपुत्र, केसरबाई, मेहदी हसन, फरीद अयाज, लीळाचरित्र, जहांगीरमधली चित्रं वगैरेंशी मनाने सख्य जोडून असलेल्या संवेदनशील तरुणाची काय पंचाईत होत असावी याचा अंदाज येऊ शकतो. कादंबरीच्या सुरुवातीच्या प्रसंगाने आपल्या मनात निर्माण केलेले एक प्रकारच्या उदासीचे, खिन्नतेचे आणि अलिप्ततेचे वातावरण पुढे सबंध कादंबरीला व्यापून राहिलेले दिसते. नायकाचं गावी गेल्यावर आईवडिलांसह लहानपणापासूनच्या त्या परिचित परिसराला भेटल्यावर, जिच्यामध्ये मन गुंतलं आहे त्या सुधासोबत असताना, मित्रांसोबत वावरताना, अन्य सहकाऱ्यांसोबत वा एकटं असतानाही हे उदासवाणं अलिप्तपण दूर गेल्याचे जाणवत नाही. नायकाच्या देहामनाला वेढून राहिलेले हे अलिप्तपण आणि उदासीनतेने वाचकांनाही आपल्यासोबत गुरफटून घेतल्याचा अनुभव ही कादंबरी वाचताना येत राहतो. या कादंबरीचे हे एक वैशिष्टय़ म्हणून नोंदवता येईल.

कादंबरीचे मुखपृष्ठ : अन्वर हुसेन 

या कादंबरीतील जवळपास प्रत्येक लहानमोठय़ा व्यक्तिरेखेला स्वत:चं असं स्वतंत्र अस्तित्व आहे. प्रत्येकाचं या कादंबरीच्या अवकाशात काही एक विशिष्ट स्थान आहे. कादंबरीच्या सुरुवातीला पहाटे चाळीतल्या सार्वजनिक संडाससमोरच्या रांगेत नंबर लावायला जाताना आठवणारी पायांखाली येऊन मेलेली घूस असो, की काळवेळेचं वा कसलंही भान नसलेले रस्त्यावर झेंगट लावून हास्यास्पद प्रदर्शन घडवणारी कुत्री असोत, माणसांइतकेच हे जीवही या किळसवाण्या महानगरीय अधोविश्वाच्या संस्कृतीबरोबरच नायकाच्या मनातील कल्लोळांचे प्रतिनिधित्व करणारी पात्रे आहेत. त्यांच्या कादंबरीतील असण्याला काही एक अर्थपूर्ण प्रयोजन आहे. त्यांच्या अस्तित्वामुळे निवेदनातून आपल्यासमोर साक्षात होत जाणारा तपशील अधिक जिवंत आणि वास्तववादी होत जातो. अर्थात, याशिवाय यात प्रसंगोपात येत जाणाऱ्या वेगवेगळय़ा मानवी व्यक्तिरेखाही तितक्याच लक्षणीय आणि ठसठशीत आहेत. चाळसंस्कृतीतील लाचारी, भूक, उंडगेपणा, नादानपणा, व्यसनी वृत्ती, गुंडगिरी, लैंगिक उपासमार, अकृत्रिम मानवीय जिव्हाळा इ. विशेष स्पष्ट करणारी गण्या फुलवाला, पिंटय़ाभाय, पिंटय़ाचा बाप हरितात्या, सखू म्हातारी, शंकर, बबन्या, सुधा यांसारखी पात्रे, नोकरीच्या ठिकाणाच्या मालकाची मुजोरी, बेफिकिरी, मजबुरी वगैरे दाखवणारी टाटारिया, लावण्या, जितू ही पात्रे, महानगरातील एकाकीपणा, निर्वासित जगणे, दाखवून देणारी कुणी एक ‘तो’ आणि त्याच्यासारखी काही पात्रे ही या कादंबरीची बलस्थाने ठरणारी आहेत. कादंबरीच्या नायकाइतकीच ही पात्रेही या कादंबरीच्या मध्यवर्ती सूत्राला पुढे घेऊन जाण्यासाठी उपयोगी ठरतात.

कादंबरी हे एक भाषित रचित असल्याने कादंबरीकाराला हे रचित घडवताना स्वत:ची भाषाही शोधावी लागते. कादंबरीतील सामाजिक व्यवस्थेला व्यवस्थितपणे सामावून घेणारी भाषा सापडणे बऱ्याचदा लेखकाचा कस पाहणारे असते. कादंबरीच्या भाषेविषयी मराठीमध्ये म्हणावी तितकी जागरूकता दिसत नाही, हे खरे आहे. या उदासीन पार्श्वभूमीवर ‘खोल खोल दुष्काळ डोळे’मध्ये लेखक साजेशी भाषा घडविण्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे, हे लक्षात येते. भाऊ पाध्ये, चंद्रकांत खोत, दिवाकर कांबळी, जयंत पवार, जी. के. ऐनापुरे यांनी निम्न वा अधोस्तरीय महानगरीय अवकाशाला साजेशी भाषा त्यांच्या लेखनासाठी जाणीवपूर्वक निर्माण केली. त्या वाटेने प्रदीप कोकरेसारखा तरुण लेखक चालू पाहतो आहे, हे दिलासादायक आहे. कादंबरीत वापरलेले नायकाच्या दैनंदिनीतील चिंतन, त्याच्या मन:स्थितीचे दर्शन घडवणाऱ्या त्याच्या कवितांचे तुकडे, तुकोबांचे अभंग व विविध गायकांच्या चिजांचे संदर्भ, नायकाच्या मनाचे भरकटलेपण पकडू पाहणारे निवेदन, फेसबुक, व्हाटसऍप, इन्स्टा यांसारख्या आधुनिक समाजमाध्यमांशी संबंधित लेखन, अशांसारखी संभाषिते महानगरीय जगण्यातील कोलाहल, वखवखलेपण, अतृप्ती, अशांती, एकाकीपण, तडजोड, स्वप्ने, राडे, स्पर्धा, सत्तासंघर्ष, सांस्कृतिक संघर्ष, डिप्रेशन, अंतिमत: केऑस अशा अनेकानेक घटितांच्या चित्रणाच्या पार्श्वभूमीवर कादंबरीच्या भाषेला वेगळेपण देऊ पाहतात. चाळीतील तरुणांची रांगडी, मोकळीढाकळी भाषा, शिव्यांचा आणि लैंगिक शब्दांचा मुक्त वापर, संवादांतील जिवंतपणा, प्रथमपुरुषी निवेदनातून समोर येणारे वास्तववादी तपशिलांतील बारकावे, यामुळेही कादंबरीच्या भाषेचा बाज खुलला आहे.

कादंबरीच्या आकारामुळे ती चटकन वाचून हातावेगळी होते हे खरे असले, तरी सत्यकथानिष्ठ दीर्घकथा वा लघुकादंबरीसारखे तिचे स्वरूप जाणवत राहते. तिच्यात कादंबरीच्या विस्तृत व गुंतागुंतीच्या संरचना पटाची उणीव जाणवते, हेही मान्य करावे लागते. बऱ्याचदा नायकाच्या व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित नोंदींपुरतेच यातल्या काही घटनांचे स्वरूप उरते की काय असेही वाटत राहते. वाचक म्हणून असमाधानी वाटावे अशा काही गोष्टी त्यातून जाणवत राहतात. विशेषत: नायकाचं आपलं असं अधांतरी लोंबकळत जगणं जगत असतानाही त्याच्या भवतालच्या अवकाशात देशावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक राजकीय व सांस्कृतिक उलथापालथी याच काळात घडत राहिल्या होत्या. त्यांचा परिणाम राजकीय-सामाजिक वा सांस्कृतिकदृष्टय़ा सजग आणि संवेदनशील असलेल्या नायकाच्या मनावर कळत नकळत होणे साहजिकच आहे. पण तसे ते या कादंबरीत क्वचितच जाणवत राहते. हा दोष म्हणता आला नाही तरी कादंबरीसारख्या सामाजिक व कृतिशील वाङ्मय प्रकाराची ती एक प्रमुख मागणी असते. याच दशकभराच्या काळात आलेल्या, आजच्या पिढीची घुसमट व आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठीचा संघर्ष मांडणाऱ्या किरण गुरव, सुशील धसकटे, प्रसाद कुमठेकर, अवधूत डोंगरे, सुशील गायकवाड यांसारख्या तरुण लेखकांच्या कादंबऱ्यांमध्ये या दृष्टीने विचार केला गेल्याचे दिसून येते.

महानुभवी तत्त्वज्ञानात सांगितल्याप्रमाणे कसल्याही गोष्टीची सवय जडू नये, जगण्याचा साचा होऊ नये, यासाठी आपल्या कादंबरीतील नायकाप्रमाणेच सजग असलेल्या या कादंबरीकाराकडून अधिक खोली गाठण्याच्या अपेक्षा करता येतील, असे मात्र नक्कीच ही त्याची पहिली कादंबरी वाचत असताना जाणवते. आपण जगत असलेल्या काळाचा तुकडा पकडू पाहताना आपल्या अस्तित्वभानाचाही शोध घेण्याचा प्रदीप कोकरे यांचा हा प्रयत्न निश्चित वाखाणण्याजोगा आहे.

- प्रवीण दशरथ बांदेकर

कवी, प्राध्यापक आणि कोकणातील साहित्य चळवळींमधील महत्त्वाचे नाव. नवाक्षर दर्शन’ या मराठी नियतकालिकाचे संस्थापक संपादक. ‘येरू म्हणे’, ‘खेळखंडोबाच्या नावानं’ या काव्यग्रंथांनंतर गद्यलेखनात सक्रिय. ‘चाळेगत’, ‘इंडियन ऍनिमल फार्म’ या कादंबऱ्या लोकप्रिय. ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार.

साभार : लोकसत्ता ,१९ नोव्हेंबर २०२३. 

***

Monday, November 20, 2023

तंद्रीचा पाठलाग




साभार : लोकायन, बिकानेर 

कबीर.
मूळ अरेबिक शब्द. ज्याचा अर्थ होतो श्रेष्ठ, महान.
 
कबिरा तू ही कबिरु नाम तू तोरे नाम कबीर ।
रामरतन तब पाइये जद पहिले तज शरीर ।।
 
असं स्वतः कबिरने स्वतःच्या नावाबद्दल एका दोह्यात म्हटलेलं आहे. एक आख्यायिका अशी सांगितली जाते की, कबीराचे वडील एका काजीकडे घेऊन जातात आणि विचारतात या मुलाचे नाव काय ठेवू ?
काजी कुराणची पोथी उघडतो आणि त्यात नाव शोधू लागतो. तो नाव शोधताना अचानक बाल कबीर उच्चारला 'मी आत्मस्वरूप आणि आत्मप्रकाशी आहे.'
काजी विस्मयचकित होऊन म्हणाला, या बालकाचे नाव कबीर !
कबीराच्या जन्माबद्दलही अशा कैक आख्यायिका सांगितल्या जातात. एका आख्यायिकेनुसार तो निमा-निरू दाम्पत्याचा पुत्र होता. लोकांच्या भयाला शरण जाऊन एका ब्राह्मण विधवेनं आपलं नवजात अर्भक एका तलावात सोडून दिलं. निमा- निरू दाम्पत्याला ते सापडलं आणि ते नवजात बालक घरी आणून त्याला वाढवलं. तर एक आख्यायिका तो प्रकाशकिरणांतून साकारला असं सांगते तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार एका तलावातील कमलपुष्पात कबीराचा जन्म झाला. निर्णायक पुरावे नसल्याने या आख्यायिकांना फारसा अर्थ उरत नाही. पण यातील दोन संभाव्य आख्यायिकांनुसार कबीर हा ब्राह्मण विधवेच्या पोटी जन्माला आला. तीने त्याचा त्याग केल्यावर तो निमा-निरू या मुस्लिम विणकर दाम्पत्याला एका तलावात सापडला. आणि दुसरी अशी कि तो मुस्लिम विणकर दाम्पत्याचाच पुत्र होता. या संबंधाने कबीर  'तू ब्राम्हण मैं काशिका जुलाहा.' असं आपल्या काव्यात म्हणतो. जुलाहा म्हणजे विणकर. तत्कालीन समाजात काही ठिकाणी जुलाहा ऐवजी 'कोरी' म्हणून उल्लेख केला जायचा जी एक विणकर जात होती. बनारसमध्ये बहुतांश विणकर हे मुस्लिम समुदायाशी संबंधित आहेत. डॉ. हजारीप्रसाद व्दिवेदींच्या मते कबीर 'जुगी' किंवा 'जोगी' जातीचा होता. 'जुगी' किंवा 'जोगी' हे इस्लाम धर्माचा स्वीकार केलेले विणकर होते. वर्णसंकरामुळे ज्या पोटजाती निर्माण झाल्या त्यापैकी एक 'जुलाहा ' हि एक जात होती. इस्लामच्या छळाला बळी पडून वा तो चुकवण्यासाठी ज्या अनेक जातींनी सामूहिक धर्मांतर केले त्यापैकी ही एक जात होती. असं डॉ. व्दिवेदीचं संशोधन सांगतं. असं असलं तरीही स्वतः कबीर या बंधनात अडकलेला दिसत नाही. जाती-धर्माला त्याने महत्त्व दिलेलं दिसत नाही.

कबीर. रेखाटन : मिलिंद कडणे 
जाति न पूछो साधू की, पुछी लिजिये ज्ञान
मोल करो तरवारका, पडा रहन दो म्यान ।।
असं कबीराने एका पद्यात म्हटलेलं आहे.
 
ज्याच्या जन्माबद्दल, जन्मस्थळाबद्दल आणि निर्वाणाबद्दल अनिश्चितता आणि कैक मतमतांतरे आहेत असा हा कवी आणि तत्वचिंतक हिंदी साहित्याचं फार मोठं दालन व्यापून आहे. तुकोबांची गाथा जशी लोकांच्या मुखोद्गत होती, तिने काळाच्या सीमेची बंधनं नाकारली आणि हवेच्या प्रपातासारखी सर्वदूर पसरली अगदी त्याचप्रमाणे कबीराची रचना सर्वदूर पसरलेली दिसते.
 
मसि कागद छुयो नहीं, कलम गही नहीं हाथ ।
चारिउ जुग को महातम मुखहि जनाई बात ।।
 
हातात लेखणी न घेताही केवळ वाणीने धार्मिक कटुतेचं, स्व आणि शरीर यांच्या संबंधांचं, धर्म आणि अंधश्रद्धामूलक आचारांचं, मुक्ती आणि बंधन यांचं आणि मानवी स्वभावगुणांचं माहात्म्य सांगणारा हा कवी नावाप्रमाणेच महान आणि श्रेष्ठ होता. त्याचं हे श्रेष्ठत्व जपणाऱ्या, त्याच्या रचनांचा प्रसार आणि संवर्धन करणाऱ्या एका लोकसंगीत यात्रेत मी यात्री म्हणून ऑक्टोबर २०२२ मध्ये सहभागी झालो होतो. कबिरच्या रचनांचं आकर्षण हे एक कारण होतंच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं कारण होतं ते देशभर विविध प्रांतात जात-धर्म-वर्ण यांच्या सीमा ओलांडून लोकसंगीताद्वारे कबिर गाणारे लोकगायक. आणि ती यात्रा होती 'राजस्थान कबीर यात्रा' .

राजस्थान कबीर यात्रेतली एक संध्याकाळ . फोटो : लोकायन 
राजस्थान कबीर यात्रा ही भारतातील सर्वात मोठी लोकसंगीत प्रवास यात्रा आहे. हा लोकसंगीत महोत्सव दरवर्षी 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान राजस्थानच्या वेगवेगळ्या ग्रामीण भागात फिरतो. ज्यात कबीर, मीराबाई, बाबा बुल्लेशाह, गोरखनाथ, शाह लतीफ आणि इतर संत आणि ऋषींच्या भक्तीचा, निर्गुण आणि सूफी कवितांच्या मौखिक परंपरेचा उत्सव साजरा केला जातो.'लोकायन' या बिकानेर येथील स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने 2012 मध्ये पहिली राजस्थान कबीर यात्रा सुरू करण्यात आली. 'लोकायन' आणि राजस्थान पोलीस यांच्या 'तानाबाना' या प्रकल्पाद्वारे विविध समुदायांमध्ये सामंजस्यपूर्ण वातावरणाचा प्रचार आणि संगोपन करण्याच्या दृष्टीकोनातून समाजात शांतता आणि धार्मिक सलोखा सुस्थापित व्हावा या उद्देशाने या यात्रेचे आयोजन केले जाते. लोकसंगीताद्वारे मौखिक परंपरेतुन संतांची वाणी मुखर करणाऱ्या लोकगायकांसह जवळपास तीनशेहुन अधिक यात्री, अभ्यासक, संशोधक आणि तंत्रज्ञ या यात्रेत सहभागी होतात. कबीर आणि इतर संतांच्या रचनांचा, सत्संगाचा, सगुण-निर्गुण आणि हद-अनहद या संकल्पनांच्या अर्थांच्या शक्यतेत शरीराचा शोध घेणं, स्वतःला तपासणं, सुधारणं, आणि पूर्णतः खोडून पुन्हा नितळतेने स्वकडे पाहण्याची नितळ दृष्टी विकसित करणारा हा लोकसंगीत महोत्सव असतो.

कहां से आया कहां जाओगे? 

यात्रेला निघण्यापूर्वी मी सातत्याने अशा एका लोकगायकाला ऐकत होतो ज्याने कबीर आपल्या गायकीतून जनसामान्यांपर्यंत पोचवला. नुसता पोचवला नाही तर त्यांनी कबीराच्या रचनांचा अर्थबोध सांगितलाच पण त्या रचनांची आजच्या धार्मिक उन्मादाने दुभंगलेल्या वातावरणात माणसांना जोडून ठेवण्याची निकडही जोरकसपणे मांडली. कबीराच्या भजनांमधून ध्वनित होणारा अर्थ त्यांनी जात-धर्म-वर्ण- भाषा-संप्रदाय यांची बंधनं तोडून लोकांना सांगितला. बंधुभाव, धार्मिक सलोखा, मानवी अंतर्मन आणि मानवी मूल्यांची प्रासंगिकता त्यांनी कबीराच्या पद्यात शोधली, आत्मसात केली आणि तितक्याच तळमळीने लोकांना वाटूनही टाकली. नवनवे अर्थबोध त्यातून उलगडू लागले आणि हा आवाज देशभरच नाही तर विदेशातही पोचला. 

पद्मश्री प्रहलाद सिंग टिपानिया भारत जोडो यात्रेत कबीर गाताना. फोटो : गुगल 
कहां से आया कहां जाओगे
खबर करो अपने तन की
कोई सदगुरु मिले तो भेद बतावे
खुल जावे अंतर खिड़की
 
कबीराचे हे शब्द अमेरिकेच्या स्टॅनफर्ड आणि सिरक्यूझ युनिव्हर्सिटीत गाणारा आवाज होता माळव्याची लोकधून प्रहलाद सिंग टिपानिया.

प्रहलाद सिंग टिपानिया हे कबीर गाणारे भारतातील लोकप्रिय लोकगायक आहेत. मालवी शैलीतील लोकपरंपरेतील गाण्यांद्वारे त्यांनी ४ दशकांहून अधिक काळ ग्रामीण, शहरी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कबीराचा संदेश आणि कार्य पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मध्य प्रदेशातील लुनियाखेडी हे त्यांचं जन्मगाव. आई-वडील अशिक्षित. त्यामुळं त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजीकडे इंदोरला झालं. तिथेच त्यांनी इतिहास विषयात एम. ए केलं आणि लुनियाखेडी या त्यांच्या गावी ते शिक्षक म्हणून सरकारी शाळेत रुजू झाले.

१९७८ साली वयाच्या २४ व्या वर्षी देवास येथील एका कार्यक्रमात त्यांनी लोकवाद्य तंबुराची धून ऐकली. देवासमधील भजनी मंडळीत ते तंबुरा शिकू लागले आणि शिकता शिकता गाऊही लागले.


खेती करे तो थारे समज बताऊ
बलद्यान दुःख ना दिजे
अवसर खेत बीज मत बोजे
उंची संगत नाहर भुगतावे घरे बैठू रीजे
मन तू ऐसी खेती कीजे

तंबुरा शिकतानाची एक आठवण सांगताना ते म्हणतात -

''ये भजन गाकर मैं जब तंबूर सिख रहा था, तब मैने ये घटना प्रत्यक्ष रूप में देखी और मेरे अंदर का कचरा दूर हुआ. कि ये केवल गाना नहीं हैं, ये प्रकृती मे घटित होने वाली घटना हैं. और हमारे सबके जीवन का एक प्रत्यक्ष दर्शन हैं. तब मुझे इस सन्तोके वाणी के साथ रुजान, लगाव और श्रद्धा हुई. मैं कोई गायक नहीं हू, परंतु संतो कि वाणी को मैने जिस लोगोंसे सिखा उसे मैं अपने तोरतरीकेसे गाता हूँ. ''

घरंदाज गायकीची कुठलीही पार्श्र्वभूमी, परंपरा नाही. मालवी शैलीतील लोकगीतं, मौखिक परंपरेची सशक्त परंपरा आणि तंबुराची विलक्षण गहिरी धून सोबत घेऊन अध्यात्मिक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कबीराला सोबत घेऊन ते गावोगाव गाऊ लागले. माळवा प्रांतातील लोकगीतांच्या मौखिक परंपरेला चालना आणि श्रेय हे टिपानिया यांच्या गाण्यामुळे मिळालं असं नम्रपणे लुनियाखेडीतली माणसं सांगतात. असं असलं तरी प्रहलाद सिंग टिपानिया यांना स्वतःच्याच गावात सामाजिक भेदभावाला सामोरं जावं लागलं होतं. कथाभागवतच्या एका कार्यक्रमात त्यांना जेवणाचं निमंत्रण होतं. पण निमंत्रण असूनही अन्न आणि पाणी त्यांना दुरून वाढण्यात आलं. त्यांची भांडीही वेगळी ठेवण्यात आली होती. असा उल्लेख शबनम वीरमणी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'चलो हमारे देस' या माहितीपटात आढळतो. त्या प्रसंगापासून ते गावातील कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. त्यांनी स्वतःला गाण्याभोवती बांधून घेतलंय. असं त्यांची पत्नी शांती टिपानीया म्हणतात.


पद्मश्री प्रहलाद सिंग टिपानिया. फोटो : लोकायन. 
अनेक बंधन से बांधिया एक बेचारा जीव
छुटु अपने बल से या छूडाए मेरा पिव

असं म्हणत प्रहलाद टिपानिया पुन्हा भजन गायला दुसऱ्या गावी निघून जातात.

प्रहलाद टिपानिया यांनी माळव्यातील ग्राम सत्संग परंपरेसोबत मिसळून कबीराच्या काव्यातील अध्यात्मिकता आणि सामाजिकविचारांचं तत्वज्ञान अत्यंत सहज आणि रसाळ भाषेत लोकांपर्यंत पोचवलं. कर्मकांड, मूर्तिपूजा, पंडितांचा ढोंगीपणा, जातीय शोषणआणि धार्मिक ध्रुवीयकारणावर कबीर ज्या तीक्ष्णपणे खिल्ली उडवून त्यातलं मागासलेपण दाखवून निषेध करतो त्याच आवेशातटिपणीया गावोगाव फिरून भजनांमार्फत जागृती करून कबीरांच्या विचारातली सत्यता गेली 30 वर्षे पोचवत आहेत.

कबीराचा काळ हा धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्याही अराजकाचा, उन्मादाचा काळ होता. इस्लामचं आक्रमण सुरु झालेलं होतं. धार्मिक आणि राजकीय सत्ता हस्तगत करण्याची आकांक्षा बाळगून जोरजबरदस्तीने धर्मप्रसार होत होता. कबीराने या आक्रमक आणि उन्मादी काळाचं बारकाईने निरीक्षण केलं होतं. त्यामुळंच हिंदू-मुसलमान धर्मांपैकी त्याने एकालाही जवळ केलेलं दिसत नाही. दोन्ही धर्माच्या रूढ संकल्पनांना आणि आचार-विचारांना त्यांनी छेद देऊन प्रखर टीका केलेली दिसते. संन्यासी, फकीर, जोगी, जंगम, नाथपंथी, मुल्ला, मौलवी, सुफी असे कैक पंथ, त्यांचे आचारविचार, उपासनामार्ग असताना कबीराने यापैकी कुठल्याच पंथात स्वतःला बहाल केलं नाही. त्यामुळं त्यांच्या आचारविचारांवर, रूढ धार्मिक कर्मकांडावर, त्यांच्यातील अहंकार आणि दंभावर मोकळी टीकाकरण्याचे स्वातंत्र्य त्याला घेता आले. कुणात सामावलं न गेल्यामुळं त्याची टीका प्रखर, अत्यंत तीक्ष्ण आणि भेदक ठरली. 'जाति न पूछोसाधू की' हे कबिरने दिलेलं मार्मिक उत्तर तत्कालीन 'पाखंडी'यांची मुळं उद्ध्वस्त करणारं ठरलं. यापुढे जाऊन कबिरने त्यांना विचारलेला प्रश्नही भेदक आणि मार्मिक आहे –


तुर्को कि मस्जिद में, हिन्दुओ के मंदिर में 
खुदा और राम दोनों बसते हैं
पर जहाँ न मस्जिद हैं न देवता
वहाँ कोन समाया हुआ हैं ?

कबीर केवळ कवी नाही तर तत्वचिंतक आहे. त्यामुळं तो ईश्वराला एका संकुचित कक्षेत बसवत नाही; तर त्याला अमूर्त रूप देतो. कबीर इस्लामच्या एकेश्वरवादाच्या आणि हिंदूंच्या अनेकदेवतावादाच्या कक्षा ओलांडून मोकळा होतो. तो अल्लाचा उरत नाही, नाही रामाचा. तो फक्त 'सत्य' या तत्वात सामावतो.

आपल्याच वर्तुळात राहणार तो गूढवादी कवी नव्हता. म्हणूनच कबीर जनसामान्यांपासून दूर जात नाही. धर्माच्या नावावर होणाऱ्या अनिष्ट रूढी आणि त्यातल्या खोटेपणाला तो वारंवार धक्के देत राहिला. अशा काळात जिथे बिद्धीप्रामाण्यवाद दुर्मिळ होता. प्रस्थापित धर्माला विरोध हे मोठं पातक समजलं जायचं. कबिरने हे नेटानं आणि निकडीनं सुरु ठेवलं.

प्रहलाद टिपानियांनी लुणियाखेडीत आपल्या घरासमोर सद्गुरू कबीर स्मारक' उभारलं आहे. गावातील अधिकाधिक लोक कबीराच्या विचारांशी जोडले जावेत, त्याच्या रचनांच्या गायनाचे कार्यक्रम व्हावेत हा यामागचा उद्देश. या स्मारकात कोणतीही मूर्ती नाही. कबिरची ना अन्य कुणाची. टिपानिया म्हणतात, "ये स्मारक कबिरकी याद हैं. मूर्ती नहीं हैं क्यू कि कबीर खुद मूर्तिपूजा मानते नहीं थे. ईश्वर तो आकार से परे हैं. मूर्ती होती तो लोग टीका लगाने आ जाते. पैसा देते. और मैं इस स्मारक का पुजारी हो जाता!"

1997 साली कबीरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी प्रहलाद टिपानिया यांनी 'कबीर स्मारक शोध संस्थान' ची स्थापना केली. त्याअंतर्गत वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. कबीरांच्या रचनांचा अर्थ आणि प्रासंगिकता सांगणाऱ्या निवासी कार्यशाळा होतात. गरीब मुलांना निःशुल्क शिक्षण देणारी एक शाळा या संस्थेतर्फे चालवली जाते. माळवा आणि आजूबाजूच्या प्रांतात वसलेल्या कंजर समाजात जनजागृतीसाठी कबीर भजनांचे कार्यक्रम प्रहलाद टिपानिया करतात. त्या समूहाच्या विचारात परिवर्तन व्हावं म्हणून ते जाणीवपूर्वक त्यांना वाईट वाटेल अशी भजनं गातात. आज त्या समूहात शिक्षणाचा प्रसार आणि त्यांचे बदलते विचार पाहून या संस्थेचं कार्य योग्य मार्गावर आणि कबीरांच्या विचारांच्या दिशेने सुरु असल्याचं समाधान ते व्यक्त करतात.

दरवर्षी फेब्रुवारी मध्ये पाच दिवसांची लोकसंगीत यात्रा या संस्थानाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येते. जी 'माळवा कबीर यात्रा' म्हणून लोकप्रिय आहे. देश-विदेशातून लोक या यात्रेकरिता माळव्यात जमतात. मौखिक परंपरेतून आलेली लोकगीतांचा ,कबीर आणि इतर अनेक संतांच्या काव्याचा उत्सव म्हणजे माळवा कबीर यात्रा असते. लोकसंगीत आणि कबीराच्या तत्वज्ञानाचा खोलवर प्रभाव असणारी असंख्य माणसं या यात्रेत जोडली जातात.

मध्य प्रदेशातील माळवा प्रांतातील मौखिक परंपरेच्या पुनरुत्थानासाठी आणि कबिरची वाणी व तत्वज्ञान देश-विदेशात जनसामान्यांपर्यंत पोचवण्याच्या महत्त्वपूर्ण आणि मौलिक योगदानाबद्दल प्रहलाद टिपानिया यांना 2011 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या संपूर्ण परिवारासह ते आजही अविश्रांत तळमळीने गावोगाव कबिरचं तत्वज्ञान, जात -पात आणि आजच्या धार्मिक ध्रुवीयकारणाच्या उन्मादी काळात अस्मिता विरहित माणूसपणाचा शोध घेत गाताना दिसतात. 'भारत जोडो यात्रे'त हातात तंबुरा घेऊन कबीर गाण्याचं ते धारिष्ट्य दाखवतात त्यामागे कबिरची त्यांच्यात झीरपलेली अंतर्दृष्टी आहे. प्रहलाद सिंग टिपानियायांनी कबीरांच्या काव्यातलं निर्गुण निराकाराचं, समतेचं सूत्र ओळखून त्याला आपल्या गाण्यातून जनसामान्यांपर्यंत पोचवलं. कबीराचे बोल कानात रुंजी घालतील अशा संस्मरणीय चाली त्यांनी कबीरांच्या भजनांना लावल्या.

तीरथ में तो सब पानी है, होवे नहीं कछु अन्हाय देखा ।

प्रतिमा सकल तो जड है भाई, बोलें नहीं बोलाय देखा ॥
पुरान कुरान सबै बात है, या घट का परदा खोल देखा ।
अनुभव की बात कबीर कहैं, यह सब है झूठी पोल देखा ॥

प्रहलाद सिंग टिपानिया हा कबिराचं तत्व अंगीकारून शून्यतेच्या शिखरावर पोचलेला लोकगायक आहे. ज्याचा शोध 'सत्य' या सूत्राभोवती फिरतो. जे कबीराच्या समतेचं सूत्र होतं.

हमारे मिट्टी कि सुगंध सुनो भाई !

उदयपूरच्या दिशेने ट्रेननं बांद्रा स्टेशन सोडलं तेव्हा मी असं सगळं कायकाय डोक्यात घेऊन निघालो होतो. सरोवरांच्या शहरात फतेसागर लेकच्या शेजारी कबीर यात्रेचं उदघाटन होतं. कबीर मूर्तिपूजन किंवा दीपप्रज्वलन वगैरे असलं काही नाही. फक्त संगीत. पहिला दिवस गाजवला तो कच्छ च्या मुरालाला मारवाडा यांनी. मीराबाईचं  भजन गाऊन त्यांनी सगळ्यांना अगदी चार्ज केलं.

नहीं जाऊं नहीं जाऊं सासरिये मोरी मां, हो रामईया!

मेरो मन लागो रे, मेरो चित्त लागो रे, फ़कीरी (गरीबी) मां

पहाडी आवाजात सगळ्यांना थिरकायला लावणारा मुरालाला मारवाडा आणि त्याचे सोबती. फोटो : शोधण्यातली खाडाखोड

मुरालालाला साथ देणाऱ्यांमध्ये एक वाद्य घडा-घमेला हे आहे. मी मुरालालाचं भजन संपल्यावर स्टेजमागे जाऊन त्यांना भेटायला गेलो तर अक्षरशः शेण भरण्यासाठी जे घमेलं वापरतो ते वाद्य म्हणून त्यांनी वापरलं होतं. त्यासोबत घडा. म्हणजे मडक्याच्या तोंडाला चामड्याचं आवर्तन बांधलेलं होतं. बोटात अंगठी घालून त्याची थाप घमेल्यावर आणि दुसऱ्या हाताने घड्यावर थाप मारली कि जो काही आवाज घुमतो तो अक्षरशः अवाक करणारा असतो.

हिए काया में वर्तन माटी रो, हिए देही में

फूटी जासे नहीं करे रनको
साहिब हमको डर लागे एक दिन रो
एक ही रे दिन को, घड़ी पलक रो
नहीं रे भरोसो एक ही पल रो

हे कबीराचे शब्द मुरालाला एरवी चढत जाणाऱ्या पहाडी आवाजाला बाजूला सारून संथ मधाळ आवाजात निव्वळ घडा-घमेला आणि टाळ ( मंजिरा ) यांच्या साथीनं गातो तेव्हा अक्षरशः तंद्री लागते.

फतेसागरच्या कठड्यावर गार वारा झेलत मुरालालाला बोलतं केलं तेव्हा कळलं, कि एका शिक्षकाने त्यांच्या पुतण्याला मारहाण करतानाचं दृश्य बघितल्यावर त्यांनी पुन्हा शाळेत पाऊल ठेवलं नाही. आठ वर्षांचे असताना त्यांनी त्यांच्या गावातील सत्संगाच्या कार्यक्रमात पहिल्यांदा तंबूराचा आवाज ऐकला. तेव्हापासून शाळेत न जाता त्यांनी वडिलांकडून आणि गावातील लोकगायकांकडून गाणे शिकले. त्यांना कोणतंही गाणं  लिहावं लागलं नाही. अनेक वर्षांच्या सत्संगातून आणि मौखिक परंपरेने जतन केलेल्या लोकगीतांमधून त्यांनी कबिरपासून मीराबाई ते बाबा बुल्लेशाह यांचे कलाम त्यांनी आत्मसात केले. मुरालाला हे राजस्थानातील मेघवाल गायकांच्या वंशातील आहेत ज्यांनी 350 वर्षांपूर्वी कच्छ येथे स्थलांतर केलं होतं. त्या वंशाचे मुरालाला हे 11 व्या पिढीचे गायक आहेत.

त्यांचा देखणा तंबूर हातात घेऊन त्यांना म्हणालो, ये आपने कब बनवाया? तर मोट्ठ्यानं हसत ते म्हणाले, "भाई यें मैने नहीं बनवाया. मेरे परदादा के जमानेका हैं ये. अब डेढसो साल का हो गया हैं. बहुत यादें जुडी हैं हमारी इस तंबूर से."

मुरालालाचा तो देखणा तंबूर तब्बल दीडशे वर्ष जुना होता. अनेक पिढ्यांपासून त्याच्यापर्यंत वाहत आलेला हा संतांच्या विचारांचा प्रवाह होता. स्वतः अक्षर गिरवलेलं नाही पण पारंपरिक लोकगीतांपासून आजच्या बदललेल्या सांस्कृतिक परिवेशातही त्यांनी कबीर, मीरा, रविदास, ब्रह्मानंद, धर्मदास, बुल्लेशाह यांचे शब्द मुखोद्गत करून ठेवले आहेत. मातीबानी सारख्या उपक्रमाद्वारे त्यांनी परदेशातही आपला आवाज पोचवला आहे. कोक स्टुडिओ आणि काही चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत. ते आता स्वतःच्या मुलीला गाणं शिकवत आहेत. मेघवाल समूहाच्या परिवर्तनाचा दीडशे वर्षांच्या पिढ्यांचा साक्षीदार असलेला तंबूर त्यांनी आता तिच्या हातात सोपवला आहे.

अग्नि कहे मने टाट पड़त है, पानी कहे मैं प्यासा

अनाज कहे मने खुदिया लागी, घिरत कहे मैं रूखा
थारी काया में...

कच्छच्या रणरणत्या उन्हात मुरालाला मारवाडा स्वतःला शोधण्याचा मार्ग शोधत आहेत. ज्याची वाट त्यांना कदाचित मुखोद्गत असलेल्या मौखिक परंपरेत सापडण्याची शक्यता आहे. हे मला वाटतंय. शोध वेगळा असू शकतो. तिथपर्यंत पोचणं वेगळं असू शकतं. 'पोचणं' काय अर्थाने आपण घेतो हेही व्यक्तिगणिक बदलत असावं. पण शेवटी शेवटी शोध उरतोच. काहीतरी सापडणं, गवसणं आपल्याला समूळ बदलू शकतं. पण हीही एक शक्यताच. मी थोडा अधिकाधिक गुंतत जातो नि गाडी पुढच्या गावाला निघते.

क्या खोजती फिरो म्हारी हेली ?


ज़रा हल्के गाड़ी हांको,
मेरे राम गाड़ी वाले
गाड़ी मेरी रंग रंगीली,
पईया है लाल गुलाल
हांकन वाली छैल छबीली,
बैठन वाला राम, ओ भईया
ज़रा हलके गाड़ी हांको

म्हणत गाडी दुसऱ्या गावाच्या दिशेने रवाना झाली. यात्रेसाठी गावं अशी निश्चित केलेली असतात जिथे धार्मिक सलोखा निर्माण करण्याची गरज आहे. राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने यात्रेच्या स्थळांची निश्चिती होते. दरवर्षी राजस्थानच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात हि यात्रा फिरत असते. यात्रेचा दुसरा मुक्काम होता सेई, साबरमती, पामरी, वाकल, दिवाव आणि कोसंबी या नद्यांनी वेढलेलं कोटडा हे गाव. आमची बस नागमोडी वळणं घेत कोटडाचा घाट चढत होती. बसमध्ये अनेक कविता, कथा, किस्से, एकमेकांची ओळख, भजनं यांचा मिश्र आवाज गर्दी करून होता. तीनशे यात्रींना सोबत घेऊन फिरणाऱ्या दहा बस कोटडा सीमेत पोचल्या तेव्हा उतरल्या उतरल्या गावकऱ्यांनी आमच्या गळ्यात हार आणि फुलांचा वर्षाव केला. मुस्लिम बांधव फळवाटप आणि सरबत एकेकाच्या हातात देते होते. मी हे पाहून चक्रावलो. किती आपुलकीनं त्यांनी आमचं स्वागत केलं. मग सगळ्यात पुढं लोकगायक मग सगळे यात्री अशी एकदिड तासाची वाजतगाजत मिरवणूक पार पडली. फुलांचा वर्षाव आणि सगळ्यांचं मिळूनमिसळून नाचणं.

आम्ही पुन्हा येऊन बसमधल्या आमच्या बॅगा घेऊन निवासाच्या ठिकाणी आलो. ती व्यवस्थाही गावकऱ्यांनी केलेली असते. गावाच्या मोकळ्या सभागृहात किंवा शाळेच्या खोल्यात. गाद्या टाकलेल्या असतात. आपण जाऊन आपली बॅग त्यावर ठेवायची. म्हणजे आपली झोपायची जागा फिक्स झाली. दुसऱ्या गावाला निघताना अंघोळीला पाणी मिळेल का याचीही आपल्याला शाश्वती नसते. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था ज्या गावात यात्रा जाईल त्या गावातल्या गावकऱ्यांनी केलेली असते.


कोटडा गावात स्वागत करणारे गावकरी. फोटो : शोधण्यातली खाडाखोड

कोटडा मधल्या गावकऱ्यांनी खास पारंपरिक राजस्थानी दाल बाटी चुर्माचा बेत केलेला. जेवण झाल्यावर एकेक करत आम्ही पटांगणात एकत्र जमलो जिथे मुख्य कार्यक्रम असणार होता. रंगमंच योजना आणि साउंड इक्विपमेंट हे दर गावात घेऊन फिरावं लागे त्यामुळं त्यांचं सेटअप होईपर्यंत जेवणाचा कार्यक्रम असे. साधारणतः९ वाजता प्रत्येक कलाकारांच्या लाइनअप नुसार भजनांच्या कार्यक्रमाला सुरुवात व्हायची. लोकगायक मग जे काही सुरु करायचे ते साधरणतः पहाटे ४ वाजेपर्यंत चालायचं. कबीर, बुल्लेशाह, मीरा, अशी कैक नावं. रात्रभर नुसतं संगीत.  गावातल्या स्थानिक भजन मंडळींनाही संधी मिळायची. त्यामुळं कोटडातल्या स्थानिक भजन मंडळींनी खास मेवाडी भाषेत गायलेली भजन आम्हा सगळ्यांनाच अवाक करून गेली.

रात्री साधारणतः दोनेक वाजता मंचावर आला मीर बसू खान. जैसलमेरच्या पुगल या गावातून येणारा मीर बसू हा सुफी आणि सराईकि गायक आहे. जन्मजात संगीताची कुठलीही पार्श्र्वभूमी नाही. त्याच्या सासऱ्याकडून त्याला संगीत मिळालं. मीर बसू हा जैसलमेरमध्ये ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतो. कबीर याच्यासोबत अमीर खुसरो, बुल्लेशः यांचे कलाम तो गातो. त्या रात्री त्यांनी अमीर खुसरो यांची लोकप्रिय कविता 'छाप तिलक'आपल्या सराईकि अंदाजात सादर केली. त्याला साथ दिली अब्दुल जब्बार यांनी.

वे सानु लई चल

सजना नाल जा टिकटा दो लेले
संग बनीआए किस्मत नाल जा टिकटा दो लेले
ओह प्यार दि ये रीत निभायें
एक दुजे विच फर्क न पाए
बण दुख सुख दा
भाईवाल ते टिकटा दो लेले

म्हणत मीर बसू यांनी ती रात्र गाजवली. मीर बसू जैसलमेरच्या अनेक गावात आज सुफी संगीत आणि सराईकि गायकीतुन कबीर आणि इतर संतांच्या कविता आणि कलाम सादर करत आहेत. त्याबद्दल प्रशिक्षण देत आहेत. मुंबईतील सहेज फाउंडेशनच्या माध्यमातून ते मुंबईसह भारतातील अनेक राज्यांमध्ये गायनाचे कार्यक्रम करतात. जैसरलमेरमध्ये आज अनेक लोकगायक तयार झाले आहेत जे जात-धर्म-संप्रदाय यांच्या पल्याड पाहून मौखिक परंपरेची लय जतन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

 

मीर बसू खान. याच्या डोळ्यात पाहणं म्हणजे थरार असतो. फोटो : लोकायन 

सरायकी भाषेचे मूळ मुलतान पाकिस्तानात आहे. आजही सिंध प्रांत, दक्षिण पंजाब, बलुचिस्तान मध्ये ही भाषा बोलली जाते. मीर बसू खान, मुख्तियार अली, मीर रझाक या भाषेत गातात. पुगल हे त्याचं गाव पाकिस्तान बॉर्डरपासून काही किलोमीटरवर आहे. पुगल पासून 150 किमी च्या क्षेत्रात सरायकी बोलली जात असल्याचं ते सांगतात. ही भाषा त्याच्यापर्यंत पोचली ती ख्वाजा गुलाम फरीद यांच्या 'काफ़ी' तुन. काफ़ी म्हणजे चार-पाच ओळींची पदं. सरायकी गायकी ही ख्वाजा गुलाम फरीद यांच्या काफ़ीची देण असल्याचं ते सांगतात. कारण या काफ़ी म्हणजेच संगीताचं एक स्वतंत्र रूप आहे. उर्दू, पंजाबी, फारसी आणि मारवाडी या भाषांचं मंथन म्हणजे सरायकी गायन. कबीर यात्रेत त्यांनी गायलेलं 'दो टिकटा' हे गाणं सरायकी-पंजाबी भाषेतलं लोकगीत आहे. या भाषेचा ध्वनी हा सिंधी भाषेशी मिळताजुळता आहे. अताउल्लाह खान एसा ख़िलवी, पठानय खान, आबिदा परवीन ,उस्ताद मुहम्मद जुमान, मंसूर मलंगी, तालिब हुसैन दर्द, कमाल महसूद इत्यादी गायकांनी सरायकी लोकगीतांचं गायन केलेलं आहे. सरायकी भाषेला पंजाबीची बोली म्हणून काहीजण मानतात. परंतु ही एक स्वतंत्र भाषा आहे जिला स्वतःचा वेगळा रंग असल्याचं मीर बसू सांगतात.

शाकिर शुजाबादी हे प्रसिद्ध आधुनिक कवी आहेत ज्यांची  कलाम-ए-शाकिर, खुदा जाने, शाकिर दियान गजलान, पीले पत्र, मुनाफ्क़ान तू खुदा बचावे आणि शाकिर दे दोहरा ही पुस्तकं सरायकी भाषेत प्रसिद्ध झाली आहेत.

मीर मुखतियार अली हे आणखी एक पुगल येथील प्रसिद्ध नाव. बुल्ले शाह, सुलतान बहू, शाह हुसेन यांसारख्या सूफींच्या कविता त्यांनी जिवंत ठेवल्या आहेत. मुख्तियार स्थानिक सत्संग आणि जागरणांमध्ये धार्मिक, सूफी आणि भक्ती परंपरेतून स्वतःपलीकडे पाहून संपूर्ण मानव हिताच्या दृष्टिकोनातून जनजागृती आणि चर्चा घडवून आणण्यात पुढाकार घेत आहेत.

देखा अपने आप को, मेरा दिल दीवाना हो गया

ना छेड़ो यारों मुझे, मैं खुद मस्ती में आ गया

असं म्हणत मुख्तियार अली लोकगायकांच्या प्रसारासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि इतर सामाजिक उपक्रमांसोबत काम करत आहेत. त्यांच्यासोबत रशीद खान, लतीफ खान, बागे खान, सकूर खान, मीर रझाक अली अशी एकाहून एक सरस अशी सुफी-भक्ती लोकगायकांची फळी मौखिक परंपरेचं संवर्धन आणि प्रसार करत आहे. आपल्या गावातील आणि आजूबाजूच्या भागातील अनेक लहान मुलांना मिराशी गायनाचे प्रशिक्षण देत आहेत.


मुख्तियार अली. फोटो : अजब शहर 
स्थानिक भजन मंडळी, मीर बसू, कबीर कॅफे बँड आणि मुरालाला यांनी रंगवलेली मैफिल पहाटे चारला संपली. आम्ही गाणी गुणगुणत निवास्थानी आलो. झोप फक्त तीन तासांची. सकाळी आंघोळीसाठी शाळेच्या नळावर धावाधाव सगळ्यांची. एकेक करत नळाखालीच बसलो. मग गावकऱ्यांनीच पोह्याचा टोप आणून ठेवला शाळेत सोबत चहाची टाकी. घासघास खाऊन पुन्हा आम्ही सगळे बसमध्ये चढलो. असा दिनक्रम रोज. सकाळी दोन तासांचा सस्तंग असतो असा मित्र म्हणालेला. पण अजूनतरी एकाही मुक्कामी सकाळचा सत्संग झाला नाही. कबीर यात्रेचा मुख्य गाभा हा सकाळचा सत्संग असतो. मी उत्सुक होतो. कारण यात्रेतला सत्संग म्हणजे मधोमध गायक आणि सभोवती बसलेल्या यात्रींचं वर्तुळ. टाळ आणि तंबूराची गहिरी मोहमयी धून. मी पुढच्या मुक्कामी तरी सत्संग होईल अशी आशा साठवत गाडीत बसलो. गाडी आरवली डोंगररांगांच्या मधोमध जगातील दुसरी सगळ्यात लांबीची भिंत असलेल्या कुम्भलगड किल्ल्याकडे निघाली. गाडीत पुन्हा भजनं, किस्से, कथा. चहुबाजुंनी नुसतं लोकसंगीत बिलगलेलं. 

सकाळी ११ वाजता निघालेल्या गाड्या कुम्भलगढला संध्याकाळी ५ वाजता पोचल्या. पुन्हा निवासस्थानी जाऊन जागा पकडण्यासाठी धावाधाव. यावेळी राहायला मंगल कार्यालय होतं. बऱ्यापैकी मोठं म्हणजे दुमजली मंगल कार्यालय होतं. नेहमीप्रमाणे स्थानिक गावकऱ्यांनीच जेवणाची व्यवस्था केली होती.  आदल्या दिवशीचं जागरण होतं पण आठ दिवस असंच असणार होतं त्यामुळं लोकांनी मानसिक तयारी ठेवली होती. काहींनी या आधीच्या यात्राही केलेल्या असतात. त्यामुळं त्यांना एकंदरीत सोयीसुविधांचा अंदाज असतो. आधीच्या गावासारखीच नव्या ठिकाणी अंघोळीसाठी किंवा शौचासाठी धावाधाव असते.

निवासस्थानापासून किल्ला दोन किलोमीटरवर होता. किल्ल्यामध्येच आजची मैफल रंगणार होती. रात्रीचा कुम्भलगढ प्रचंड देखणा दिसत होता.

यात्रेच्या पहिल्या दिवशी मुरालाला मारवाडा यांनी लोकांना घडा-घमेल्याच्या तालावर नाचायला लावलं होतं त्याच आवेशात लोकं कुम्भलगडावर नाचत होती. भजन होतं कवी ब्रम्हानंद यांचं,

सब चला चली का खेला

दो दिन का है जुग मां मेला
सब चला चली का खेला
कोई चला गया, कोई जावे
कोई गठड़ी बांध सिधावे
कोई खड़ा तैयार अकेला
सब चला चली का खेला

या भजनावर प्रत्येकजण स्वतःच्या तंद्रीत नाचत होता. कुणी एकेकटं किल्याच्या पायऱ्यांवर बसून गुणगुणत होतं. देहभान हरपून लोकं भजनाच्या लयीत मिसळून गेली होती. नेहमीप्रमाणे आजही मैफल संपायला चार वाजले. पुन्हा तीन-चार तासांची झोप.

सकासकाळी यात्रेचे स्वयंसेवक 'महेशाराम जी सत्संग ले रहे हैं सभी यात्रींओसे निवेदन हैं कृपया जल्दी उठिये.' असं ज्याच्यात्याच्या गादीजवळ जाऊन सांगू लागली. मी हे झोपेत चुकल्यासारखं ऐकलं आणि ताड्कन उठलो. मी ज्याची वाट बघत होतो तो सत्संग होणार होता. आणि ते घेणार होते साक्षात महेशाराम.

मैं वारी जाऊं रे, बलिहारी जाऊं रे

कुम्भलगढला मंगल कार्यालयात सकाळी ८ वाजता सत्संग सुरु झाला. ओ रे गजानन प्यारे गजानन हे गणेश वंदन गाऊन त्यांनी सत्संगाला सुरुवात केली. मैं 'वारी जाऊं रे, बलिहारी जाऊं रे' हे कवी नारायणदास यांचं महेशा राम यांनी गायलेलं भजन लोकप्रिय आहे. महेशरामांचा शांत, संयमी आणि मंत्रमुग्ध करणारा आवाज ऐकून मी त्यांचा फॅन झालो होतो. ध्यान आणि मंत्रमुग्धता हा त्याच्या गाण्याचा विशेषगुण आहे. त्यांनी कबीर, गोरखनाथ, बाबुलाल, धरमदास, मीराबाई आणि नारायणदास यांच्या गायलेल्या रचना याची साक्ष देतात.

महेशाराम हे जैसलमेर येथील मेघवाल समुदायातील लोक गायक आहेत. कबीरासह अनेक भक्ती कवींच्या पारंपरिक मौखिक कवितेचे वाहक आहेत. आपल्या गायनाद्वारे त्यांनी ती जिवंत ठेवली आहे. कबीर, मीरा, गोरख आणि इतर भक्ती कवींची गाणी ऐकत त्यांनी मौखिक परंपरेचा आत्मा त्यांनी आत्मसात केला आहे. मेघवाल समूहाच्या लोकशैलीचे प्रतिनिधित्व ते आपल्या गायनातून करतात.


  कुम्भलगढ येथील सत्संगात रंगून गेलेले महेशा राम. फोटो : शोधण्यातली खाडाखोड
जी कबीरा रे
चालत चालत जुग भया
कौन बतावे धाम जी?
मन भेदूं को व्हाला भूलो फिरे
पाँव कोस पर गाम जी

हे कबिरांचं भजन त्यांनी सत्संगात गायलं. ईश्वराचं अस्तित्व हे तुमच्या-माझ्या शरीरात आहे. इतरत्र त्याचा शोध घेण्याची गरज नाही. असं ते म्हणाले.

मी मात्र त्यांचं हळू बोलण्याकडे आकर्षित झालो होतो. याआधीही त्यांच्या गाण्याने निव्वळ सुख दिलं होतं. गाण्यातही त्यांचा शांत सूर आहे. कुणाला आकर्षून घेण्याची लालसा त्यांच्या गायनात नाही. तरीही आपण त्यांच्या गायनाकडे आकर्षित होतो. कबिरांचं तत्वज्ञान आणि भक्तिकाव्यातील सहजता महेशा राम तितक्याच तन्मयतेनं आणि हळुवार समजावून सांगतात. माझ्यासाठी महेशा राम यांचा सत्संग यासाठी महत्त्वाचा होता. काहीतरी गोष्ट शोधण्यासाठी असते. त्याचा प्रवास शांततेत व्हायला हवा. नंतर जे काही चांगलं-वाईट सापडेल ते आपलं असेल. शांततेचा शोध बहुतेक संगीतात आहे असं कबीर यात्रेत गायलं जाणारं जे लोकसंगीत आहे ते ऐकताना सतत वाटत राहील. एखाद्या गोष्टीत रमून जाणं क्वचित घडतं. महेशा राम ऐकताना मी रमून जातो.


पिया जी थारो पंथ है भारी
मुझे प्रेम की कटारी डारी
मधुर सुर बोल रे कागा
मीरा रो मन राम से लागा

सत्संग संपवताना महेशा राम यांनी मीराबाईचं हे भजन गायलं. मी पुन्हा नेमकं आपण कशाच्या शोधात आहोत विचार करत बसलो. आणि हा शोध नेमका कसा घेतात असा पेच माझ्यासमोर उभा राहिला. प्रश्नातच उत्तर आणि उत्तरातच प्रश्न असा घोळ निर्माण झाला.

 

परतीच्या प्रवासात प्रकाश खातू भजन गातोय. फोटो : शोधण्यातली खाडाखोड 

प्रकाश खातू या बाडनेर मधल्या मुलाने फलासिया आणि सलूंबर येथे अक्षरशः धमाल आणली. काय एनर्जेटिक आवाज. सलूंबर मध्ये पावसामुळे मूड गेलेला. पण या पोरांनी अक्षरशः सगळ्यांना जागेवरून उठवून नाचायला लावलं. यात्रेच्या शेवटच्या दिवशी भीम या गावातून जयपूरकडे निघताना बसमध्ये याला मी गायला लावलं. बाडनेर मधल्या अनेक तरुण मुलांसह त्याने मौखिक परंपरेतील लोकगीतं तोंडपाठ केली आहेत. गावात सार्वजनिक कार्यक्रम किंवा सत्संगामध्ये ते आपलं गायन सादर करतात. कबीर यात्रेत मीराबाईच्या 'बाई मीरा ने गिरीधर मिलिया' या अप्रतिम भजनाच्या गायनाने त्याने सगळ्यांना जिंकून घेतलं. राजस्थान कबीर यात्रेच्या लोकगायकांपैकी प्रकाश खातू हा सर्वात तरुण गायक आहे. मौखिक परंपरेतून मिळालेलं उत्कट ज्ञान हा प्रकाश आणि त्याच्या सहकारी गायकांच्या गाण्याचा मूळ स्रोत आहे. या परंपरेच्या प्रसारासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं आहे.

गाडी पुन्हा पुढच्या मुक्कामाला निघाली. पुन्हा वेगळं गाव. उदयपूर-कोटडा-फलासिया- कुम्भलगड राजसमंद-सलूंबर-भीम करत अखेर बस जयपूर इथं पोचली.

आठ दिवस धावपळीचं संगीत मागोमाग. तीन-चार तासांची झोप. सकाळी पाणी मिळालं तर अंघोळ नाहीतर सगळा बोजा घेऊन सरळ गाडीत बसायचं. गाडीत पुन्हा संगीत. नव्या ओळखी. किस्से. आठवणी आणि बरंच कायकाय मागचं पुढं घेऊन जाणारा प्रवास. यात्रेच्या एका स्थळावरून दुसऱ्या स्थळाचं अंतर साधारणतः शंभर-दीडशे किलोमीटर. दोन गावांदरम्यानचा प्रवास आणि आदल्या रात्रीच्या जागरणाचा थकवा. पण थकवा असं काही आपल्या म्हणता येत नाही. जाणवत नाही असंही आपण म्हणू शकत नाही. फक्त तसं लक्षात येणारं वातावरण नसतं आसपास. आठ दिवस कानात असंख्य गोष्टी शिरतात. नव्या-जुण्या. कायकाय घ्यावं किती ऐकावं आणि काय नको ते अजिबात ठरवण्याची सोय नसते. तरी किंचित वेळ मिळते आपल्याला काहीतरी यातलं मनापासून लागलंय याची जाणीव होणारी. त्यांच कनेक्शन कधीतरी जुळलं जातं. नाहीतर नुसता गोफ होतो सगळ्या ऐकण्यापाहणाऱ्या दृश्याचा.

जयपूरहून मुंबईकडे येताना मी यात्रेतल्या रेकॉर्डी ऐकत होतो. प्रहलाद टिपाणीया, महेशा राम, बागे खान, मीर बसू, काळुराम बामनीया, मुरालाला मारवाडा, गवरा देवी, रायजिंग मलंग, प्रकाश खातू, आठवत राहिले. पण एक वेळ अशी आली कि फक्त शांत बसून राहिलो. मग


सभी ठौर जमात हमरी
सब ही ठौर पर मेला
हम सब माय सब है हम माय
हम है बहुरी अकेला

हे कबीराचे शब्द आठवत राहिले. गाडीनं वेग पकडला नि आठवणी एकेकट्या होत गेल्या.

पूर्वप्रसिद्धी : ‘वसा’ दिवाळी, २०२३.

 *** 


भटक्या दिवसांच्या दरम्यानच्या नोंदी

29 सप्टेंबरला जोधपूरला उतरलो तेव्हा घंटाघरची देखभाल करणाऱ्या मुहम्मद इकबाल चाचाला फुरसतीत भेटायचं निश्चित केलं होतं. पुढचे तीन दिवस इथं होतो...