आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात अढळ स्थान असणाऱ्या कवी नारायण गंगाराम सुर्वे ( १५ ऑक्टोबर १९२६ - १६ ऑगस्ट २०१०) यांचं जन्मशताब्दी वर्ष १५ ऑक्टोबर २०२५ पासून झालं. पॉप्युलर प्रकाशनाच्या ‘प्रिय रसिक’ या मासिकासाठी सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने लिहिलेलं हे टिपण :
***
ऐसा गा मी ब्रह्म (१९६२), माझे विद्यापीठ (१९६६), जाहीरनामा (१९७५) आणि नव्या माणसाचे आगमन (१९९५) असे केवळ चार छोटेखानी काव्यसंग्रह. साधारणतः चाळीस-पंचेचाळीस वर्षांची वाङ्मयीन कारकीर्द. आणि १४५ च्या आसपास एकूण कविता. एवढ्या ऐवजावर आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात अढळ स्थान असणाऱ्या कवी नारायण गंगाराम सुर्वे ( १५ ऑक्टोबर १९२६ - १६ ऑगस्ट २०१०) यांचं जन्मशताब्दी वर्ष १५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. 'मी जन्मलो तेव्हा काही नाम धारण करून जन्मलो नाही. मात्र मी नसेन तेव्हा ह्या पृथ्वीच्या पाठीवर एक नाव ठेवून जाईन.' स्वतःच्या जडणघडणीसंदर्भात सुर्वे यांचे वरील उदगार आहेत. सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आरंभ होत असताना या उद्गाराची प्रस्तुतता महत्त्वाची वाटते. भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अशा दोन्ही निर्णायक चळवळींच्या सानिध्यात सुर्वे यांची जडणघडण झालेली आहे. अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमरशेख यांच्या बुलंद आवाजाचा आणि परिवर्तनशील लेखणीचा आधार त्यांच्या पाठीशी होता. बालमजूर म्हणून गिरणीत केलेलं काम आणि त्यातून कामगार चळवळीशी जुळलेली नाळ ही पार्श्र्वभूमी लक्षात घेतली तर नारायण सुर्वे यांचा जीवनसंघर्ष आणि त्यातून प्रसवलेली अनुभवनिष्ठ कविता हे आधुनिक मराठी कवितेचं निर्णायक पाऊल ठरते.
![]() |
| नारायण सुर्वे यांचे कवितासंग्रह. प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन,मुंबई. |
असा अत्यंत प्रामाणिक आणि अनुभवलक्ष्यी सूर सुर्वे यांच्या कवितेचा आहे. जीवन आणि कविता यात अधीकचे अंतर नाही. जे जगण्यात आहे अगदी तसेच कुठल्याही आडपडद्यांशिवायचे मोकळे जग या कवितेत आहे. सर्वसामान्य माणसांच्या रोजच्या जगण्यातले कितीतरी संदर्भ, घटना, भाषेचा खळाळता नाद या कवितेत अवतरतो. हर तऱ्हेची माणसं, त्यांच्या बहुविध मिती, बेवारस मुले, कणखर स्त्रियांच्या स्वभावखुणा, जातीधर्माच्या पल्याडचे करुणेने भरलेले जग आणि कामगार आणि कामगारवर्गाच्या अधःपतनाचे कैक संदर्भ नारायण सुर्वे यांच्या कवितेत यांत्रिकपणा टाळून अवतरतात.
'मजूर हा शब्द मी कटाक्षाने टाळतो. असे शब्द टाळताना माझी राजकीय व सामाजिक भूमिकाही असते. त्याऐवजी मी माझ्याच लोकांच्या बोलीभाषेतले शब्द उचलतो. ते अधिक सामर्थ्यवान वाटतात. सामान्य लोकांची भाषा हीच खरी कवितेची भाषा.'
जाहीरनामा या संग्रहासाठी लिहिलेल्या 'कविता आणि मी' या लेखातील वरील ओळी सुर्वे कविता या घटकावर किती बारकाईने आणि गांभीर्याने विचार करीत होते याची प्रचिती येते. केवळ लोकभाषेतले शब्दच नाहीत तर लोकभाषेत नांदणाऱ्या माणसांना कवितेचा विषय करणे हेही सुर्वे यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक कविता पाहिल्यावर लक्षात येते.
भूमिनिष्ठ लेखकाच्या जाणिवा तळागाळातील लोकव्यवहाराशी किती एकरूप आणि घनिष्ट असतात याचे निखळ उदाहरण सुर्वे यांच्या काव्यसंग्रहांत सापडते. या सहसंबंधांची घट्ट वीण आणि त्या जीवनव्यवहारांकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती यांची अजोड अशी बांधणी या कवितांमधून आविष्कृत होते. केवळ गिरणी कामगार वर्ग किंवा श्रमिकांच्या जगण्यातल्या व्याकुळतेचाच नव्हे तर सर्वहारा वर्गाच्या स्थित्यंतराचा चिंतनशील आढावाही ही कविता घेते. सुर्वे यांच्या जगण्या-लिहिण्यात असलेली साम्यवादी जाणीव कवितेच्या निर्मितीचे कारण आहे. कवी आणि मार्क्सवादी चळवळीचा कार्यकर्ता ही सुर्वे यांची ओळख त्या अनुषंगाने पूरक आणि तत्वनिष्ठ अशी आहे. सुखदुःखांची अनेक करूण आणि शाश्वत अशी रेखाचित्रे सुर्वे यांच्या कवितेत उमटतात. म्हणूनच या समूहचित्रांचे बहुपदरी कोलाज सुर्वे यांच्या कवितेत एखाद्या अढळपदासारखे उपस्थित असतात.
आफ्रिकी चाचा चिडे, थुंके, म्हणे; "काम नही करेगा."
चिलमीवर काडी पेटवीत मी विचारी, "चाचा, पेट कैसा भरेगा ?"
किंवा
आलं आलं वरीस जमीन नांगरून
उभं पीक नाचे फुलून
पर एक मेला सावकार ठोला
हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा
असं उपाशी राहून ग आम्ही मरावं किती
डोंगरी शेत माझं ग मी बेनू किती
आलं वरीस राबून मी मरावं किती
अशाप्रकारची संवादी आणि लोकव्यवहारातील भाषा सुर्वे यांच्या कवितेत मुक्तपणे बागडते. ती मुक्त आहेच, परंतु तुकारामाच्या अभंगांसारखी जनमाणसांत मुखोद्गतही आहे. कष्टकरी वर्गाचे शोषण, त्यामागची भांडवली मानसिकता, जगण्याचा अविरत चिवटपणा आणि त्यामागील साम्यवादी विचारदृष्टी सुर्वे यांच्या दर संग्रहागणिक चिकित्सेचे टप्पे गाठताना दिसते. मार्क्सवाद-लेनिनवाद ह्या विचारदृष्टीसोबतच सर्वहारा, कामगारवर्गाच्या जगण्याचे अनेक चिरंतन संदर्भ अधिक गडद होत गेलेले या कवितेत दिसतात. माणसांसोबतच त्याच्या भवंतालातल्या असंख्य दुर्लक्षित घटकांचा समावेश या कवितेत स्वाभाविकरीत्या असतो. शोषित-वंचित समूहातले अव्यक्त आवाज या कवितेत लक्षणीयरीत्या मुखर होतात. उदा. म्हणून 'शिगवाला' या कवितेतल्या खालील ओळी पाहता येतील. एका साध्या अनुभवाला कवितेचा रचनाबंध देऊन सुर्वे इथे विलक्षण संवादी लय जुळवून आणतात. अशीच संवादी लय 'मुंबई' आणि 'गिरणीची लावणी' या कवितांमध्ये आढळते. सुर्वे यांची लोककलाप्रकारावर असलेली नितांत श्रद्धा आणि आत्मीयता या रचनांमधून आविष्कृत झालेली दिसते.
![]() |
नारायण सुर्वे यांच्या समग्र कविता प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन |
देख ये मेरा पाय
साक्षीको तेरी आई काशीबाय
'मी खाटीक आहे बेटा - मगर
गाभणवाली गाय कभी नही काटते''
आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात सर्वसामान्य लोकांच्या जगण्यात इतक्या बेमालूमपणे मिसळलेली कविता इतरत्र क्वचित दिसते. सुर्वे यांच्या अत्यल्प कवितेने हे साधले आहे.
सुर्वे याच्या कवितेचे मूल्यभान हे इथल्या कष्टकरी जनतेच्या जगण्याशी एकरूप झालेले दिसते. समूहभावना आणि तिच्याशी असलेली बांधिलकी या कवितेच्या रचनेशी दिसते. शहराचे, कामगारांचे आणि पर्यायाने कामगारवर्गाचे जे चित्र ही कविता रेखाटते त्याच्याशी सुर्वे यांची मानवतावादी दृष्टी एकरूप झालेली दिसते.
कधी विचार असे येतात
जसे थकून यावेत तिसऱ्या पाळीचे कामगार घरात
अशाप्रकारचा करुणाभाव या निर्मितीशी असलेला जाणवतो. आणि
स्वतःलाच शोधण्यात अर्धी उमर हरवून गेलो
स्वतःकडून लाखदा वळलो; तरीही आढळलो नाही
याप्रकारची एक अगम्य तटस्थताही दिसते. सुर्वे यांच्या कवितेत ही दोन्ही टोकं एकप्रकारे स्वतःची समजूत घालावी अशाप्रकारचा विचारवाद बाळगतात. कदाचित म्हणूनच 'एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे.' असा निर्मळ कबुलीजबाबही या कवितेत दिसतो. सुर्वे यांच्या बहुतांश कवितांमध्ये आढळणारा आत्मकथनात्मक आशय हा या कवितेत एकप्रकारची सर्वव्यापी जाणीव विस्तारत नेतो. एक व्यापक आत्मकथनात्मक अवकाश या निर्मितीने व्यापलेला आहे. 'पुढच्या युगांची सर्वच दुःखे मीही भोगीन म्हणतो' असा स्पष्ट जाहीरनामाच घेऊन ती उभी आहे.
सुर्वे यांच्या कवितेत आढळणारी समन्वयवादी मानवी दृष्टी शोषणमुक्त समाजाचे पसायदान मागते. खंगलेल्या, पिचलेल्या आणि जगणं विसरलेल्या अनेक माणसांचा ती आवाज बनते. मात्र ती आवाजी बनत नाही.
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
असा संयम आणि समंजसपणा या कवितेत आहे. या संयमातून आणि समंजसपणातून एक निष्णात लढाऊपणाचा स्वर या कवितेत मिसळलेला आहे.
कामगार आहे मी तळपती तलवार आहे
सारस्वतांनो ! थोडासा गुन्हा घडणार आहे.
ही स्पष्टता या लढाऊपणाच्या स्वरात आहे. आणि हा स्वर श्रमिकांच्या लढ्याचे प्रतीक आहे. नारायण सुर्वे यांची कविता केवळ तो मार्ग चोखाळत नाही तर त्या मार्गाशी एकनिष्ठही राहते. कलात्मकता आणि कला व जीवन यांच्या गुंत्यातून सुटून आशय आणि भाषाभान जपत ती प्रवाही होते. हे अत्यंत महत्त्वाचं कार्य नारायण सुर्वे यांच्या अत्यल्प कवितेने केलेलं आहे. नारायण सुर्वे ह्या पृथ्वीच्या पाठीवर खरोखरंच एक खणखणीत नाव ठेवून गेलेले आहेत.
***






















