''मुंबईच्या गर्दीचा, रेल्वे व्यवहारांचा आणि शहरातील सर्व महत्त्वाच्या परिसराचा फेरफटका घडवत आजच्या शहरी तरुणांची विरत चाललेली स्वप्ने मांडणारी कादंबरी नुकतीच आली आणि वाचकप्रिय झाली. कादंबरीतील सामाजिक व्यवस्थेला व्यवस्थितपणे सामावून घेणारी भाषा सापडणे बऱ्याचदा लेखकाचा कस पाहणारे असते. इथे साजेशी भाषा घडविण्यामध्ये लेखक यशस्वी झाला आहे.''
***
प्रदीप कोकरे या तरुण लेखकाची ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ ही कादंबरी वाचत असताना मला भालचंद्र नेमाडेंचं एक विधान आठवत होतं. नेमाडे एकदा म्हणाले होते की, साधारणत: पंधरा-वीस वर्षांनी पिढी बदलते. प्रत्येक नव्या पिढीची मानसिकता आदल्यांहून वेगळी असते. जगाकडे बघण्याचे दृष्टिकोन भिन्न असतात. काळ बदलला की प्रश्नांना समोर जाण्याचे प्रत्येकाचे मार्गही बदलून जातात. त्यामुळे ‘कोसला’ मी माझ्या काळच्या तरुण पिढीला समोर ठेवून लिहिली. आजचा एखादा तरुण ‘कोसला’ला नाकारून आजच्या काळातल्या तरुणांच्या नजरेतून जगाला सामोरं जाईल. प्रत्येक पिढीची आपली आपली एक ‘कोसला’ असते.
|
हा लेख लोकसत्ता, लोकरंग पुरवणीत आदले । आत्ताचे या सदरात दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रकाशित झाला होता. फोटो : लोकसत्ता
|
अधूनमधून काही कादंबऱ्या वाचत असताना हे आठवतं. या कादंबऱ्या आठवतात, त्या ‘कोसला’शी साम्य असलेल्या असतात किंवा ‘कोसला’च्या प्रभावातून लिहिलेल्या असतात असंही काही म्हणता यायचं नाही; पण त्यातली संवेदनशीलता ‘कोसला’ला समांतर जाणारी असते; आपल्या आपल्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी असते.
प्रदीप कोकरे यांची अलीकडेच लोकवाङ्मय गृह, मुंबई या प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेली कादंबरी ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या अर्थाने आजच्या काळातल्या महानगरीय तरुणांच्या संवेदनविश्वाला जवळ जाणारी प्रातिनिधिक कादंबरी आहे. महानगरीय असं म्हटलं तरी आजच्या काळात एकूणच आधुनिक संवेदनांची ज्या पद्धतीने सरमिसळ होऊ लागली आहे, ती पाहता ही कादंबरी केवळ महानगरीय तरुणांच्या संवेदनविश्वापुरती मर्यादित राहत नाही. ती त्याहूनही अधिक अवकाश व्यापताना दिसते. अर्थात, महानगर हे या कादंबरीच्या नायकाच्या वर्तमान जगण्याच्या संघर्षांच्या केंद्रस्थानी असल्याने यात चित्रित झालेल्या बहुतांश सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक घडामोडींमधून महानगरीय संवेदनाविश्व दृग्गोचर होत राहते. नायक काही दिवसांसाठी गावी गेल्यावर निवेदनात तिथल्या दैनंदिन लोकजीवनाचे तपशील येतात. त्यातही गावातल्या बायकांच्या टीव्हीवरच्या सीरियल्सच्या अनुषंगाने चाललेल्या गप्पा, फोन, क्रिकेट वगैरेमुळे आधुनिकीकरण ग्रामीण संवेदनाविश्व कसे व्यापत आहे आणि नायकही आपले अगदी कालपरवापर्यंतचे तिथे त्याच परिसरात गेलेले आयुष्य नजरेआड करू पाहताना शहरी जगण्याच्या विवंचनातून बाहेर येऊ शकत नाही, हेही समोर येत जाते. गावच्या त्या परिसरात जगत असताना आपण केवळ परंपरेने म्हणून स्वीकारलेल्या काही सांस्कृतिक संरचनांकडे काहीशा संशयास्पदपणे पाहण्याचा नायकाचा प्रयत्नही त्यातून जाणवत राहतो. ही जाणीवही त्याला महानगरीय संवेदनांनी त्याचा वर्तमान व्यापलेला असल्याने झाली असावी, असे वाटते.
कादंबरी हा साहित्य प्रकार वर्तमानाचे बोट पकडून उभा राहत असल्याने भूतकाळ मागे टाकून समकालीन जगण्याच्या शक्यतांचा शोध घेणे हेच कादंबरीकारासमोरील महत्त्वाचे आव्हान असते. या आव्हानाला लेखक कसा सामोरा जातो, काळाने उभे केलेले पेच तो कसे सोडवतो, त्यासाठी स्वत:ची भाषा कशी निर्माण करतो, यातून लेखकाचे सामर्थ्य दिसून येत असते. प्रदीप कोकरे यांनी हे आव्हान या कादंबरीमध्ये बऱ्यापैकी यशस्वीपणे पेलले आहे, असे म्हणावे लागते. मुंबई या महानगराचा अवकाश निवडल्यावर तिथल्या संबंधित परिसराचे, तिथे राहणाऱ्यांच्या दैनंदिन जगण्याचे, जगण्यासाठी आणि आपले वर्चस्व टिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षांचे, सांस्कृतिक व्यवहारांचे, मानसिक स्तरावरील उलाढालींचे जे तपशील लेखकाने दिले आहेत, त्यातून एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील पहिल्या दोन दशकांचे वर्तमान वाचकाच्या नजरेसमोर ठळक होत जाते. प्रथमपुरुषी निवेदनाचा वापर करत नायक स्वत:च्या जगण्याविषयी बोलत असला तरी त्यातून महानगरातील गलिच्छ वस्त्या, तिथलं लोकजीवन, त्यांचे परस्परांशी असलेले संबंध, रोजीरोटीबरोबरच आत्मसन्मानासाठी निर्दयी तसेच आत्मकेंद्री व्यवस्थेशी करावा लागणारा झगडा, विचारी व संवेदनशील माणसाची या व्यवस्थेत होणारी घुसमट, त्यातून येत जाणारा संवेदनांच्या पातळीवरील बधिरपणा, अंतिमत: त्याची परिणती म्हणून परात्म होत जाणे, अशा असंख्य गोष्टींविषयी वाचकाला कळत जाते.
या कादंबरीचा नायक गावातल्या मोकळय़ाढाकळय़ा वातावरणातून पोटापाण्याची काही तरी सोय लावावी म्हणून बाह्यत: गजबजलेल्या, तरीही आतून आक्रसलेल्या शहरात येऊन स्थिरावू पाहतो. या शहराच्या सगळय़ा आत-बाहेरच्या कल्लोळांशी त्याने बऱ्यापैकी जुळवून घेतले आहे. कादंबरीच्या प्रारंभापासूनच पुढे कादंबरीभर पसरून राहिलेले या कल्लोळांचे पडसाद आपल्याला सतत जाणवत राहतात. नायकाच्या भावविश्वाचाच एक भाग बनून गेल्यासारखे त्याच्या एकटेपणातल्या चिंतनातून, दैनंदिनी, कविता वा शिव्यांतून, वेगवेगळय़ा माणसांशी बोलाचाली, व्यवहार करताना घडणाऱ्या कृती अशा सगळय़ामधून ते कमीजास्त तीव्रतेने व्यक्त होतात. तो म्हणतो तसं या कल्लोळांची त्याला हळूहळू सवय होत जाते. त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तो अधिकाधिक त्यात हरवून जातो. वाढ खुंटून स्थितिशील झाल्यासारखा बथ्थडपणे गरगरत राहतो. साधारणत: हे कादंबरीचे एक मध्यवर्ती सूत्र म्हणून सांगता येईल. या मध्यवर्ती सूत्राच्या अनुषंगाने या कादंबरीतील सर्व घटना, प्रसंग, वर्णने, निवेदन, विविध पात्रांचे परस्परसंबंध यांकडे पाहता येऊ शकते.
कादंबरीची सुरुवात नायकाच्या रोजच्या जगण्यातील एका नेहमीच्या सवयीच्या पहाटेपासून होते. शौचाला जातानाचे तपशील, संडाससाठी असलेली रांग, पोटं तुरंबलेल्या तिथल्या माणसांची क्षुद्र अरेरावी, कुरघोडय़ा, शिव्या, गटारातून फिरणाऱ्या घुशी, बेवारशी कुत्री, असं सगळं चाळीतील संस्कृतीच्या संदर्भाने येणारे तेथील उबगवाणे वातावरण महानगरातल्या निम्नस्तरीय जगण्याचा एक अपरिहार्य भाग आजही आहे. दिवसाची ही सुरुवात कुठल्याही अंगाने प्रसन्न आहे, असं म्हणता येणार नाही. या अशा वातावरणात नोकरीची, राहण्याच्या जागेची, लैंगिक भुकेच्या शमनाची, संसाराची, स्थिर जगण्याची, कसलीही शाश्वती नसलेल्या आणि पुस्तकं नि कवितांसह तुकोबा, कबीर, नामदेव ढसाळ, कुमार गंधर्व, मुकुल शिवपुत्र, केसरबाई, मेहदी हसन, फरीद अयाज, लीळाचरित्र, जहांगीरमधली चित्रं वगैरेंशी मनाने सख्य जोडून असलेल्या संवेदनशील तरुणाची काय पंचाईत होत असावी याचा अंदाज येऊ शकतो. कादंबरीच्या सुरुवातीच्या प्रसंगाने आपल्या मनात निर्माण केलेले एक प्रकारच्या उदासीचे, खिन्नतेचे आणि अलिप्ततेचे वातावरण पुढे सबंध कादंबरीला व्यापून राहिलेले दिसते. नायकाचं गावी गेल्यावर आईवडिलांसह लहानपणापासूनच्या त्या परिचित परिसराला भेटल्यावर, जिच्यामध्ये मन गुंतलं आहे त्या सुधासोबत असताना, मित्रांसोबत वावरताना, अन्य सहकाऱ्यांसोबत वा एकटं असतानाही हे उदासवाणं अलिप्तपण दूर गेल्याचे जाणवत नाही. नायकाच्या देहामनाला वेढून राहिलेले हे अलिप्तपण आणि उदासीनतेने वाचकांनाही आपल्यासोबत गुरफटून घेतल्याचा अनुभव ही कादंबरी वाचताना येत राहतो. या कादंबरीचे हे एक वैशिष्टय़ म्हणून नोंदवता येईल.
|
कादंबरीचे मुखपृष्ठ : अन्वर हुसेन |
या कादंबरीतील जवळपास प्रत्येक लहानमोठय़ा व्यक्तिरेखेला स्वत:चं असं स्वतंत्र अस्तित्व आहे. प्रत्येकाचं या कादंबरीच्या अवकाशात काही एक विशिष्ट स्थान आहे. कादंबरीच्या सुरुवातीला पहाटे चाळीतल्या सार्वजनिक संडाससमोरच्या रांगेत नंबर लावायला जाताना आठवणारी पायांखाली येऊन मेलेली घूस असो, की काळवेळेचं वा कसलंही भान नसलेले रस्त्यावर झेंगट लावून हास्यास्पद प्रदर्शन घडवणारी कुत्री असोत, माणसांइतकेच हे जीवही या किळसवाण्या महानगरीय अधोविश्वाच्या संस्कृतीबरोबरच नायकाच्या मनातील कल्लोळांचे प्रतिनिधित्व करणारी पात्रे आहेत. त्यांच्या कादंबरीतील असण्याला काही एक अर्थपूर्ण प्रयोजन आहे. त्यांच्या अस्तित्वामुळे निवेदनातून आपल्यासमोर साक्षात होत जाणारा तपशील अधिक जिवंत आणि वास्तववादी होत जातो. अर्थात, याशिवाय यात प्रसंगोपात येत जाणाऱ्या वेगवेगळय़ा मानवी व्यक्तिरेखाही तितक्याच लक्षणीय आणि ठसठशीत आहेत. चाळसंस्कृतीतील लाचारी, भूक, उंडगेपणा, नादानपणा, व्यसनी वृत्ती, गुंडगिरी, लैंगिक उपासमार, अकृत्रिम मानवीय जिव्हाळा इ. विशेष स्पष्ट करणारी गण्या फुलवाला, पिंटय़ाभाय, पिंटय़ाचा बाप हरितात्या, सखू म्हातारी, शंकर, बबन्या, सुधा यांसारखी पात्रे, नोकरीच्या ठिकाणाच्या मालकाची मुजोरी, बेफिकिरी, मजबुरी वगैरे दाखवणारी टाटारिया, लावण्या, जितू ही पात्रे, महानगरातील एकाकीपणा, निर्वासित जगणे, दाखवून देणारी कुणी एक ‘तो’ आणि त्याच्यासारखी काही पात्रे ही या कादंबरीची बलस्थाने ठरणारी आहेत. कादंबरीच्या नायकाइतकीच ही पात्रेही या कादंबरीच्या मध्यवर्ती सूत्राला पुढे घेऊन जाण्यासाठी उपयोगी ठरतात.
कादंबरी हे एक भाषित रचित असल्याने कादंबरीकाराला हे रचित घडवताना स्वत:ची भाषाही शोधावी लागते. कादंबरीतील सामाजिक व्यवस्थेला व्यवस्थितपणे सामावून घेणारी भाषा सापडणे बऱ्याचदा लेखकाचा कस पाहणारे असते. कादंबरीच्या भाषेविषयी मराठीमध्ये म्हणावी तितकी जागरूकता दिसत नाही, हे खरे आहे. या उदासीन पार्श्वभूमीवर ‘खोल खोल दुष्काळ डोळे’मध्ये लेखक साजेशी भाषा घडविण्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे, हे लक्षात येते. भाऊ पाध्ये, चंद्रकांत खोत, दिवाकर कांबळी, जयंत पवार, जी. के. ऐनापुरे यांनी निम्न वा अधोस्तरीय महानगरीय अवकाशाला साजेशी भाषा त्यांच्या लेखनासाठी जाणीवपूर्वक निर्माण केली. त्या वाटेने प्रदीप कोकरेसारखा तरुण लेखक चालू पाहतो आहे, हे दिलासादायक आहे. कादंबरीत वापरलेले नायकाच्या दैनंदिनीतील चिंतन, त्याच्या मन:स्थितीचे दर्शन घडवणाऱ्या त्याच्या कवितांचे तुकडे, तुकोबांचे अभंग व विविध गायकांच्या चिजांचे संदर्भ, नायकाच्या मनाचे भरकटलेपण पकडू पाहणारे निवेदन, फेसबुक, व्हाटसऍप, इन्स्टा यांसारख्या आधुनिक समाजमाध्यमांशी संबंधित लेखन, अशांसारखी संभाषिते महानगरीय जगण्यातील कोलाहल, वखवखलेपण, अतृप्ती, अशांती, एकाकीपण, तडजोड, स्वप्ने, राडे, स्पर्धा, सत्तासंघर्ष, सांस्कृतिक संघर्ष, डिप्रेशन, अंतिमत: केऑस अशा अनेकानेक घटितांच्या चित्रणाच्या पार्श्वभूमीवर कादंबरीच्या भाषेला वेगळेपण देऊ पाहतात. चाळीतील तरुणांची रांगडी, मोकळीढाकळी भाषा, शिव्यांचा आणि लैंगिक शब्दांचा मुक्त वापर, संवादांतील जिवंतपणा, प्रथमपुरुषी निवेदनातून समोर येणारे वास्तववादी तपशिलांतील बारकावे, यामुळेही कादंबरीच्या भाषेचा बाज खुलला आहे.
कादंबरीच्या आकारामुळे ती चटकन वाचून हातावेगळी होते हे खरे असले, तरी सत्यकथानिष्ठ दीर्घकथा वा लघुकादंबरीसारखे तिचे स्वरूप जाणवत राहते. तिच्यात कादंबरीच्या विस्तृत व गुंतागुंतीच्या संरचना पटाची उणीव जाणवते, हेही मान्य करावे लागते. बऱ्याचदा नायकाच्या व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित नोंदींपुरतेच यातल्या काही घटनांचे स्वरूप उरते की काय असेही वाटत राहते. वाचक म्हणून असमाधानी वाटावे अशा काही गोष्टी त्यातून जाणवत राहतात. विशेषत: नायकाचं आपलं असं अधांतरी लोंबकळत जगणं जगत असतानाही त्याच्या भवतालच्या अवकाशात देशावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक राजकीय व सांस्कृतिक उलथापालथी याच काळात घडत राहिल्या होत्या. त्यांचा परिणाम राजकीय-सामाजिक वा सांस्कृतिकदृष्टय़ा सजग आणि संवेदनशील असलेल्या नायकाच्या मनावर कळत नकळत होणे साहजिकच आहे. पण तसे ते या कादंबरीत क्वचितच जाणवत राहते. हा दोष म्हणता आला नाही तरी कादंबरीसारख्या सामाजिक व कृतिशील वाङ्मय प्रकाराची ती एक प्रमुख मागणी असते. याच दशकभराच्या काळात आलेल्या, आजच्या पिढीची घुसमट व आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठीचा संघर्ष मांडणाऱ्या किरण गुरव, सुशील धसकटे, प्रसाद कुमठेकर, अवधूत डोंगरे, सुशील गायकवाड यांसारख्या तरुण लेखकांच्या कादंबऱ्यांमध्ये या दृष्टीने विचार केला गेल्याचे दिसून येते.
महानुभवी तत्त्वज्ञानात सांगितल्याप्रमाणे कसल्याही गोष्टीची सवय जडू नये, जगण्याचा साचा होऊ नये, यासाठी आपल्या कादंबरीतील नायकाप्रमाणेच सजग असलेल्या या कादंबरीकाराकडून अधिक खोली गाठण्याच्या अपेक्षा करता येतील, असे मात्र नक्कीच ही त्याची पहिली कादंबरी वाचत असताना जाणवते. आपण जगत असलेल्या काळाचा तुकडा पकडू पाहताना आपल्या अस्तित्वभानाचाही शोध घेण्याचा प्रदीप कोकरे यांचा हा प्रयत्न निश्चित वाखाणण्याजोगा आहे.
- प्रवीण दशरथ बांदेकर
कवी, प्राध्यापक आणि कोकणातील साहित्य चळवळींमधील महत्त्वाचे नाव. नवाक्षर दर्शन’ या मराठी नियतकालिकाचे संस्थापक संपादक. ‘येरू म्हणे’, ‘खेळखंडोबाच्या नावानं’ या काव्यग्रंथांनंतर गद्यलेखनात सक्रिय. ‘चाळेगत’, ‘इंडियन ऍनिमल फार्म’ या कादंबऱ्या लोकप्रिय. ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार.
साभार : लोकसत्ता ,१९ नोव्हेंबर २०२३.
***