Saturday, April 18, 2026

मुक्तकैवल्य सुदिवसें

यावेळेसच्या कोची बिनालेत सर्वाधिक आवडलं ते स्टुडंट बिनालेतलं काम. मांडणीत अधिक स्पष्टता आणि त्यामागचा केंद्रस्थानी असलेला विचारही नेमका. कामात, त्या मांडणीत नवखेपणा अजिबात नाही. आकलनाचे अनेक कोन गवसतात. चित्र, शिल्प, मिक्स मीडियातील इंस्टॉलेशन्स यात त्या आकलनाच्या नव्या शक्यता शोधण्यासाठी काहीएक वेळ, थांबा घेऊन त्याकडे पाहण्याची मोकळीक आणि त्यात गुंतवून ठेवणारी रचना असं सगळंच एखाद अपवाद सोडला तर ती मुलांच्या कामात दिसून आली. मांडणीसाठी त्यांना मिळालेल्या जागांच्या मोहात अडकायला होतं खूप वेळ.

मसाल्यांचा गंध भिंतीत शिरलेला आणि किंचित गार वारा अधेमधे. मडक्यातलं पाणी आणि रहदारीवरील माणसांच्या संभाषणातील कैक भाषिक वळणं. चर्चच्या कोपऱ्यावर गजरा विणणारी बाई आणि कढईत सोडलेल्या पाळंमपोरीचा पिवळसर रंग. टमटममधून येसूदास ऐकू येतो. उन्हाची आर्त हाकच वाटते ती. एका चित्रापुढे थांबलो. रोजंदारीवर काम करणारी माणसं हा चित्राचा विषय. रेल्वे फलाटावर बूट पॉलिश करणाऱ्यांपासून हातगाडीवर काहीएक वस्तू विकणारी माणसं. सायकलवर गावोगाव भटकून हातात काही येतं का याच्या शोधात असलेली. शिलाई काम करणाऱ्या माणसाचा एक इवला ठेला दिसतो. हातात आयताकृती फळीत बांगड्यांच्या रंगबेरंगी ओळी एकाखालोखाल एक मांडून घरोघरी फिरणारा माणूस दिसतो. 


आवडलेलं काम. साच्याबाहेरचं. निराळं वाटावं असं.

पण हि केवळ चित्र नाहीत. चित्राच्या मागे त्या व्यक्तिव्यतिरिक्त काय काय चाललं आहे याचं दृश्यरूप दिसतं. त्या प्रहराचे अनेक आवाज ऐकू येतात. इतरांच्या हालचाली दिसतात. जणू आता तो इसम बोला काय देऊ असं विचारेल इतका जिवंतपणा त्यात चित्रकाराने ओतला आहे. कुठलेही आडपडदे नाहीत या चित्राकृतीला समजून घेण्यासाठी. सरळ आणि म्हणूनच अधिक जवळची वाटणारी ही रचना वाटते. स्थलांतरित मजूर आणि कामगारवर्गाच्या अनेक खाणाखुणा इतर इंस्टॉलेशन्समध्ये दिसतात. चित्राकृतीचा अन्वयार्थ अधिक थेटपणे पोहोचतोच शिवाय त्यामागे असलेली प्रगल्भ विचारी दृष्टीही दिसते. या विभागातील बहुतांश कामं ही कामगारवर्गाशी संबंधित आहेत.


डेथ सर्कल या चित्राचा भाग 

डेथ सर्कल नावाचं एक जबरदस्त इन्स्टॉलेशन आवडलं. संबंध खोली या इंस्टॉलेशनने व्यापलेली आहे. एक मुंग्यांची रांग एका ठिकाणाहून निघते आणि पुढे अमुक एका वळणावर अनेक मुंग्यांच्या वर्तुळात सामील होते. तिथून पुढचा प्रवास आणि पुन्हा एक नवं वर्तुळ. असं हे चक्र अव्याहतपणे सुरु राहणार असतं. खाली थोडी माती दिसते. प्रश्न आणि सूचकता असा पेच इथं दिसतो. आणखी एक आवडलेलं काम महिलांच्या फुरसतीच्या वेळेत रंगलेल्या गप्पांविषयीचं. आकारउकार नसलेल्या तोडक्यामोडक्या लादीच्या पृष्ठभागावर ही चित्र काढलेली आहेत. घराच्या दरवाजात खोळंबलेली बाई दिसते. बहुतेक ती कुणाचीतरी वाट पाहतेय. गप्पांची वेळ अजून बहुतेक झालेली नाही. ती ओढ तिच्या एकूण रेखाटनावरून दिसते. आपण अधिक कुतूहलाने खेचले जातो. दुसऱ्या चित्रात एक बाई अर्धवट उघड्या दरवाजातून डोकावते आहे. बहुतेक बाहेरून कुणीतरी तिच्याशी बोलत असावं. अशा अनेक बायका घराच्या दरवाजात बसलेल्या, कमरेवर हात घेऊन दुसरा हात दरवाजाला टेकलेल्या, हाताच्या तळव्यावर डोकं टेकवून घराबाहेरचं पाहणाऱ्या दिसतात. दोघींची संवादाची एक रूपरेषा या संबंध चित्रातून स्पष्ट होते. बोलणं किती महत्त्वाचं चाललेलं आहे याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आहेत. सावल्या आणि उन्हाची छटाही त्या संवादात सहभागी झालेली आहे. या गप्पांमध्ये आपल्यालाही सहभागी व्हावंसं वाटतं. हे बोलणं नेमकं कुणाबद्दल आहे यासाठी आपला कान तयार झालेला असतो.


स्मिथा एम. बाबू यांचं पाक्कलम् नावाची मालिका

स्मिथा एम. बाबू यांचं पाक्कलम् नावाची मालिका आवडली. नारळाच्या काथ्यापासून दोरनिर्मिती (कोयर) करणाऱ्या कामगारांच्या जीवनाच्या सूक्ष्म निरीक्षणांवर आधारलेली ही जलतरंग मालिका आहे. या चित्रांसोबत पारंपरिक पद्धतीने विणकाम करतानाचे सादरीकरण पाहायला मिळते. मल्ल्याळीत पाक्कलम् म्हणजे विणकामासाठी वापरला जाणारा शब्द. 

कोल्लममधील कोयर निर्मिती समुदायांचे संवेदनशील चित्रण या मालिकेत आहे. विणकामाची सांस्कृतिक परंपरा, त्यातले सामूहिक नाट्य आणि श्रम यांच्या अनेक छटा या मालिकेत दिसतात. रंगांचे अनेकपदरी थर आणि कामगारांची जिवंत ध्वनिसृष्टी इथे मोहवून टाकते. 


अर्थ अनेकपदरी असतात. आपल्याला उलगडलेला अर्थ इतरांहून भिन्नही असेल. मी माझ्यापुरते चित्रात काहीतरी शोधतो. आवडणं-नावडणं तसं ठराविक राहत नाही. मातीचा रंगही आवडण्याला पुरेसा असतो. कोचीतल्या असंख्य भन्नाट जागांवर अशी कामं बिनालेत पाहिली. काही जागा पुनःपुन्हा पहिल्या. काही वेगळा अर्थबोध होतो का हे पाहिलं. रंगांबद्दलचा विचार बारकाईने तपासला. काहीवेळा या चित्राला किंवा इंस्टॉलेशनला या इथे कशाला जागा दिलीय असंही वाटलं. उदा. एका भल्यामोठ्या खोलीत समुद्राच्या लाटेचं रेखाटन आढळतं. केवळ पांढरा रंग वापरून त्या लाकडी फारशीसदृश्य जागेवर लाटेची वळणं आहेत. एवढंच. मला तहानच लागली थेट. 


चौकटीबाहेरचं काम !

संध्याकाळी बिनुच्या हॉटेलात बाहेर च्याय पिताना प्रिन्सेस स्ट्रीटवरचे दोन जिगरी दोस्त पुट्टु आणि बीफ विंदालू खाताना भेटले. म्हणाले, आमच्या बापाने इथं दुकानं घेतली ती आम्ही आता फक्त चालवतोय. खरंच बिनालेत समजण्यासारखं काही असतं काय ? बाहेरून लोक येत असतात जसा तू आलास म्हणून विचारलं. मी काही बोललो नाही. मला काय समजलं हे मला खरंच सांगता यायचं नाही.

चित्र पाहताना आपणही त्यातला कण झालेलो असतो हि अनुभूती मला कायच्याकाय आवडते. त्यात बागडणं मला खुणावतं. कुणाच्या डोळ्यात पाहिल्यावर फक्त एकमेकांना पाहणं जसं उरत नाही तसं चित्रही एकांगी पाहणं होत नाही. आपल्यातलं काहीतरी मिसळतं त्यात. मला हा थरार हवा असतो. 

—-

आहाहाहा ! नाद !



सकाळी थोडा पाऊस येऊन गेलाय. त्यामुळं जरा गार वाटतंय. एरवी फार घाम येतो. जिथं उतरलोय ते 160 वर्ष जुनं घर आहे. त्याला हॉस्टेल मध्ये रूपांतरित केलंय मालकानं. सहज ऑनलाईन शोधताना सापडलं. केवळ राहायची जागा आवडली म्हणून जाणं केलं. बहुतेक हे असं तिसऱ्यांदा झालंय. शांततेचं वर्णन करता येणार नाही मला. गर्दी तशी कमीच. समुद्रही स्वच्छ आणि प्रशस्त. देखणी कौलारू घरं मात्र कुलूप घातलेली आढळली. दुपारचा किंचित डोळा लागतो पडल्यापडल्या. नगरकरांचं 'रावण आणि एडी' आणलंय सोबत. या घरात एवढे शांततेचे कोपरे आहेत कि प्रत्येक प्रकरणाला एक निवडता येईल. काळा चहा मिळतो पुरेपूर. झाडांची क्षणगुणगुण असते. कुमारांचं आमोणा रे ऐकलं असंच एक प्रकरण वाचून संपल्यावर. मग समुद्रावर जाऊन रेंगाळलो. दुसऱ्या दिवशी छोटी बोट बुक केली होती सहायेक जणांनी मिळून. 

भल्या सकाळी उठून जेट्टी गाठली. तिथून चाळीस मिनिटांवर कैयानकरी गाव आहे. तिथं आमचा ७१ वर्षांचा कॅप्टन वाट बघत होता. जेकब त्याचं नाव. घरी घेऊन गेला. पोटभर अप्पन आणि वाटाण्याची उसळ दिली. पुन्हा काळा चहा. बॅकवॉटरला लागून त्याचं कौलारू घर आहे. समोर टप्प्याटप्प्याला किंचित पायऱ्या असलेली एक जागा आहे. बायका तिथं कपडे धुतात. तो दगड अगदी गुळगुळीत आणि चमकदार दिसतो. त्यावर संपायच्या स्थितीत असलेला निळा साबण दिसतो. प्रत्येक ठिकाणावर हे असंच दृश्य. गुळगुळीत दगड आणि त्यावर संपायच्या अवस्थेतला आणि पातळ कडा असलेला निळा साबण. कपडे धुवून तो घरी आणलेला नाही कपड्यांसोबत. तो तिथंच ठेवलेला आहे. 


अलेप्पीतली संध्याकाळ 


पुढचे चार तास जेकबने गावातल्या अगदी निमुळत्या बोळांत आपली नाव फिरवत, मल्याळी गाणी गात प्रेमानं वारंवार सर सर मॅडम मॅडम म्हणत पुन्हा घरी आणलं. त्याच्या बायकोनं सुंदर जेवण करून ठेवलेलं. वाटलं आत्ता इथंच पडावं. गार वारा सुटलेला. दर अर्ध्या तासाला बोट असते इथून. जेकब जेट्टीपर्यंत सोडायला आला. आम्ही अक्षरशः मिठी मारली एकमेकांना. 

आत्ता पुन्हा कोचीला निघताना मालकानं मस्त मऊसूत इडली आणि जगात भारी सांबर पुढ्यात वाढलंय. इथं राहणाऱ्या बॅगपॅकर्सना नाश्ता मोफत देतो तो. 





जिथं राहिलो ते देखणं घर. डच स्क्वेअर !



ट्रेन थोडी लेट झालीय आणि थोडं मळभ दाटून आलंय. कुणास ठाऊक का पण टमटमवाल्याने माझ्याकडून ठरले होते त्यापेक्षा कमी पैसे घेतलेत. मी का म्हणून विचारलं तर तो फक्त हसला. डब्यात बसल्यावर हार्मोनियम वाजवत एक जोडपं आलं. गाणं कुठलसं हिंदी होतं. आठवत नाही. बायकोच्या हातात कसलंतरी मेडिकल सर्टिफिकेट होतं. मी वरच्या खिशात होते तेवढे पैसे टेकले. पेटीवर मात्र हात बसला होता त्याचा. टीसी मल्ल्याळीत काहीतरी म्हणाला. मी समजत नाही म्हणालो. तर म्हणाला तू मल्लू दिसतोस. पुन्हा हसणं. तासाभराचाच प्रवास होता. पेटीवाला गेल्यावर नेलकटर किचेन वगैरे विकणारा आला. खांदयावर मुलगी होती छोटी झोपलेली. पहिल्या सीटवर त्याने तिला ठेवलं. मग पूर्ण डब्यात हातातल्या बोटांत त्या माळा अडकवत फिरून तो पुन्हा तिच्यापाशी आला. असं हे प्रत्येक डब्यात होत असणार. छान वेण्या घातल्या होत्या तिच्या. कुणी घातल्या कुणासठाऊक. हातातल्या माळा त्याने पुढच्या डब्यात अडकवून तो तिला उचलून पुढं निघून गेला. 


प्रवास आणि अधलंमधलं वाचन 

ट्रेन काही वेळेत जायचं नाव घेत नाहीय. बाहेरच्या असंख्य हलत्या सावल्या डब्यात डोकावतायत. मी पुन्हा पुढचं प्रकरण उघडून बसलोय. पाऊस पडून गेल्यामुळं किंचित गारवा आहे. उरलेलं बिनाले बगायला नेमकी वेळ आहे. बघूया. 

……

संध्याकाळ किती निरनिराळे रंग दाखवते. हुलकावण्या देते. ज्ञानेश्वरीचा सोळावा अध्याय असाच प्रकाशमय आहे. अंधारमोह आहे. किती प्रतिमा आणि त्याकडे खेचले जाण्याच्या ढीग तऱ्हा. असण्यानसण्याची उलटतपासणी आणि गवसलेल्या काहीएक अनुभवाचं स्थित्यंतर.






तया चक्रवाकांचें मिथुन । सामरस्याचें समाधान ।

भोगवी जो चिद्‍गगन । भुवनदिवा ॥ 


एकटक पाहत राहिलं कि क्षणात रंगांची अफरातफरी होते. आवाजाचा पोत बदलतो. हवामानाची आर्द्रता बदलते. माउलींनी अल्पवयात अशा कित्येक प्रहारांची चाहूल काशीकाय डोळ्यात साठवली याचं भलं कौतुक वाटतं. नाद आणि लय यांची गाठ पडावी अशी सुसूत्रता. गढूळ पाणी निवळावं अशी नितळता आहे त्यात. असं कायकाय वाटत राहतं निरनिराळ्या शहरातील संध्याकाळ पाहिल्यावर. 


बिनूच्या कॅफेतला कोरा चहा 
दुपारी जरा सायकल राईड जास्त झाली त्यामुळं डोळा चांगला लागला. बिनुकडे कोरा चहा प्यायलो. इतक्यांदा गेलो पण नाव राहीलं विचारायचं. आज विचारलं. तिच्या जोडीला जी बाई असते तिचं नाव राहिलंच विचारायचं. भरलेला कप हातात ठेवला कि ती नुसतं हसते.

समुद्रालगत वर्दळीपासून किंचित दूर एक कठडा आहे. मी तिथं बसलो. नंतर काहीवेळाने आईमुलीची जोडी येऊन बसली. थोडावेळ शांतता होती. ढगांचे कळप स्थिर होते आणि पिवळसर छटा किंचित वाढली होती. पुन्हा तेच. रंग पकडावेत तर पुन्हा रंगांची अफरातफरी. पापण्यांची उघडझाप तेवढी विनाकारण वाढते. रंगगंध कोरून पुन्हा शांतता पसरली. मुलीच्या हातात बिअर असल्याचं लक्षात आलं. संवाद नव्हताच. पण न राहवून मी तिच्या आईला बोललो कि इथं प्यायला परवानगी नाहीय. कितीसा दंड आहे. आईनं पोरीला मला न समजणाऱ्या भाषेत बजावलं. ती उठून मागे कुठशी गेली कुणासठाऊक. आई बसून राहिली शेजारी. कुठूनशी पोर आली आणि व्हिडिओ कॉलवर बापाला संध्याकाळचे रंग दाखवू लागली फोनची हरतऱ्हेची वळणं घेऊन. तिची आई काहीतरी शोधत होती एकटक पाहत लाटांच्या घुसळणीकडे. पोरगीचा व्यत्यय नव्हता. मला तो जाणवू लागल्यावर मी उठलो. पुन्हा बिनुकडे कोरा चहा टाकला. पुन्हा हसणं. अंधाराच्या खुणा दाट होत गेल्या. 


एक देखणी संध्याकाळ, फोर्ट कोची 

---

बिनुकडे पुन्हा येऊन बसलोय आणि तिनं बीफ विंदालू वाढलंय.

यावर काहीही म्हणता येत नाहीय. 

ज्ञानेश्वरीत अशा अवस्थेचं वर्णन 'मुक्तकैवल्य सुदिवसें' असं आहे. 

……



कोची बिएनाले प्रदर्शनाचा अवकाश इतका मोठा कि एक ठिकाण बघायला जवळपास तीन-चार तासांची खोटी. चांगल्या अर्थानं खोटी. वाढत्या उन्हाने गॅलरीतून बाहेर पडवेना. म्हणून सविस्तर मोकळं पाहता आलं. सेल्फ्या घेणारे अगदी तुरळक. सारं गंभीर प्रवृत्तीतलं. एक चित्र आणि त्याला व्यापून मनात उमलणारी अर्थांची निरनिराळी आवर्तनं. त्यातली गोष्ट वेगळी. कथाबीज वेगळं. पाहणाऱ्याच्या नजरेतून आणि त्या प्रतिमा डोळ्यासमोर मांडणाऱ्याच्याही नजरेतून. अर्थ असा पान व्यापून टाकणाऱ्या तेलाच्या थेंबासारखा मनभर पसरतो. एकच एक अर्थ उरत नाही. पुन्हा नवं काम. नवे अर्थ. त्यात गुरपटणारे आपण. रंग, रेषांच्या पलीकडे आपल्यातलं काहीतरी आपण शोधू पाहतो. कधीतरी असा क्षण येतो नि आपण थबकतो. सालं समोरच्याशी जुळायला, निदान तशा शक्यतेला बिलगणारी रंगाची रेषीय धार आपल्यापर्यंत आतात मिसळत जाते. दर गॅलरीत हा अवकाश आणि त्याला व्यापून असणारी गूढतेची किनार कायम आपल्याला बिलगून राहते. जुना अडगळीतल्या लाकडी खांबांवर उभ्या असलेल्या वेअरहाऊसला प्रदर्शन गॅलरीचं दिलेलं स्वरूप नि कागदी मानवी देहाचे लटकते देह पाहिल्यावर ही गूढतेची किनार आणखी गडद होत जाते. दुपारचे रखरखीत ऊन नि पानांची सळसळ त्यात पक्षांची किलबिल. पुन्हा वेगळी मांडामांड.


धान्य पाखडायच्या सुपावर केलेलं काम 

आपल्या आकलनतेपलीकडची. काहीतरी शोधायला निघावं किंवा तसं आत डोकवावं तर आपण शांतपणे पुढं सरकतो. ‘कळणं’ हे बऱ्याचदा दृकश्राव्य माध्यमाला मर्यादित करून टाकतं. त्याच्या अर्थाच्या शक्यताच इतक्या दूर आणि अनेकार्थी बाजुंनी पसरलेल्या असतात कि आपल्याला त्यातून एकंच एक निष्कर्ष, अनुमान काढता येत नाही. आपले अर्थ आपण शोधावेत. सापडलं काही त्यात तर त्याला बहुपदरी आकांक्षेने विस्तारात जावं. नाहीच सापडलं तर त्याला जिथलं तिथे ठेवावं. त्याचा त्याचा अर्थ त्याला उरतोच. नसला तरी त्याने फार काही फरक पडत नाही. अस्तित्व असतंच. सजीव-निर्जीव असा भेद करता येत नाही त्यात. 

असं हे काय काय बिएनाले पाहताना अगदीच विस्कळितपणे डोक्यात आलं. 


***


भटकण्याचा निमित्तानं केलेली आणखी काही खाडाखोड : 

१. https://shodhnyatlikhadakhod.blogspot.com/2026/02/blog-post.html

२. https://shodhnyatlikhadakhod.blogspot.com/2025/03/blog-post.html


***

Thursday, February 5, 2026

अधल्यामधल्या भटक्यानोंदी : मुक्काम बगरु


बगरु गावात शिरताना 

जयपूरपासून साधारणतः चाळीसेक किमी अंतरावर असलेल्या बगरु गावात होस्टेलमधल्या एका मुलाला घेऊन गेलो. तो बाईक घेऊन राजस्थान फिरतोय मागच्या पंधरा दिवसांपास्नं. कॉन्टेन्ट वगैरे तयार करतो. रुबल त्याचं नाव. म्हटलं असं असं गाव आहे येतोस का ? तर हो म्हणाला. जयपूर लिट फेस्टमध्ये मराठी भाषा विभागाच्या स्टॉलवर माझी मुलाखत होती. म्हटलं ती उरकून येतो तोपर्यंत तू गाडी वगैरे आवर. मुलाखत आटपून गाडीवरनं सुस्साट निघालो. नॅशनल हायवेला लागून गाव होतं तरी गुगल मॅपने गंडवलं. वीसेक मिनिटं मागे-पुढे करण्यात गेली. दुकानदारांना विचारत पोचलो गावात. सिमेंटचे ढिगारे असतात तशी घरं. गाव असंही धड म्हणता येईल अशी चिन्ह नाहीत. गाव म्हटल्यानंतर आपली आपली डोक्यात रचना किंवा एक सर्वसाधारण चित्र असतं त्याहून हे गाव अगदीच निराळं. बहुतांश राजस्थानात हेच चित्र. कबीर यात्रेच्या दरम्यान एक मुक्काम पुगल या गावी होता. अर्थात तिथं पोहोचेपर्यंत मावळलं होतं. पण गाव ज्याला म्हणू अशा काहीच खाणाखुणा नाहीत. गवताच्या झुलपांनी झाकलेली छतं आणि लाल-राखड्या मातीची घर हे फक्त महागड्या रिसॉर्ट्समध्ये परावर्तित झालेलं आढळलं काही ठिकाणी. त्यामुळं बगरु गाव हे असं नव्या आधुनिक आक्रमणात उभं राहिलेलं दिसलं. माणसं तीच पण जगण्यात एकप्रकारचा निमशहरीपणा आलेली. अर्थात हे काही वाईट नाही. माणसं जगण्याचे पर्याय आपापल्या परीनं निवडत असली, तरीही काळ स्वतःच्याच गतीनं पुढं सरकतो. अपरिहार्यपणे माणसंही त्यापाठोपाठ चालू लागतात. त्यामुळं इथं दोष देणं किंवा हळहळणं उपयोगाचं नाही. 

दृष्टान्तपाठ मध्ये 'रोवंतलेया पशूचा दृष्टांत' आहे. तो असा : 


पशु असे : ते आडीदरडी चरे : पोट भरे : मग एकी ठाइं बैसोनि रोवंती ।

तेणे तयाचीया सप्तधातु निवती : तुष्टि होए पुष्टि होए बळ होए ।।


गावाचा एक फोटो 

बगरुत उतरल्यावर हा दृष्टांत आठवला. गावखेड्यात अगदी आत्ताआत्तापर्यंत रानातून चरून आलेली गुरंवासरं कुणाच्याही अंगणात किंवा झाडांच्या सावलीत रवंथ करताना मी पाहिलेली आहेत. वरील दृष्टांतातील अर्थ सांगण्यात पॉईंट नाही. त्यातली भाषा आणि तिची लय इतकी मोहवून टाकणारी आहे कि कुणालाही तिच्या ठायी असलेला अर्थ उमगेल. प्रत्येक गावात हे अस्सचं चित्र असेल हे काही मनात साठवून मी बगरुकडे निघालो नव्हतो. पण कायापालट किती झपाट्यानं होतो आणि तो आपल्याला किती टोचतो हे मात्र आवर्जून उमगलं. बगरु गावात ते उमगणं जास्त अंगावर आलं.


बगरु गाव हे ब्लॉक प्रिंटसाठी ओळखलं जातं. पारंपरिक पद्धतीने नैसर्गिक रंग वापरून बगरु छपाई करणारे हजारेक कारखाने इथं आहेत. त्यामुळं गावाचंही नाव बगरु असं आहे. 

एकदोन दुकानदारांना कारखाने कुठं बघता येतील व्यवस्थित विचारलं तर, इथे खूप कारखाने आहेत. कुठेही जा असं उत्तर मिळालं. थोडं शोधल्यावर बगरु छपाईसाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री मिळालेल्या राम किशोर डेरेवाला यांचा कारखाना सापडला. पण फोटो आणि छपाई कौशल्य समजून घेण्यासाठी तुम्ही वर्कशॉपला या असं त्यांचा मुलगा म्हणाला. मुंबई वरनं आलोय आणि मी लिहितो वगैरे रुबलने सांगितल्यावर थोडीबहुत माहिती दिली. पण हे काही पुरेसं नव्हतं. पुन्हा कधीतरी वर्कशॉपला येऊ म्हणत आम्ही बाहेर पडलो. आता कुठे जायचं म्हणत गाडी सुरु झाली आणि गावाच्या गल्लीबोळात वळणं घेऊ लागली. इतक्यात गच्चीवरनं नुकतीच छपाई पूर्ण होऊन उन्हात सुकण्यासाठी खाली सोडलेल्या साड्या दिसल्या. थांब बोलल्यावर रुबलने कचकन ब्रेक मारला. नईवाल भवन नावाचं घर दिसलं. काहीतरी सापडेल म्हणून थेट दारात गाडी उभी केली. उन्हात सुकलेल्या साड्या गोळा करणाऱ्यांना बोललो, मुंबईवरनं आलोय. थोडी या छपाईच्या कामाविषयी माहिती हवीय. तुमची परवानगी असेल तर आम्ही वर जाऊन पाहू शकतो का ? तर हातातल्या साड्यांचा गोळा खाली ठेवत त्यांनी मुलाला हाक मारली. म्हणाले यांना घेऊन वर जा. मुलाचं नाव सागर. 


सागर. मोकळेपणानं हसतोय. 

तो अगदी आनंदानं वरच्या मजल्यावर घेऊन गेला. खाली घर आणि वर कारखाना. बिन्धास्त विचारा फोटो काढा म्हणाला. वरच्या मजल्यावर काही बायका, मुली अगदी बारीक नजरेनं कपड्यावर ब्लॉक उमटवत होत्या. आम्ही आलोय वगैरे त्यात त्यांना काही रुची नव्हती. नजर एकाग्र. विवीध रंगांचे डबे, त्यात बुडालेले ब्लॉक आणि त्यांच्या हातांची लक्षणीय लय. ब्लॉक कपड्यावर उमटताना एक विशिष्ट आवाज आणि रंग भरल्यावर कपड्याचा येणारा किंचित कुबट वास. तो बहुतेक नैसर्गिकपणे रंग तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्यामुळे येत असावा. सागरने कपड्यापासून रंग कसे तयार होतात, त्यात कोणकोणते घटक असतात, रंग तयार होण्याचा कालावधी, ब्लॉकच्या निरनिराळ्या डिझाइन्स, छपाईची प्रक्रिया, धुलाई, त्यात समाविष्ट करायची इमलीची फुलं, आल नावाचा दगडाचा प्रकार अशा बऱ्याच गोष्टी सविस्तर सांगितल्या. मला त्याच्याकडे कामाला असणाऱ्या बायकांच्या बाबतीतला एक प्रश्न होता. यांना प्रशिक्षण दिलं जातं का आणि ब्लॉकच्या डिजाइन्सनुसार कोणकोणते रंग वापरायचे हे त्यांना कोण सांगत ? कि त्या स्वतःच निर्णय घेतात? कारण मी दोनेकतास जे पाहत होतो त्यात त्या स्वतःच ब्लॉक निवडायच्या त्यात स्वतःच रंग भरायच्या आऊटलाईन द्यायच्या. सागर म्हणाला, आम्ही एक महिना त्यांना प्रशिक्षण देतो. त्यानंतर दिवसभराचं जे काम असेल त्याप्रमाणं साडी, ओढणी किंवा कटपीस वगैरेचं ब्लॉक डिजाईन आणि त्यामध्ये भरायचे रंग याचा नकाशा त्यांना दिला जातो. त्याप्रमाणे त्या त्या-त्या ब्लॉकमध्ये रंग भरतात. सागर साड्यांचं डिजाईन स्वतः किंवा ग्राहकांच्या मागणीनुसार तयार करतो. 


सागरकडे काम करणाऱ्या महिला कारागीर 

आता थोडं संपूर्ण प्रक्रिया कशीकाय असते हे जाणून घेऊया.

बगरु प्रिंटसाठी वापरण्यात येणाऱ्या पांढऱ्या कपड्यावर हरड डाय केली जाते. त्यामुळं पांढऱ्या कपड्याचा रंग हलकासा पिवळसर होतो. हे करण्याचं एक कारण म्हणजे बगरु प्रिंट ही केवळ पिवळ्या रंगाच्या कापडावरच केली जाते. कारण नैसर्गिक प्रक्रियेद्वारे तयार केलेले रंग पिवळसर कपड्यावरच उठून दिसतात असं सागरचं म्हणणं. या कपड्यावर वेगवेगळ्या ब्लॉकद्वारे मागणीनुसार डिजाईन छापली जाते. दिवसभर सुकवून दुसऱ्या दिवशी एका मोट्ठ्या तांब्याच्या भगून्यात आदल्या दिवशी प्रिंट केलेली सगळी डिझाइन्स उकळण्यासाठी ठेवली जाते. या पाण्यात 'आल' ( पिवळसर रंगाचा धातू, जो बगरु गावात चायनाकडून आयात केला जातो.) रंग आणि इमलीची फुलं मिसळली जातात. आणि मग हे मिश्रण गरम पाण्यात साधारणतः दोन तास उकळलं जात. मग पुन्हा प्रिंट सुकवून त्यावर हरड डाय केली जाते. ही सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यावर एक हात इस्त्रीचा मारला कि माल मार्केटमध्ये जाण्यासाठी तयार! 


प्रिंट उकळण्याचं तांब्याचं भांडं 

सागर कॉटन व्यतिरिक्त महेश्वरी, चंदेरी, मोडाल असे फॅब्रिकचे वेगवेगळे पर्याय प्रिंटसाठी वापरतो. सिल्क पर्याय तो वापरत नाही. पारदर्शक कपड्यात रंग डिजाइन्सच्या बाहेर पडतात आणि ते काम फार किचकट होतं किंवा रंग जरी सिल्क कापडात भरले तर धुवताना ते रंग पुसले जातात असं तो म्हणाला. सागरकडे तयार होणारी बगरु प्रिंट कॉटन साडी ८००-१००० रुपयांना विकली जाते. बाजारात त्याच साडीची किंमत साधारणतः १५०० रुपयांपर्यंत जाते. सागर स्वतः त्याच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम ( bagru Fab Printers ) पेजद्वारे विक्री करतो. शिवाय जयपूरमधील अनेक विक्रेते त्याचा माल उचलतात. 




आल रंग, रंग कुजवत ठेवण्याचं भांडं आणि इमलीची फुलं. 


गध आणि रेख 

ब्लॉक डिझाईनचा जो साचा असतो त्याचे दोन प्रकार असतात. एक गध आणि दुसरा रेख. गध म्हणजे बाह्यरेखा. सोप्प्या शब्दात सांगायचं तर आऊटलाईन ! आणि रेख म्हणजे ज्यात रंग भरायचे आहेत ती पोकळी. रिकामी जागा.

घराच्या मागच्या आवारात रंग तयार करण्यासाठी ठेवले होते. एका भांड्यात गूळ आणि लोखंड कुजत ठेवलेलं. पंधराएक दिवसांनी त्याचा काळा रंग तयार होणार होता. दुसऱ्या भांड्यात इमलीच्या फुलांपासून तयार केलेलं पीठ होतं. ते रंगात मिसळलं कि रंग घट्ट होतो. अशी चारपाच मोट्ठी भांडी आणि त्यात कुजत ठेवलेले रंग. सागरने हे मोकळेपणानं सगळं दाखवलंच पण इत्यंभूत माहितीही दिली. 


रंग आणि कपड्यावर उमटलेली आकृती 

सागरचे आजोबा, वडील आणि सागर अशी तिसरी पिढी हा व्यवसाय करतेय. मी शेती वगैरे आहे का विचारलं वडिलांना. तर नाही म्हणाले. याच कामात सगळा परिवार गुंतलाय. सागर हे काम मनापासून करतोय. कामावर येणाऱ्या बायकांना सन्मानानं वागवतो. साडेपाच झालेले. बायका आवरून निघत होत्या. कोपऱ्यात एका मुलीचं काम सुरूच होतं. सागर म्हणाला, क्या गुडिया घर नहीं जाना क्या ? 


सागरचं कुटुंब

खाली उतरल्यावर सागरने कुटुंबातील सगळ्यांशी ओळख करून दिली. निघताना सागरचे आजोबा म्हणाले, येत राहा. आम्ही पायाच पडलो दोघंही. किंचित गारठा वाढताना हॉस्टेल गाठलं. कमाल दिवस. सगळं सांगायचं म्हटलं तर खूप सारं लपलेलं उरतं सांगायचं. बस थांब्यावर गालाला हात लावून वाट पाहणारी माणसं, घरी वडील आजारी आहेत म्हणून शिक्षण सुटलेला एक छोटूही सापडतो कचोरीच्या ठेल्यावर. त्याचं हसणं विसरता येत नाही. शाळेत का जात नाहीस असं मला अजिबातच विचारता आलं नाही. 


घरातला एक कोपरा.


इथे जोडलेले सर्व फोटो सागर यांच्या परवानगीने काढलेले आहेत. राजस्थानात गेलात आणि ही सगळी प्रक्रिया समजावून घ्यावी वाटली किंवा सागर यांना भेटावं किंवा त्यांच्याकडून घरबसल्या ब्लॉक प्रिंटमधल्या वस्तू मागवायच्या झालं तर खाली सागर चिपा यांचा नंबर जोडतो. वर जिथं त्यांच्या इंस्टाग्राम पेजचा उल्लेख आलाय तिथं क्लिक केल्यास थेट त्यांच्या पेजवर जाऊन, त्यांचे प्रोडक्ट्स पाहून खरेदीही करण्याचा पर्याय आहे.

सागर चिपा : +91 95710 64659.



***



मुक्तकैवल्य सुदिवसें

यावेळेसच्या कोची बिनाले त सर्वाधिक आवडलं ते स्टुडंट बिनालेतलं काम. मांडणीत अधिक स्पष्टता आणि त्यामागचा केंद्रस्थानी असलेला विचारही नेमका. का...