२०२५ सालचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार लोकवाङ्मय गृह प्रकाशित 'खोल खोल दुष्काळ डोळे' या माझ्या पहिल्या कादंबरीला जाहीर झाला. २ एप्रिल २०२६ रोजी दिल्ली येथे या पुरस्काराचा वितरण समारंभ पार पडला. मराठी भाषेसह एकूण २३ भाषांमधील साहित्यिकांना या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना केलेलं हे भाषण...
***
![]() |
| साहित्य अकादमीचे अध्यक्ष मा. माधव कौशिक यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना |
सन्माननीय व्यासपीठ, साहित्य अकादमीचे अध्यक्ष आदरणीय माधव कौशिक आणि उपस्थित मित्र मैत्रिणींनो,
शिक्षण किंवा नोकरीसाठी एखाद्या शहराची निवड करणं काय असतं हे न कळायच्या वयात मी शहरात पाऊल ठेवलं होतं. अमुक एका गोष्टीनंतर ही गोष्ट करायची, टप्पे किंवा वर्गीकरण करून वाट चोखाळायची अशी कुठलीही सोय नव्हती. सोय म्हणण्यापेक्षा पर्याय नव्हता आणि परिस्थितीही. मी गाव सोडलं ते शिक्षणासाठी. मुंबईत आलो. कारण नातेवाईक होते तिथे आधीपासनं. कुणाचातरी आधार असेल सोबतीला या उद्देशाने. आणि मोठा भाऊ फिल्म प्रोडक्शन हाऊसमध्ये काहीतरी धडपड करायचा. इथं येऊन शिकायचं तर होतंच शिवाय पैसेही कमवायचे होते. मुंबईत ते जुळून आलं. सुरुवातीच्या इयत्ता शिक्षणाचा खर्च उचलण्यात गेल्या. गाव सोडल्यामुळं हे शक्य झालं. मुंबई गवसली. जिनं पुढं स्वप्न पाहायला शिकवलं. शिक्षण सुरु झालं आणि चार पैसे कमावण्याची अक्कल आली.
बालपणातलं जगणं विसरून सगळं पटापट शिकून कुटुंबाला मदत होईल असं काहीतरी करावं याच्या धडपडीतले दिवस मागे लागले. नव्या शहरात पाऊल ठेवताना आपण अंतर्बाह्य बदलून जातो. शहराचा जगण्याचा वेग इतका असतो कि काहीही करून आपल्याला धावण्याच्या शर्यतीतील ती रेष ओलांडायची असते. इथं कुणी नंबरात येण्यासाठी पळत नाहीय हा बोध पहिल्यांदा या शहरात झाला. सगळे आपापल्या मर्जीचे मालक नाहीत. हे पळणं स्वतःसाठी नाही तर इतर कुणासाठीतरी आहे हे जाणवलं. आपणही एकप्रकारे पळून आलेलो आहोत या शहरात. कुणाच्या संमतीनं असलं तरी हे पळणंच आहे एकप्रकारे. वयाच्या अमुक टप्प्यावरचा हा बोध होता. हे दिवस असे होते. एकाकीच म्हणू शकतो. हेच दिवस पुढं कामी येतात. वाया काहीच जात नाही.
स्वतः लिहून पाहावं असं साधारणतः बीएच्या पहिल्या वर्षात जाणवू लागलं. ठोस असं नाही पण धूसर किंवा पुसटसं म्हणू शकतो. या वाटण्याला किंवा जाणवण्याला आधार बीएचा अभ्यासक्रम होता. त्याआधीचं सगळं शिक्षण हे केवळ पुस्तकीच होतं. ज्याचं अंतिम ध्येय मार्क्स मिळवणं आणि पुढच्या इयत्ता गाठणं एवढंच होतं. बीएला गेल्यानंतर ही चौकट तुटली आणि विस्तारत गेली. कविता, नाटक, ललितलेख, कथा, कादंबरी अशा साहित्यप्रकारांची ओळख झाली. त्यात वाचणं सुरु झालं. मी आठवीपासून रात्रशाळेत आणि रात्र महाविद्यालयात शिकलो त्यामुळं शिक्षकही भले मिळाले. ज्यांना शिकवण्यात रुची होती. कष्टकरी वर्गातून येणाऱ्या आणि दिवसा काम करून रात्री शिकणाऱ्या मुलांप्रती आत्मीयता होती. शिकवणंही संवादी असायचं. हे वातावरण पोषक म्हणावं असं होतं. बीएला अभ्यासक्रमात असणारी पुस्तकं अभ्यासताना वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील पुस्तकं समोर आली. त्यातून निरनिराळे लेखक गवसले. असं वाचन वाढत गेलं. वाचलेलं जे होतं त्यात सर्वसामान्यांचं, तळागाळातील लोकांचं जगणं होतं. जे आपलं वाटावं असं होतं. त्या लिखाणाशी सहज कनेक्ट होता यायचं. लेखक वाचकाचा हात पकडून शेवटच्या पानापर्यंत घेऊन जातोय अशी लय आणि उत्कटता त्यात होती. आमच्यावेळी प्राध्यापक मंडळी निदान अभ्यासाला लावलेली साहित्यकृती वाचत. त्यामुळे त्यांना बरोब्बर शिकवता यायचं. हे पद्धतशीर झाल्यामुळं आपणही असलं काहीतरी खरडू शकतो असं वाटायला लागलं. सुरुवात अर्थात कवितेपासूनच झाली. मग वर्गात वाचणं व्हायचं. इतर कुणी लिहिलं तर ग्रंथालयात चर्चा व्हायच्या. कवितेचं शीर्षक हीच खरी कविता इथपर्यंत मामला जायचा. तर सुरुवात म्हणाल तर खाडाखोड करण्याचेच दिवस होते. कवितेशिवाय दुसरं काही बीए होईस्तोवर तरी लिहीत नव्हतो. ते कॉलेजच्या मॅगझिनपुरतं मर्यादित होतं.
इतर कुठल्याही साहित्यप्रकारापेक्षा कादंबरी हा घटक तुमच्याकडून अधिकचं काहीतरी मागत असतो. हे जे अधिकचे 'काहीतरी' असते त्याचाच विस्तारशील शोध कादंबरीत असतो. सांगण्याच्या तऱ्हा त्या प्रकाराला समृद्ध करतातच शिवाय कथनाच्या अद्भुत शक्यताही मुक्तपणे हाताळता येतात. कादंबरी संयमाची मागणी करते. मला हा संयम फार महत्त्वाचा वाटतो.
![]() |
| मुखपृष्ठ : अन्वर हुसेन. |
परिस्थिती वाईट असते असं आपण बऱ्याचदा म्हणतो. मला स्वतःला त्यात फारसं तथ्य दिसत नाही. ओढवलेल्या परिस्थितीवर मातही करता येते एवढं स्वीकारणं मला महत्त्वाचं वाटत आलेलं आहे कायम. परिस्थिती हताशपणा आणते. पण यातून तावून सुलाखून बाहेर पडण्याचा मार्गही दुसऱ्या बाजूला उघडते. नेमकं काय करायचंय आपल्याला हे सतत स्वतःला आपण विचारत राहिलं कि त्यातले खाचखळगे कळतात. काही आडवाटा सापडतात. चिक्कार माणसं अशी असतात जी मदतीला येतात. देवासारखा उभा राहिलास असं आपण बऱ्याचदा ऐकतो. तर अशी माणसं असतात आपल्या आजूबाजूला. कमी वयात समजुतीपलीकडचं सगळं ओढावल्यामुळं कदाचित मला स्वतः उभं राहायला हवं याची जाणीव झाली. आपल्यालाच हातपाय हलवावे लागणार आहेत ये एकदा ठासून स्वतःला सांगितलं आणि आमलात आणलं तर यातून सुटका होते. अडकून पडायचं नाही हे या जगण्यानं मला शिकवलं.
इतर घटकांप्रमाणेच माणूस हा समाजात वावरणारा घटक आहे. ती एक व्यवस्था आहे. या व्यवस्थेत काही परंपरागत गोष्टी नांदत असतात. चांगल्या-वाईट याबाबतची त्याबद्दल आपली काही मतं असतात. संविधानिक अधिकार म्हणून आपण वेळोवेळी त्यावर आक्षेप नोंदवत असतो, असहमती दर्शवत असतो. हे सगळं असलं तरी व्यक्ती म्हणून आपली स्वतंत्र ओळख असते. ती स्वतंत्र ओळख मला महत्त्वाची वाटते. ही ओळख सामाजिक पर्यावरणात घडत असते. त्या ओळखीचा म्हणून एक स्वतंत्र विचार असतो. त्यावरचं चिंतन असतं. त्याला इतिहास असतो. आणि त्या इतिहासाची चिकीत्साही असते. हे लक्षात घेतलं तर या पार्श्वभूमीचा आधार कोणत्याही कलाकृतीत कमीअधिक प्रमाणात अनुभव म्हणून आविष्कृत होत असतो. त्यामुळं समाजभान असणं ही एका अर्थाने निकडच ठरते. अनुभव आणि कल्पित यांच्या संयोगातून एक जग कथात्म साहित्यातून आपल्यासमोर रेखाटलं जातं. समाजभान नसेल तर ती केवळ हातचलाखी ठरू शकेल. जिवंत अनुभव उभा करणं हातचलाखीने शक्य होत नाही. त्यासाठी अनुभव लागतो. त्या अनुभवाला भिडण्याची वृत्ती लागते. निरीक्षणाने बारकावे पकडले जातात. हा एकप्रकारे लेखकाचा रियाजच असतो. तो सगळीकडे कामी येईल असं नाही, पण तो कुठेनाकुठेतरी पेरता येतो. वाचनातून, चिंतनातून या सगळ्याला एक निश्चित आकार मिळतो. फिक्शन लिहिण्यासाठी मला तरी याची गरज भासते. आपल्या मागे लोकांनी बरं-वाईट काय काम करून ठेवलंय ते एकदा नजरेखालून घालणं मला गरजेचं वाटतं.
लिहिलेलं वाचलं जाणं एवढंच मला महत्त्वाचं वाटतं. बाकी सगळी प्रलोभनं उरतात. वाचकांनी माझ्या पहिल्याच कादंबरीला खूप प्रेम दिलं. त्यांच्या गहिवरून टाकणाऱ्या आठवणी आहेत सोबत. वाचलं जाण्यातून वाचक आपल्या लिखाणाशी जोडला जातो. त्याला कादंबरीतलं जग, पात्र स्वतःशी पडताळून पाहावीशी वाटतात. त्यांच्या वागणुकीबद्दल अनेक प्रश्न तयार होतात. हे वाचक जेव्हा भरभरून कळवतात तेव्हा पुरस्कारापेक्षा कैक पटीने जास्त आनंद होतो. पुरस्कार ही क्षणिक गोष्ट आहे. मी त्याकडे जबाबदारी म्हणून पाहतो. पुढं लिहितं ठेवण्यासाठी शुभेच्छा म्हणूया हवंतर. अर्थात त्याचाही निराळा आनंद असतोच. महाराष्ट्र शासनाचा स्व यशवंतराव चव्हाण आणि केंद्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार असे दोन मोठे आणि महत्त्वाचे पुरस्कार माझ्या पहिल्याच कादंबरीला मिळाले. मला या जबाबदारीचं गांभीर्य आहे.
आपली मुळं जिथून उखडली गेलेली असतात त्या जागेचं, स्थळाचं नेहमीच मला आकर्षण वाटत आलेलं आहे. त्या केवळ जागा नसतात. आपल्या वाढीच्या साक्षीदार असतात. अशा जागांचा मला मोह आहे. गाव हे मला तसं कधीच प्रिय वाटलेलं नाही. पण या आठवणी, जागा, उनाड दिवस आणि ती कणखर उन्हं मला अजूनही बिलगून आहेत. उर्वरित दुखऱ्या आठवणींशिवाय माझ्याकडे काही नाही. गावांकडे असलेला सरंजामी माज मला खटकतो. एकता, बंधुभाव आपण किती सहज बोलतो पण प्रत्यक्ष गावात सगळी माणसं एकमेकांच्या उरावर बसायला उतावीळ झालेली मी पाहिलेली आहे. माझा गावाशी असलेला संबंध अल्प असला तरी मी सत्यापासून पळ काढू शकत नाही.
लिहायला गाव आणि शहर यापैकी काहीही नसलं तरी चिक्कार माणसं उरतात. पडीक जमीन असते. निष्पर्ण झाड असतं. आपण स्वतः असतो आणि स्वतःच्या आत्महत्येचे एक स्वप्नही उरतं लिखाणासाठी. मला वाटतं एवढं पुरेसं आहे!
श्री चक्रधरांपासून ते संतश्रेष्ठ तुकाराम असा मराठी भाषेचा समृद्ध वारसा माझ्यापर्यंत झिरपत आलेला आहे. आजचा सन्मान हा मी माझ्या मातृभाषेचा सन्मान समजतो. तिनंच मला इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे.
पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. प्रेम. अतोनात धन्यवाद !
~ प्रदीप कोकरे
---



