29 सप्टेंबरला जोधपूरला उतरलो तेव्हा घंटाघरची देखभाल करणाऱ्या मुहम्मद इकबाल चाचाला फुरसतीत भेटायचं निश्चित केलं होतं. पुढचे तीन दिवस इथं होतो पण भेट झाली नाही. सकाळ संध्याकाळ नुसत्या फेऱ्या मारायचो. निराश होऊन 2 ऑक्टोबरला जोधपूर सोडून बिकानेरला गेलो. पहिले दोन दिवस वगळता कबीर यात्रेत फार काही हाती लागलं नाही. मग कंटाळून यात्रेचा शेवटचा दिवस न करता मी अन्वर हुसेन सर आणि चित्रकार मित्र अनुपने पुन्हा जोधपूरला यायचं ठरवलं. उन्हाच्या लकाकत्या ओळींच्या हालचाली मागेमागे सांडत टप्प्याटप्प्याने बसमधून उतरणाऱ्या-चढणाऱ्या रंगबेरंगी माणसांच्या आकृत्या बघत जोधपूरला उतरलो. दुपारचं ऊन इतकं कडाक्याचं कि झोस्टेलमधून बाहेर पडवेना. संध्याकाळी सरदार मार्केट मधल्या गल्ल्या धुंडाळत पुन्हा इकबाल चाचाला भेटायला घंटाघर गाठलं तर हा गडी तेव्हाही नव्हता तिथं. दिव्यांची मंद रोषणाई आणि कोपऱ्यात रावणहाथावर राजस्थानी लोकगीतं न वाजवता भलतीच बॉलिवूड हिट गाणी वाजत होती. खाली पायऱ्या उतरताना लक्षात आलं हा चक्क रावणहाथावर सलमानच्या बॉडीगार्डमधलं तेरी मेरी प्रेम कहाणी वाजवत होता. लोकसंगीतातल्या वाद्याचा च्यामारी केवढा इन्सर्ट !
घंटाघर । जोधपूर । फोटो : शोधण्यातली खाडाखोड |
काल सकासकाळी पुन्हा घंटाघर गाठलं. दोन्ही ढोपरांना पोटाशी धरून इकबाल चाचा खुर्चीत तंद्रीत बसला होता. सरदार मार्केटचा भरगच्च कोलाहल आणि कबुतरांची अफरातफरी वारंवार. ही एक वेगळीच मजा. आवाजाच्या गुंतागुंतीची. अचूक हेरता येईल अशी प्रत्येकाची सुसूत्रता.
1910 मध्ये राजा सरदार सिंह यांच्या शासनकाळात सरदार मार्केटच्या परिसरात घंटाघर बांधलं गेलं. साधारणतः 100 फूट उंच असलेल्या या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर लंडनमधील लुंड अँड ब्लोकली कंपनीने तयार केलेलं तीन लाखांचं घड्याळ बसवलं. घड्याळ फक्त लाखाचंच होतं. उर्वरित दोन लाख घड्याळ बसवण्यासाठी आणि या घड्याळाची दुसरी प्रतिकृती न बनवण्याच्या करारासाठी मोजले गेले.
चावीवर चालणारं हे भारतातील एकमेव घड्याळ आहे बहुतेक. दर गुरुवारी घड्याळाला चावी दिली जाते. 1911 साली बनवलेल्या चावीचं वजन 10 किलो आहे. इकबाल चाचांचा चावी धरलेला फोटो काढलाय. ही बडबड यासाठी केली कारण या वास्तूच्या स्थापनेपासून इकबाल चाचांचा परिवार या घड्याळाची देखभाल करतो. अक्ख्या जोधपूरमध्ये हे घड्याळ दुरुस्त करणारे मुहंमद इकबाल एकमेव व्यक्ती आहेत. वडिलांच्या निधनानंतर 2009 पासून ते आणि त्यांचा मुलगा शकील हे काम पाहतो.
लंडनमधील लुंड अँड ब्लोकली कंपनीने तयार केलेलं तीन लाखांचं घड्याळ । फोटो : शोधण्यातली खाडाखोड |
त्यांना शोधत पुन्हा आलो म्हणून त्यांनी विनातिकीट घंटाघर कसं चालतं हे समजावून सांगितलं. गुंतागुंतीचे पार्ट्स दाखवले. मी जे काम करतो याचं कौतुक तुम्हा बाहेरून आलेल्यांनाच जास्त वाटतं. इथं कुणाला त्याची फारशी कदर नाही. कामाचं महत्त्व आणि त्याला दिला जाणारा सन्मान इथं नाही. इथला नगर निगमचा चपराशी महिना पन्नास हजार घेतो आणि माझा पगार ऑगस्टपासून आलेला नाही. सरकार चेंज हो गयी हैं देखते है क्या होताय!
दहा किलो वजनाची घड्याळाची चावी आणि इक्बाल चाचा । फोटो : शोधण्यातली खाडाखोड |
पायऱ्या उतरताना इकबाल चाचा सांगत सुटला. वय झालंय. धाप लागते. तरी बोलणं सुरु होतं. तक्रार वगैरे कसं म्हणावं या बोलण्याला. वेगळं काम करणाऱ्या आणि वेगळं काही करू पाहणाऱ्या लोकांची कुठल्याही काळात साधारणतः अशीच अवस्था असते बहुतेक. मग विदेशी लोकांबरोबरच किस्से, त्यांचं प्रत्येक गोष्ट बारकाईने जाणून घेण्याचं कुतूहल वगैरे सांगत सुटले.
आठवणी काही विस्मरणात जात नाहीत तरी फोटो काढला त्यांच्यासोबत.
च्याय प्यायची त्यांच्यासोबत हे एक राहिलंच!
***
कबीर यात्रेचा एक मुक्काम बिकानेर जिल्ह्यातल्या कक्कू या गावात होता. कक्कू हे गाव सूत कातणाऱ्या 'कटवारी' समुदायाच्या रहिवासासाठी ओळखलं जातं. मारवाडी भाषेत सूत कातणे याला कताई म्हणतात. साधारणतः पाचशेहून अधिक कटवारी विणकर महिलांचा समुदाय कक्कू गावात राहतो. असं तिथला फॅक्टरी इन्चार्ज म्हणाला. एन.के.चौधरी यांनी 1978 साली स्थापन केलेली 'जयपूर रग्ज' ही गालिचा तयार करणारी कंपनी बिकानेर जिल्ह्यातील जवळपास तीनहजारहून अधिक महिलांना रोजगार देते. कापसाच्या प्राथमिक अवस्थेपासून त्याला लोखंडी ब्रशने घासून धागायोग्य सूत बनवण्यात आणि पुढे त्याचे गालिचे तयार होण्यात या महिलांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.
बिकानेर जिल्ल्यातल्या कक्कू गावातील 'कतवारी' महिला । फोटो : शोधण्यातली खाडाखोड |
जयपूर रग्जद्वारे या महिलांना सर्व सामग्री पुरवली जातेच शिवाय त्यांना सूत काताईचं प्रशिक्षणही दिलं जातं. शेतीचा कालखंड वगळता या महिला घरात किंवा अंगणात धागा तयार करतात. एक किलो धाग्याच्या वजनावर त्यांना प्रतिदिन शंभर रुपये आणि कंपनीतर्फे अधिकचे तीस रुपये असे एकूण 130 रु. मिळतात. अंगमेहनतीच्या तुलनेत हे पैसे फारच कमी आहेत असं इन्चार्जला विचारलं तर तो म्हणाला, घरच्या कामातून वेळ काढून, शेती करून या महिला हे काम करतात. आपापल्या क्षमतेनुसार त्या धागा विणतात. त्यामुळं साधारणतः प्रतिदिन दोनअडीच किलो प्रत्येक महिला धागा तयार करते. घरी मुलगी असेल तर तीही त्यांना मदत करते. पुरुष हे काम करत नाहीत का ? असं विचारल्यावर तो म्हणाला हे काम खास महिलांसाठीच आहे. पुरुष मंडळींना शेजमजुरी, ट्रक ड्राइविंग, किंवा फॅक्टरीत धाग्याला रंग देण्याची कामं आहेत. ज्यात मोबदला अधिक आहे. त्यामुळं पुरुष कताईच्या कामात नाहीत.
फोटो : शोधण्यातली खाडाखोड |
हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या गालिचांचे आकर्षक डिझाइन्स आणि त्यांच्या लाखोंच्या घरातल्या किंमती पाहता यांना या कामाचे अधिक पैसे मिळायला हवेत असं वाटलं. कडाक्याच्या उन्हात झरझर या बायांचे हात चालतात. हातांची हालचाल पाहून असं वाटतं एका मध्यम लयीतला राग सुरूय नि त्यांचे डोळे एकाग्र आहेत चरख्यावर. त्यांच्या हातांची पळापळ पाहिली तेव्हा लक्षात आलं सूत काततानाही यांच्या चेहऱ्यावर घुंगट आहे. मला त्यांचे डोळे पाहायचे होते. त्यांची लवलव पाहायची होती.
फोटो : शोधण्यातली खाडाखोड |
त्यांना हसताना पाहिलं तेव्हा उन्हाचे प्रहर मंदावले होते. एकाएकी केवढा गारवा पसरला हवेत.
किती किती भरगच्चं आठवणी सोबत घेऊन निघालो या फोटोंसोबत.
***
वेगवेगळ्या प्रहरांत शहरांच्या हालचालीत कमालीची विविधता दिसते. व्याकुळ क्षणांच्या पाठमोऱ्या सावल्या अस्पष्टशा धूसर होतात आणि तांबूस रंग ओतणाऱ्या संध्याकाळी दगडी कोरीव महिरपी खिडक्यांच्या चिंचोळ्या फटींतून डोकावतात. किती हालचाली किती रंगांचे आविष्कार क्षणात दिशाभूल करणारे, किती आवाज आणि आवाजांच्या खाणाखुणा तपासणारे नाकभरून वाहणारे विविध गंध.
फोटो : शोधण्यातली खाडाखोड |
एका कमानीतून बाहेर पडताना कोपऱ्यातल्या चाव्यांच्या अत्यंत मळकट दुकानापाशी रेंगाळलो. त्या काळ्या कुळकुळीत लगडलेल्या चाव्यांच्या दुकानात पांढऱ्या सदऱ्यात बसलेला म्हातारा उठून दिसला. दुकानाच्याच वयाचा असेल. फोटोसाठी पुढं सरसावलो तर इलेक्ट्रिक शॉक लागल्यासारखं हलला नि पेपराची घडी मोडून म्हणाला, काढू नकोस. त्याच्या चेहऱ्याचा रंग आणि चाव्यांचा जुडगा असाच एकस्थायी झाला. चिंचोळ्या गल्लीतून मान वर करत कोरीव कामाचं कुतूहल डोळ्यात साठवत पार पुढं नवचौकिया परिसरात आलो. कित्येक पिढ्यांच्या हालचाली साठवलेल्या या घरांच्या देखण्या खिडक्यांवर सांजवत आलेल्या उन्हाची एक रेखीव छाप पडलेली दिसते आणि लक्षात येतं या प्रहराचं ऊन वेगळं आहे. शांतता आणि भेदकता पूरक आहे एकमेकांत.
फोटो : शोधण्यातली खाडाखोड |
निळ्या रंगाची कैक आवर्तनं उजळून निघतात त्यात. संध्याकाळ हळूहळू विरळ होत जाताना एका तंबाखूच्या दुकानात थांबलो. तंबाखूच्या पानांच्या जुड्या टांगलेल्या होत्या पण माजी नजर खिळली ती तराजूच्या सभोवती मांडलेल्या पितळेच्या जुनाट डब्यांवर. काय वय असेल डब्याचं विचारलं तर मालक उच्चारला शंभर! तंबाखूचा डब्बा शंभर वर्षांचा म्हणजे किती संध्याकाळींचं ऊन घेतलं असेल याने अंगावर. किती उघडझाप आणि किती पिढ्यांच्या हातांचा स्पर्श. इथला उजेड वेगळा आणि गंधही. अत्तर पारखताना कॉफीचा गंध ओढतो तसं इथं करून पाहायला हवं होतं. वेगळाच सुगंध आला असता. वासही असतोच चांगला. रंगगंध किती प्रहरांना हुलकावणी देतो नाही ! संध्याकाळ किती वेगळेपण कोरते.
***
फोटो : शोधण्यातली खाडाखोड |
No comments:
Post a Comment