‘अमुकचे स्वातंत्र्य’ ही फक्त एकाकी आणि तुटलेपणाच्या अवस्थेचं चित्रण करणारी कादंबरी नाही. तर माणूसपण या मूल्याला सर्वाधिक महत्त्व देऊन त्याच्या स्वातंत्र्याविषयी मूलभूत चिंतन व्यक्त करणारी कादंबरी आहे. स्वतंत्र असणं म्हणजे हवं असलेलं मिळणं नव्हे, तर काय हवंय ते ठरवता येणं. आपल्या आयुष्याचं काय करायचं ते ठरवता येणं. स्वातंत्र्य म्हणजे नसलेलं मिळवणं नव्हे, तर असलेलं नाकारणं. नकार जगणं हेच माझं स्वातंत्र्य असे म्हणणारा आणीबाणी काळातील नायक यात आहे.
***
‘‘माझ्यावरचा मुख्य आरोप हा की मला अँम्बिशन नाही. याचा अर्थ इतकाच की माझ्या आई-वडिलांना मी सी. ए. करून चांगला मोठा एक्झिक्युटिव्ह बनावं असं अँम्बिशन आहे, आणि मी सी. ए.च्या परीक्षेला बसलो नाही. तेव्हा मला अँम्बीशन नाही. हे तसं आपल्याला मान्यच आहे. आयुष्य ही काही मला पैसे मिळवण्याची संधी वाटत नाही. आणि आपलं सबंध आयुष्यच्या आयुष्य दुसऱ्याला आयते पैसे मिळवण्यासाठी देऊन टाकणं तर आपल्याला साफ नाकबूल आहे. तेव्हा मला अँम्बिशन नाहीच. मी तळ नसलेला माणूस आहे. मला जमिनीत रोवायला मुळंच नाहीत.’’
शशांक ओक यांच्या १९८७ साली पॉप्युलर प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या कादंबरीतील सुरुवातीच्या पानांतील या काही ओळी आहेत.
|
मुखपृष्ठ : राजू देशपांडे, पॉप्युलर प्रकाशन |
१९६० सालापासून प्रकाशित झालेल्या ‘धग’, ‘कोसला’, ‘बॅरिस्टर’, ‘अनिरुद्ध धोपेश्वरकर’, ‘चांगदेव चतुष्टय़’, ‘माणूस’, ‘पुत्र’ आणि अशा कैक कादंबऱ्या अस्तित्ववादी कादंबऱ्या म्हणून ओळखल्या जातात. नवे अनुभवविश्व हा या सगळय़ा कादंबऱ्यांचा विशेष. पारंपरिक कादंबरीच्या रूपाला छेद देत वास्तवाचा अन्वयार्थ लावणं आणि कादंबरी या घटकाकडे सामाजिक दस्तऐवज म्हणून या नवकादंबऱ्यांसंदर्भात आपल्याला पाहता येतं. ‘अमुकचे स्वातंत्र्य’ ही कादंबरी त्याच वाटेवरची असली तरी तिचं वळण मात्र या सर्वांहून भिन्न आहे. वेगळं आहे.
आदलं-आत्ताच्या मधल्या घुसमटीत अडकलेल्या, माणूस आणि स्वातंत्र्य या मूल्यांचा आस्थेनं शोध घेऊ पाहणाऱ्या तरुणाची आणीबाणीच्या काळात घडणारी व्याकूळ गोष्ट ‘अमुकचे स्वातंत्र्य’ मध्ये आहे. निवेदकाचं निम्मं बालपण पाळणाघर आणि उरलेलं एकटय़ानं वेळ घालवण्यात नाहीतर वाट बघण्यात गेलेलं आहे. मध्यमवर्गीय नोकरदार आईवडील. वडिलांचं नोकरीनिमित्त गावोगाव फिरणं आणि आईची ८ ते ६ नोकरी. अशा बालपणावर काय उभं राहणार असा वैफल्यग्रस्त प्रश्न निवेदकाला पडलेला आहे.
आपले स्वातंत्र्य जपताना निवेदक ‘माणूस’ म्हणून जगण्याची पराकाष्ठा करताना दिसतो. पण हेही तात्पुरतं आहे, यालाही काही काळाने धक्का लागणार आणि आपल्या धडपडीला काहीच अर्थ उरणार नाही, अशी भावना त्याला प्रत्येक वेळी जाणवते. आपल्या भोवताली जे चाललेलं आहे त्याचा जराही संबंध आपल्या जगण्याशी नाहीय, जे जे सुरूय त्यातलं काहीच आपल्याशी ‘रिलेट’ होऊ शकणारं नाहीय अशा अवघडलेल्या मन:स्थितीत निवेदक अडकलेला आहे. आज निघून जातो आणि उद्या सारखा येतंच राहतो अशी भयंकर तगमग त्याला बिलगून आहे. जीवन भावनाशून्य आणि यांत्रिक आहे, माणूस स्वार्थी आहे आणि म्हणूनच आपण एकेकटे पडत चाललो आहोत असा अगदी पाळणाघरातल्या दिवसांपासून ते ‘सीए’चं सर्टिफिकेट फाडून टाकण्यापर्यंतच्या दिवसांच्या क्षुल्लकपणात त्याला जगण्यातल्या विरोधाभासाची अर्थहीनता पदोपदी जाणवत राहते. म्हणूनच पाळणाघर आणि अनाथालय यात त्याला काहीच भेद करता येत नाही. लहान वयात निवेदकाच्या अबोल आणि अंतर्वक्र एकटेपणाला बिलगलेली ही व्याकूळता शशांक ओक या कादंबरीत तिरकस विनोदाने आणि भेदक उपहासाने पानापानांत पेरतात. यातून मानवी मूल्यांच्या फोलपणाचं लक्षण ते दाखवतातच शिवाय विस्कटत चाललेल्या सामाजिक घडीचं आणि मानसिक स्वास्थ्याच्या दुभंगलेपणाचं चित्रणही ते मोठय़ा खुबीने रंगवतात. पात्रापात्रांत होत असणाऱ्या संवादात, घटनाप्रसंगात, रिकामपणात या दुभंगलेपणाची, तुटलेपणाची आणि व्याकूळतेची दाट अस घुसमट कादंबरीभर सलत राहते. या कादंबरीतील मानसिक संतुलन बिघडलेलं शिरीष साठे नावाचं पात्र एके ठिकाणी म्हणतं, ‘‘डोक्यातलं हे वजन... त्याचीच काळजी वाटतीय.’’ त्याच्या वेडसरपणाला निवेदक आणि त्याचा मित्र अन्या स्वत: जबाबदार असल्याचं ठरवतात. रूढार्थाने आखून दिलेल्या सामाजिक चौकटी ओलांडून स्वत:ला हव्या असलेल्या जगण्याचा शोध घेण्यासाठी पुढं सरसावणं आणि त्याला मानसिक धैर्य गमावून बसलेली पिढी म्हणून उल्लेखणं आणि या ओढवलेल्या परिस्थितीलाही त्याचं कारण ठरवणं यातल्या छुप्या सामाजिक हेवेदाव्यांचं चित्रणही ओक अत्यंत बारकाईने करतात. त्यातून आलेली व्यक्ती आणि समाज यांच्या मोकळीकतेची आणि स्वतंत्रतेची एककंही अधोरेखित करतात.
यातूनच बेडकिहाळकर नावाचं पात्र तीन मुलींच्या नंतर जन्मलेला मुलगा म्हणून घरी श्रेष्ठ ठरतो आणि त्याच्या बहिणी याच्या आज्ञेचं पालन करणाऱ्या ठरतात. पण शाळेत तो अत्यंत गरीब घरातला कुरूप, ढ, बुटका आणि सामान्य ठरतो. त्यामुळं घराबाहेर पडल्यावर त्याला प्रचंड न्यूनगंड येतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ही दोन विषम टोकं सांधण्यात तो कधीच यशस्वी होत नाही. दुसरं विजय नावाचं गुंतागुंतीचं पात्रही असंच. आजोबांनी लंपास केलेली इस्टेट त्याच्या बापानं काकाला भानगडी करून हाकलून देऊन स्वत:च्या नावावर केली. त्यामुळं शाळेत त्याला मुलं या भानगडीवरून सतत चिडवायची. त्यामुळं लोक आपल्याकडे एका भानगडबाज बापाचा मुलगा म्हणून पाहतात, ओळखतात अशी ठाम समजूत विजयची झालेली आहे. यातून त्याच्या एका मनाचा कोपरा कायम बंद झालेला आहे. त्याचा बाप हुकूमशाह प्रवृत्तीचा आहे आणि या प्रवृत्तीतून तो विजयला आणि त्याच्या आईला मारहाण करतो. त्याची आई निमूटपणे सहन करते आणि नवरा म्हणून देव वगैरे समजून पाडव्याला त्याची पूजा करते. व्यक्ती म्हणून वावरताना या दोन विषम टोकांचा न्यूनगंड घेऊन जगणारी आणि सतत दडपणाखाली वावरणारी ही पात्रं या कादंबरीत ओकांनी रंगवलेली आहेत. त्यांच्याकडे एक व्यक्ती म्हणून पाहताना एक समाज म्हणूनही पाहावं लागतं. त्यांच्या जगण्यातले अंतर्विरोध हे ते ज्या काळात जगतायत त्या जगण्याशी जोडलेले आहेतच शिवाय समूहाचं चित्रण म्हणून ते कादंबरीत एकटंही येत नाही. आजच्या जगण्याशी अनेक अर्थानी ते बांधता येईल इतकं ते कालसुसंगत आहे.
या कादंबरीतील निवेदकाचा इथल्या सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक आणि आर्थिक व्यवस्थेला नकार आहे. माणूसपणाच्या जवळ जाणारं एकही स्ट्रक्चर या भोवतालात नाहीय. जी संरचना निर्माण झालेली आहे ती यांत्रिक आहे. तिला माणसाचं स्वातंत्र्य मान्य नाही अशी व्याकूळता या नकारात आहे. त्यामुळं या परिसंस्थेत वावरताना निवेदकाला त्याच्या बागेत घोसाळय़ाच्या वेलाला एक मोठं घोसाळं जागच्या जागीच वाळून गेलेलं दिसतं. निवेदकाला आतून तसं वाटायचं. या एकाकीपणातही तो म्हणतो, ‘मी स्वतंत्र होईन. एक ना एक दिवस स्वतंत्र होईन. मला हवं ते करीन. मला हवं तसं करीन.’ पण या भावना व्यक्त करतानाच त्याला त्याच्या मित्रांच्यातल्या एकाच्या भावाच्या लग्नाला बोलावण्यासाठी केलेली यादी दिसते. त्यात त्याला त्याचं नाव दिसत नाही. आणि तेव्हा तो म्हणतो, ‘मी यांच्यातला एक का बनू शकत नाही?’ एकीकडे या सगळय़ा परिस्थितीला बळी न पडता नाकारायचं आणि त्याच परिस्थितीत स्वत:चा अवकाश शोधायचा अशी असह्य गुंतागुंत त्याच्या वाटय़ाला येते. तो म्हणतो, ‘‘... आपण स्वत:लाच धरून बसतो. कशातही पडायची आपल्याला भीती वाटते. कशातही अडकायची भीती वाटते. स्वत:च्याच भिंती बांधून स्वत:ला तोडून घेतो आपण आणि त्यातच स्वतंत्र आहोत असं भासवतो. आपल्याला स्वत:ला सोडता येत नाही. आपलं स्वातंत्र्य खरं नाही. आपल्याला काडीइतकी किंमत नाही. आपलं सगळं खोटंच असतं. काहीही केलं तरी ते खोटं, अर्थहीन, विफल. आपलं स्वातंत्र्य खरं नाही. आपलं काहीही खरं नाही...’’
या व्याकूळतेच्या तळाशी कादंबरीतील सर्व पात्रांना मानसिक स्थैर्य हवं असल्याचं दिसतं. निवेदकाच्या आईवडिलांना निवेदकाच्या समस्या तुलनेनं छोटय़ा आणि बिनमहत्त्वाच्या वाटतात. निवेदक आपल्याला थकवा आलाय, मला बरं वाटत नाहीय असं म्हणतो तेव्हा त्याचे आईवडील या वयात कसला आलाय थकवा, काही काम करायला नको, तुमच्या वयाचे आम्ही होतो तेव्हा वगैरेवगैरे ऐकवतात. अशा वातावरणात या सगळय़ाला नाकारत सुटत, परीक्षेला न बसण्याची आणि अखेर सीएचं सर्टिफिकेट फाडण्यापर्यंतची मजल निवेदक गाठतो. हे बंड त्याने आपल्यावर विनाकारण लादलेल्या आणि आपल्याला नको असलेल्या बिनमहत्त्वाच्या गोष्टींविरुद्ध पुकारलेला आहे. सामाजिक प्रतिष्ठा म्हणून असलेल्या नावलौकिकातल्या फोलपणाला दिलेलं हे सक्षम उत्तर आहे. त्यावर तो ठाम आहे. दुरून मुलींकडे पाहून पुंगुड स्वप्न पाहण्यात आणि मासिकांवरच्या बायांच्या शरीराला सिग्रेटीचे चटके देण्यातून लैंगिक भावनांचा कोंडलेपणा दिसतो. तरीही कादंबरीतल्या पात्रांची लैंगिकतेविषयीची जाणीव एखाद्या थांबलेल्या क्षणासारखी स्तब्ध आहे. मुली पाहण्यात आणि नजर लपवण्याइतपतच हे आकर्षण आहे. यापलीकडे लैंगिक भावनांना कुणीही वाहू दिलेलं नाही. लैंगिक आकर्षणाबाबतचा एकप्रकारचा अशक्य अवघडलेपणा या कादंबरीतल्या पात्रांच्या मन:स्थितीत दाटलेला आहे. मुक्ततेची मर्यादा न ओलांडता त्याच अवकाशात मुलींबद्दल आणि पुढे लग्न झालेल्या बायांबद्दल निरीक्षणं येतात. त्यातही कोरडेपणा आहे. पण तोही आशयाला जोडलेला आहे.
आणीबाणीच्या आसपासच्या काळाचं रेखाटन, प्रचंड भाववाढ, संप, कॉलेज निवडणूक, मारामाऱ्या, आंदोलनं, टाळेबंदी, दंगली आणि या सगळय़ा पार्श्र्वभूमीवर स्वत:च्या स्वातंत्र्याचा व्याकूळ शोध असं या कादंबरीचं सूत्र आहे. हे इतकं बाहेर घडत असतानाही निवेदकाला स्वत:चा अनुभव, स्वत:च्या भावना व्यक्त करता येत नाहीत, स्वत:च्या जगात इतर कुणाला भागीदार बनवता येत नाही. रिकामं वाटणं आणि काहीच न करावं वाटणं ही अत्यंत उदासीन अवस्था या कादंबरीच्या पानापानाला बिलगून आहे. कादंबरीअंतर्गत काळाचं आणि पात्रांचं ते एक महत्त्वाचं वैशिष्टय़ आहे. आजचंदेखील.
फक्त एकाकी आणि तुटलेपणाच्या अवस्थेचं चित्रण करणारी ही कादंबरी नाही. तर माणूसपण या मूल्याला सर्वाधिक महत्त्व देऊन त्याच्या स्वातंत्र्याविषयी मूलभूत चिंतन व्यक्त करणारी ही कादंबरी आहे. ज्या सामाजिक संरचना निर्माण झाल्या आहेत त्या निभावून नेताना त्यातली पोकळता आणि त्यांच्या असण्यात आपल्या अस्तित्वाचं होणारं स्खलन अशा दुहेरी पातळीवर अधांतरी लोंबकळणं वाटय़ाला येऊन आपल्या स्वातंत्र्याचा शोध घेऊ पाहणारी ही कादंबरी आहे. जन्मायचं की नाही ही निवड आपल्याला नाही. म्हणजे तिथेही आपण स्वतंत्र नाही. मृत्यूतही स्वतंत्र नाहीच. आपण स्वतंत्र नाहीच. अशाप्रकारची भावना निवेदक व्यक्त करतो. प्रत्येकाला असा एक प्रदेश लागतो जिथं त्याचीच पावलं उमटलेली असतील आणि ज्यात फक्त त्याचीच पावलं उमटतील. जिथे तो शांतपणे जगू शकेल. राहू शकेल. तो प्रदेश. जपायला हवा. हा प्रदेश जपण्यासाठी निवेदकाचा झगडा सुरू आहे. आणि बाहेरचं वजन मात्र असह्य आहे. ही त्याच्या स्वातंत्र्याआड येणारी भिंत आहे.
निवेदकाला हवं असलेलं स्वातंत्र्य मग नेमकं कसं आहे?
तो म्हणतो, ‘‘स्वतंत्र असणं म्हणजे हवं असलेलं मिळणं नव्हे, तर काय हवंय ते ठरवता येणं. आपल्या आयुष्याचं काय करायचं ते ठरवता येणं. स्वातंत्र्य म्हणजे नसलेलं मिळवणं नव्हे, तर असलेलं नाकारणं. नकार जगणं हेच माझं स्वातंत्र्य.’’
‘‘मी काहीही करीन पण काहीही करणार नाही. सीए होण्यापेक्षा मला माणूस होणं जास्त परवडेल.’’ हे निवेदकाचं कादंबरीच्या शेवटी येणारं वाक्य स्वातंत्र्याच्या व्याकूळ तळशोधात असलेल्या निवेदकाच्या मानसिक स्वास्थ्याचा शांत ठहराव आहे. यानंतर काहीही आधीसारखं असणार नाही. कितीतरी नवी स्ट्रक्चर उभी राहिली तरी त्याचं दरवेळी नकार जगणं हेच प्राधान्यक्रमानं वरचढ ठरणार आहे, अशी ठाम समजूत ही कादंबरी निर्माण करते. स्वत:चा प्रदेश जपण्याला महत्त्व देते. त्यातला स्वातंत्र्याला महत्त्व देते. म्हणून तिचं वळण महत्त्वाचं.
या कादंबरीच्या दुसऱ्या वाचनानंतर कुतूहल म्हणून मी पुण्यात जाऊन शशांक ओकांना भेटलो. त्या भेटीत त्यांच्याकडून ‘अमुकचे स्वातंत्र्य’च्या पुढच्या भागाची जवळपास अडीचशेहून अधिक पानं लिहून झाल्याचं कळलं आणि पुढच्याच वाक्यात ती सगळीच्या सगळी पानं चोरीला गेल्याचंही.
‘अमुकचे स्वातंत्र्य’च्या मलपृष्ठावर पुढच्या भागाची पूर्वसूचना देताना असा मजकूर येतो :
‘अमुकचा ‘स्वातंत्र्य लढा’ संपलेला नाही. तो चालूच राहणार..
सुरुवात कोणती आणि शेवट कोणता ?'
त्यानंतर वैयक्तिक आयुष्याच्या बऱ्याच दमवून टाकणाऱ्या उलथापालथी निभावून नेण्यात ओकांनी पुढं काहीच लिहिलं नाही. या कादंबरीची लेखकाकडे एकही प्रत सध्या उपलब्ध नाही. एकदोन ग्रंथालयं वगळता दुसरीकडे कुठे असण्याची शक्यताही तशी कमीच. या कादंबरीच्या प्रकाशन संस्थेचं- पॉप्युलर प्रकाशनाचं शंभरावं वर्ष सध्या सुरू आहे. निदान त्यानिमित्ताने तरी ही कादंबरी उपलब्ध व्हावी असं आपण फारफार मनातलं बोलू शकतो. आपल्यापुरतं एवढंच बोलण्याजोगं उरतं.
( हा लेख लोकसत्ता, रविवार १० डिसेंबर च्या लोकरंग पुरवणीत 'आदले । आत्ताचे' या सदराअंतर्गत प्रसिद्ध झाला आहे.)